गेल्या दीड वर्षांच्या सत्ताकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारातील काही मंत्र्यांनी स्वकर्तृत्वाचा बराच गाजावाजा केला. तसे करण्याचा त्यांना अधिकार असावा किंवा नाही याबद्दल मतांतरे असू शकतात. पण एक गोष्ट मात्र फडणवीस यांनी आवर्जून करावयास हवी होती. स्वप्रतिमानिर्मितीच्या हौसेपायी ‘मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगा’ असा एखादा सल्ला त्यांनी मंत्र्यांना खासगीत  तरी द्यायलाच पाहिजे होता. मंत्री किंवा लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना आपल्यावर काही सार्वजनिक जबाबदाऱ्या येऊन पडतात याचे भान बाळगणे आवश्यक असते. मोदी लाटेत केवळ सुदैवामुळे मिळालेल्या संधीचे सोने करायचे असेल, तर प्रथम स्वयंप्रतिमेच्या मर्यादा ओळखण्यास शिकले पाहिजे. दीड वर्षांत सुचले नसले तरी आता मात्र फडणवीस यांनाच अशा आचारसंहितेची  निकड भासू लागली असेल यात शंका नाही. मंत्र्यांनी अतिउत्साहाच्या भरात काही तरी करून बसावे आणि त्याचा गाजावाजा झाल्यानंतर, विपर्यास केल्याचा ठपका प्रसार माध्यमांवर ठेवून थयथयाट करावयाचा ही क्लृप्तीदेखील आता जुनी झाल्याने, त्याचा परिणामही बोथट होऊ  लागला आहे. पण काही मंत्र्यांना हेही ध्यानात आलेले नसल्याने, स्वप्रतिमानिर्मितीच्या ध्यासापुढे त्यांना काहीच सुचेनासे झाले असावे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण जवळून पाहिले असले, तरी आपल्या वडिलांच्या संवेदनशील समाजकारणाचे धडे त्यांनी बहुधा गिरवले नसावेत. नाही तर, दुष्काळग्रस्त भागातील उद्योगांचे पाणी बंद करण्याच्या मागणीला विरोधाचे सूर लावून वर पुन्हा माध्यमांनीच विपर्यास केल्याचा पाढा त्यांनी गिरवला नसता. दुष्काळग्रस्त भागात जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा देखावा जरी एखाद्या पुढाऱ्याने केला, तरी दिलाशाची फुंकर मिळते, अशा वेळी ‘पाणी दिसले म्हणून’ हसतमुखाने स्वत:चीच प्रतिमा कॅमेऱ्यात उतरविण्याचा अविचार पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर, त्यावर नाराजीच्या आणि संतापाच्या प्रतिक्रिया उमटणार हे स्पष्टच होते. अपेक्षेप्रमाणे समाजमाध्यमांवर पंकजाताईंची ही प्रतिमा  झळकताच त्यावर संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्याच. जे पाणी दिसले म्हणून पंकजा मुंडे यांना सेल्फी काढण्याइतका आनंद झाला, त्यामागे त्यांच्या ग्रामीण विकास खात्याचे प्रयत्न असलेच तर ते मांजरा नदीत आधीपासूनच असलेल्या पाण्याचे पात्र ३० ऐवजी ८० फूट रुंद करण्यासाठी सुरू आहेत. हा मुद्दा एकटय़ा पंकजा मुंडे यांच्यापुरताच सीमित नाही. फडणवीस सरकारमध्ये आणखीही काही मंत्र्यांकरिता अशा आचारसंहितेची नितांत गरज आहे. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे  यांनी दुष्काळग्रस्त भागात हेलिकॉप्टरने दौरा करण्याचा हट्ट धरला, आणि लोकांच्या तोंडचे पाणी काढून हेलिकॉप्टरच्या मैदानावर हजारो लिटर पाण्याचा सडा घालून खडसे यांच्या स्वागतासाठी उभ्या यंत्रणेला हजर राहावे लागले. भविष्यात कधी फडणवीस सरकारच्या कारकीर्दीचा इतिहास लिहिला गेलाच, तर अशी आगळीवेगळी संवेदनशीलता दाखवून सरकारच्या कार्यक्षमतेचे नवे नमुने वेशीवर टांगणाऱ्या मंत्र्यांनी त्यासाठी आपल्या अशा कर्तृत्वाने स्वत:ची पाने अगोदरच लिहून ठेवली आहेत.