भारताच्या १५व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने आता नवीन राष्ट्रपती कोण असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे. लोकसभा व राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा सदस्य अशा एकूण ४८९६ लोकप्रतिनिधींमधून राष्ट्रपतींची निवड केली जाते. या लोकप्रतिनिधींचे एकूण मतांचे मूल्य हे १० लाख, ९८ हजार, ९०३ एवढे आहे. निवडून येण्याकरिता निम्म्या मतांची आवश्यकता असते. लोकसभेतील बहुमत, जवळपास १५ राज्यांमध्ये असलेली सत्ता यातून सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. भाजप किंवा मित्रपक्षांकडील मतांचे मूल्य यांची बेरीज केल्यास ५ लाख, ५४ हजार मतांचे गणित जमत नाही. यामुळेच भाजपने प्रादेशिक पक्षांवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र आणि राज्यात भाजप आणि शिवसेना हे सत्तेत एकत्र असले तरी त्यांची वर्तणूक मित्रपक्षांऐवजी शत्रूपक्षांसारखी असते. या निवडणुकीत शिवसेनेची मते महत्त्वाची असल्याने सध्या शिवसेनेचा वाघ फुकाची डरकाळी फोडत असला तरी भाजपच्या नेत्यांनी जरा दमानेच घेतले आहे.  केंद्रात सत्ता असली की छोटे पक्ष आपोआपच बरोबर येण्यात काही अडचण येत नाही. विविध राज्यांमधील छोटय़ा-मोठय़ा प्रादेशिक पक्षांना बरोबर घेण्यावर भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. पण दोन्ही गट भाजपला मदत करण्याची चिन्हे आहेत. कारण दोन्ही गटांना केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या मदतीची आवश्यकता आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेले आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर. काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनाही भाजपने पावन करून घेतले. उद्या शिवसेनेसारख्या मित्राने दगा दिलाच तर जास्त मतांची बेगमी करण्यावर भाजपच्या नेतृत्वाचा भर आहे. भाजपला शह देण्याकरिता विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन आठवडय़ांपूर्वी विरोधी नेत्यांना पाचारण केले होते. काँग्रेस, जनता दल (यू), समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष अशा समविचारी पक्षांनी संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांचा उमेदवार कोण असावा, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये फूट पाडू शकेल अशा उमेदवाराच्या शोधात विरोधक आहेत. शरद पवार हे उमेदवार असल्यास शिवसेनेची मते भाजपच्या विरोधात जाऊ शकतात. तसेच अन्य पक्षांचा पाठिंबा ते मिळवू शकतात, असे काँग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणित आहे. पण विजयाचे गणित जुळत नसल्याने शरद पवार यांनी रिंगणात उतरण्यास ठाम नकार दिला आहे. भाजपच्या मित्रपक्षांची मते विरोधात गेल्याशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही याची विरोधकांनाही कल्पना आहे. त्यातूनच विरोधकांच्या आघाडीवर फार काही आशादायी चित्र नाही. निवडणूक बिनविरोध होणार नाही याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.  भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा आहे. आपल्याला कोणाचेही आव्हान असता कामा नये यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कायम कटाक्ष असतो. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडताना मोदी याच धोरणाचा अवलंब करतील हे निश्चित. भाजपचा उमेदवार विरोधकांना मान्य होण्याची शक्यता कमी असल्याने निवडणूक सहमतीने होण्याची शक्यताही नाही.  नीलम संजीव रेड्डी यांचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी देशाच्या सर्वोच्च पदाकरिता निवडणूक झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी, डावे पक्ष, अखिलेश, मायावती हे आपापल्या राज्यांमधील विरोधक या निमित्ताने एकत्र आले आहेत. हेही काही कमी नाही.