मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी धर्माचा वापर करण्यास आता सगळेच पक्ष सज्ज होऊ लागले आहेत. दहीहंडी आणि पाठोपाठ गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे सुरूही झाले आहे. जैन समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पर्युषण पर्वकाळात आठवडाभर मांसविक्री बंदी करण्याचा निर्णय मीरा-भाईंदर या भाजपची सत्ता असलेल्या महानगरपालिकेने गेल्या वर्षी घेतला; त्या वेळी तो खूपच वादग्रस्त ठरला होता. आता याच काळात कत्तलखाने बंद ठेवण्याचीही मागणी भाजपच्या एका आमदाराने केली आहे. विशिष्ट समाजातील धार्मिक भावनांचा अशा रीतीने राजकीय वापर होणे ही गोष्ट नवी नाही. गेली अनेक वर्षे कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी केली जाते. जैन समाजात मांसाहार वज्र्य मानला जातो. मांसाहार करू नये, यासाठी त्या समाजातील अनेक जण चळवळही करीत आहेत. समाजाचे मनपरिवर्तन करून त्यांना शाकाहाराकडे वळवण्यासाठी प्रामुख्याने हे प्रयत्न होत असतात. काही प्रमाणात त्यास प्रतिसादही मिळत असतो. मात्र सत्ता वापरून बंदी घालणे यामागे राजकारणाशिवाय अन्य कोणता हेतू असू शकत नाही. जैन बांधवांच्या धार्मिक भावनांना अन्य धर्मीयांनी जरूर पाठिंबा द्यावा. मात्र धार्मिकतेचा प्रश्न संवेदनशील बनवून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मतांसाठी केलेले लांगूलचालन असते, याचे भान राजकीय पक्षांनी ठेवायला हवे. ते नसल्यामुळेच त्यामुळे जो तो आपापल्या मतदारसंघासाठी लढत राहतो. त्यातून सार्वत्रिक पातळीवर काही भरीव घडण्याची शक्यता मात्र मावळते. निवडणुकीत मांसाहारी विरुद्ध शाकाहारी असा वाद निर्माण करणे म्हणूनच बालिशपणाचे ठरते. मांसाहार करू नये, ही केवळ श्रद्धा नसून त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, असे सांगितले जात असतानाच मांसाहार करणाऱ्यांच्या संख्येत मात्र भरच पडत असल्याचे दिसते. अशा बंदीने विशिष्ट समाजाला आपल्या गटात सामील करून घेता येत असले, तरीही अन्य घटक मात्र आपोआप दूर राहतात, हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. जैन समाजात पर्युषण पर्वाला महत्त्वाचे स्थान असते. धार्मिक अंगाने या काळात या समाजातील सर्व जण श्रद्धेने उपवास पाळतात. वर्षांतील हा पर्वकाळ या समाजासाठी सर्वोच्च प्राधान्याचा समजला जातो. निदान या काळात कत्तलखाने बंद ठेवावेत, अशी मागणी याच समाजाकडून होत असते. यापूर्वीच्या सरकारांनीही तिला हिरवा कंदील दाखवला होता. प्रश्न आहे तो अशा प्रकारे बंदी घालून अन्यांवर होत असलेल्या अन्यायाचा. विचारी समाजात मतपरिवर्तनाचा मार्ग वेळखाऊ असला तरीही अधिक परिणामकारक असतो. विचार करण्याची शक्ती जागृत करणे आणि त्यातून समाजात विशिष्ट मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. सत्तेचा वापर करून अशी बंदी लादण्याने मात्र विचारांच्या लढाईत पराभव पत्करावा लागतो. प्रत्येक धर्मामध्ये काही रीतींना अनन्यसाधारण महत्त्व असते. अन्य धर्मीयांना ते तसेच वाटेल असे मानण्याचे कारण नाही. सक्तीने एखादी गोष्ट करायला लागली, तर त्याबाबत माणूस अधिक आग्रही बनतो. त्यापेक्षा आपले विचार पटवून देऊन त्या मार्गाने जाण्यास प्रवृत्त करण्याचा जो मार्ग सर्वच धर्माचार्यानी स्वीकारला, तो अधिक विधायक म्हटला पाहिजे. निवडणुकीत जैन समाजाची मते मिळायला हवीत, म्हणून अशा बंदीची मागणी लोकशाहीत स्वीकारार्ह असत नाही. सर्व धर्मीयांना भारत हा देश अधिक मुक्त वाटतो, याचे कारण येथे सर्वानाच त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याची खात्री वाटते. त्यामुळे बंदीचा मार्ग हे स्वातंत्र्य हिरावून घेणारा ठरतो, हे लक्षात घेऊनच त्याबाबत निर्णय घेणे  उचित ठरेल.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Due to Shiv Senas aggressiveness Congress defeat in Mahavikas Aghadi
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट