आधी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नंतर पंजाब, राजस्थान आणि पुन्हा दिल्ली विद्यापीठ यांतील निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय? तेथे डाव्या आणि काँग्रेसी विद्यार्थी संघटनांनी चांगलीच बाजी मारली. तेव्हा तो मोदी सरकारच्या विरोधातील कौल आहे काय? उजव्या राजकारणाला तरुणांनी दिलेली ती चपराक आहे काय? की उजव्यांचे समाजमाध्यमी विचारवंत म्हणतात त्याप्रमाणे या निकालाला काहीही अर्थ नाही. ते त्या-त्या ठिकाणच्या तत्कालीन घटनांवर आधारलेले आहेत. जेएनयू हा डाव्यांचा अड्डाच. तेव्हा तेथे डाव्या संघटना एकत्र येऊन जिंकल्या यात काहीही विशेष नाही. दिल्ली विद्यापीठातील निकालाने एवढेच दाखवून दिले, की तेथे प्रस्थापितांविरोधात असंतोष होता. त्याला ‘अँटी इन्कबन्सी’ म्हणतात. त्याचा निकालांवर परिणाम झाला. उजव्यांचा हा युक्तिवाद उजवा आहे काय? की या निकालाचा अर्थ या दोन्हींच्या मध्ये कुठे तरी दडलेला आहे? सर्वच गोष्टींचा टोकेरी विचार होत असल्याच्या आजच्या काळात या निकालाचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या विद्यापीठांत संघ परिवारातील अभाविप या संघटनेला पराभव पत्करावा लागला. ही त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित आणि म्हणूनच अतिशय अपमानास्पद अशी बाब आहे. हा पराभव किती अनपेक्षित होता? तर जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे एक नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अभाविपच्या अभिनंदनाची ट्विप्पणी केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘भारताचे तुकडे करणाऱ्यांचा पराभव झाला आणि भारत माता की जय म्हणणाऱ्यांचा विजय.’ निकाल नेमका उलटा लागला. त्याचा अर्थ आता असा लावायचा का, की जेएनयूतील विद्यार्थ्यांनी भारताचे तुकडे करणाऱ्यांना समर्थन दिले? तसे असेल, तर मग संपूर्ण विद्यापीठालाच देशद्रोही ठरवणार का? मुद्दा असा, की तसे करण्याचे जे प्रयत्न गेल्या दोन-तीन वर्षांत झाले, त्याविरोधातच तेथील विद्यार्थ्यांनी हा कौल दिलेला आहे. असाच कौल काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही नागरिकांनी दिलेला आहे. तेथेही भाजपचा अनपेक्षित असाच पराभव झाला. त्यातून आम आदमी पक्षाचे बळ वाढले असल्याचे प्रतीत होते, असे त्या पक्षाच्या नेत्यांनी म्हणणे एकवेळ समजून घेता येईल. कारण अशा छोटय़ा-छोटय़ा यशांमधून आत्मविश्वासाचा प्राणवायू मिळविणे हे त्यांच्या जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. परंतु पोटनिवडणुकीचा काय, किंवा विद्यापीठांतील काय, विजयापेक्षा तेथील पराभवाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचे कारण, त्या विजयाचा अर्थ विजयी बाजूचे बळ वाढले असा होत नसून, पराभूत बाजूचे बळ घटले असा होत आहे. निकालापूर्वीच विजयाचे ढोल-ताशे वाजविणाऱ्या विजयवर्गीय कुळातील मंडळींना हे अमान्यच असणार यात शंका नाही. विजयी संघटनाही हे मान्य करणार नाहीत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की मतदारांनी कोणाला डोक्यावर घेण्याऐवजी कोणाला पायदळी आणायचे हे ठरवूनच आपली मते दिली आहेत. उन्माद आणि मग्रुरीचे, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रद्रोही अशा ‘बायनरी’चे राजकारण येथील जनता फार काळ चालवून घेत नाही हा संदेश त्यांनी या मतांतून दिला आहे. प्रोपगंडाच्या रणगाडय़ांखाली स्वतंत्र विचार चिरडून टाकता येत नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. हे जे चित्र आहे ते अर्थातच फारच चिमुकले आहे. पुसटसे आहे. परंतु हा उजव्या अतिरेकी राजकारणाला देण्यात आलेला संदेश आहे. लोक बोलू लागलेत याचे ते प्रमाण आहे. ते अनेकांना ऐकूही येणार नाही आणि अनेकांची ते ऐकण्याची तयारीही असणार नाही. परंतु ते तर आता गृहीतच आहे..