लग्न समारंभात प्रचंड खर्च करण्याची पद्धत जगभरातील सर्व समाजांमध्ये आहे. सगळ्यांनी मिळून आनंद साजरा करणे एवढेच काय ते त्या समारंभाचे महत्त्व. आपण ज्या सामाजिक परिस्थितीत राहतो, त्याचे भान आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेवर पडतच असते, मात्र लग्नसमारंभ आले की अनेकांचे त्याबाबतीतील ताळतंत्र अगदीच सुटते. मराठवाडय़ातील परभणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश देशमुख, यांनी ते ताळतंत्र फारच सोडले आणि आपल्या मुलाच्या विवाहात कोटय़वधींची उधळण करीत आपली सामाजिक पत दाखवून दिली. एखादी व्यक्ती किती पैसा खर्च करू शकते, यावर त्याची ही पत अवलंबून असते, असा एक सार्वत्रिक समज असतो. खरे तर कोणाचीही पत त्याच्याकडे असलेल्या धनसंपत्तीवर अवलंबून नसतेच. उलटपक्षी एखाद्या घरगुती समारंभात ती व्यक्ती आपल्या मूलभूत तत्त्वांशी किती इमान राखते, यावरच अवलंबून असते. सुरेश देशमुख यांची पत त्यामुळे कळून चुकलीच आहे. सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या अशा व्यक्तीला संपूर्ण मराठवाडय़ातील एकाही शहराला आणि गावाला रोजच्या रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात कसे येत नाही, असा प्रश्न विचारणारे मूर्ख ठरावेत, असा शाही विवाह आयोजित करून त्यांनी आपले हसू करून घेतले आहे. या देशमुखांनी पाण्याच्या टंचाईबद्दल आंदोलने करण्याचेही कर्तव्य पार पाडलेले नाही. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेसी नेत्यांनी चढय़ा आवाजात उधळपट्टीवर जी टीका सुरू केली आहे, ती आता देशमुख यांच्या बाबतीतही होईल का, असा प्रश्न आता खुद्द काँग्रेसजनच विचारू लागले आहेत. शाही विवाह म्हणजे अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा, असे एक समीकरण गेल्या काही वर्षांत रुजले आहे. त्यानंतरच्या काळात त्याहूनही किती तरी अधिक पटीने आपल्या संपत्तीचे अजागळ दर्शन घडवणारे विवाह राजकारण्यांच्या घरात पार पडले. प्रत्येक वेळी तीच ती टीका होत राहिली, परंतु त्याने कोणाच्या डोक्यात मात्र काहीच शिरले नाही. काहीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे त्या वेळचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या घरातील लग्न समारंभातील उधळपट्टी टीकेचा विषय झाली होती. तेव्हा शरद पवार यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वात तशी धमक असण्याची शक्यता नाही. ‘हायकमांड’कडून कानउघाडणी होण्याची वाट खरे तर पाहण्याची आवश्यकताच असायला नको. देशमुख यांनीच त्याबद्दल जाहीर माफी मागणे अधिक इष्ट. परंतु ते तसे करतील अशी शक्यता नाही. सार्वजनिक जीवनातील चारित्र्याचा जाहीर बोभाटा होण्यातच धन्यता वाटणाऱ्यांमध्ये त्यांची गणना करायला हवी. आपली श्रीमंती सगळ्यांना दाखवण्याचा विवाह हे एक निमित्त असते. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे दिसते. काही कोटी रुपये देऊन लग्नात चित्रपटातील नटनटय़ांना नाचायला बोलावणारे आता वाढू लागले आहेत. लग्न ही खासगी बाब असली, तरी त्यानिमित्त होणाऱ्या समारंभात असे ओंगळवाणे प्रदर्शन करून कोणते समाधान मिळते, हा प्रश्न विचारणाऱ्यांना देशमुखी परंपरा नसते आणि सामाजिक पतही नसते. लग्नातील एवढय़ा खर्चात काही गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. आजवर सरकारी पैशांत जे होऊ शकले नाही, ते खासगी पैशांतून करण्याएवढे शहाणपण देशमुखांना सुचावे, अशी कामना करणे एवढेच आपल्या हाती. लग्न ही व्यक्ती आणि कुटुंबासाठी जेवढी आनंदाची घटना असते, तेवढीच ती दुसऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरू नये, एवढे भान तरी निदान राजकारण्यांनी ठेवायलाच हवे.

Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
BJP is creating rifts between castes and religions says Aditya Thackeray
भाजपा हे जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे- आदित्य ठाकरे
farmers protest
शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?