पोरगं बिघडलं, की आईबापाला त्याची जास्त काळजी वाटू लागते असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर म्हणतात ते खरे असेल, तर बिघडलेल्या मुलाबाबतचे हे विधान सार्वत्रिक सत्य मानावे लागेल. संघ ही एकेकाळच्या जनसंघाची जननी! संघकार्यापुढील अडथळे परतवून लावण्यासाठी राजकीय पक्षाची गरज भासू लागल्यावर संघाने जनसंघाला जन्म दिला आणि संपूर्ण सत्तेशिवाय संपूर्ण संघकार्य शक्य नाही, हा विचार बळावू लागला. १९७५ मधील आणीबाणी त्या दृष्टीने संघाच्या आणि जनसंघाच्या पथ्यावरच पडली. त्यानंतर संसदेत जेमतेम अस्तित्वापुरता उरलेला जनसंघ सत्तासोपानाची पहिली पायरी चढला. संघाचे सत्तास्वप्न वास्तवात येण्याची चिन्हे दिसू लागली. नंतरच्या ज्या परिस्थितीत जनसंघाचे विसर्जन करून भाजपची स्थापना झाली, तोवर संघ परिवाराचाही विस्तार झाला होता. त्यामुळे भाजपला मातृसंस्थेच्या प्रेमाची पाखर मिळत राहिली, आणि केवळ हेच मूल संघकार्य सोपे करण्याची कर्तबगारी बजावू शकते हे स्पष्ट होऊ लागल्यावर या मुलाचे थोडे अधिकच लाड होऊ लागले.  भाजपच्या शिखर नेतृत्वावर संघाचे संस्कार असावेत यासाठी संघाने काटेकोर काळजी घेतली होती, तरीही संघाच्या शिस्तीत राजकारण करून टिकाव लागणार नाही हे लक्षात येताच भाजपने स्वत:ची राजनीती तयार केली. त्यालाच ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नावही दिल्याने, साहजिकच मतदाराच्या नजरा आणि आशा-अपेक्षा या पक्षावर स्थिरावल्या. गेल्या दोन दशकांत भाजपला चाखावयास मिळालेली सत्तेची फळे हे त्याचेच परिणाम असल्याचे संघाला पटले असावे. सत्तेच्या सावलीत संघ जोमाने फोफावतो, हेही स्पष्ट झाल्याने, भाजपला मातृसंस्थेच्या प्रेमाचा वाटा थोडा अधिकच मिळत गेला असावा. एखाद्या कुटुंबात असे काही दिसू लागले, की त्या कुटुंबातील इतर मुले दुजाभावाच्या भावनेने दुखावतात. संघ परिवारातही अनेकदा असे घडले. त्यातूनच भाजपच्या धोरणांना परिवारातील इतर संस्थांनी कधी उघडपणे तर कधी छुपा विरोध करून नाराजी व्यक्तदेखील केली. पण या नाराजीचे रूपांतर कधीच बंडाळीत झाले नव्हते. गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्या संघत्यागाने बंडाळीचे पहिले रूप परिवारास पाहावयास मिळाले. भाजपला संघाने लाडावून ठेवल्याचीच भावना त्या बंडातून उघड झाली होती. वेलिंगकर यांच्या ताज्या मुलाखतीत तोच सूर अधिक आक्रमकपणे प्रकटला आहे. ते सध्या साहजिकही आहे. कारण गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, आणि निवडणुकांच्या मैदानातच वेलिंगकर यांनी संघ-भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट दुटप्पीपणाचा आरोप करताना, संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांची खंतच त्यांच्या मुखातून बोलती झाली असावी. काँग्रेसविरोधात ज्या मुद्दय़ांसाठी संघर्ष केला, तेव्हा संघर्षांला पाठिंबा देणारा संघ, भाजपला मात्र त्या मुद्दय़ांवरच पाठिंबा देतो, हा वेलिंगकर यांचा गौप्यस्फोट असल्याचे सर्वसामान्य जनतेला वाटत असले, तरी संघाच्या भाजपानुनयी भूमिकेविषयी नाराजी असलेल्या परिवार-सदस्यांना मात्र, वेलिंगकरांच्या मुखातून ‘मन मन की बात’ बोलली गेल्याचा आनंद झाला असेल. भाजपच्या चुकांचेही समर्थन करून पक्षाला पाठीशी घालणारा संघ भाजपला शरण गेला आहे, हा त्यांचा आरोप म्हणजे, बिघडलेल्या मुलाला सुधारण्याऐवजी, पालकच बिघडून जावेत असा मासला वाटतो. वेलिंगकर यांनी या परिस्थितीस संघ नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. संघाचे नेतृत्व असहाय आणि कमकुवत असल्याचा थेट आरोप करून त्यांनी संघाविरुद्ध संघर्ष पुकारला आहे. संघाच्याच मुशीत आयुष्य घडल्याने, आपल्या संघर्षांचे संभाव्य परिणाम काय होतील याची त्यांना पुरेपूर कल्पना असेल, यात शंका नाही. पण संघालाही या संघर्षांकडे कानाडोळा करून चालणार नाही, हे वास्तव आता ठळक झाले आहे.