लेनिन, स्टालिनच्या राजवटी इतिहासजमा होऊन त्यांचे पुतळेही नाहीसे झाले, तरी रशियन राजकारणातला व्यक्तिवाद काही बदललेला नाही. शतकभर तो तसाच कायम आहे, हेच रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या ‘युनायटेड रशिया’ पक्षाला ‘डय़ूमा’च्या – म्हणजे रशियातील लोकसभावजा केंद्रीय कनिष्ठ सभागृहाच्या- नुकत्याच आटोपलेल्या निवडणुकीत जे पाशवी बहुमत मिळाले, त्यातून दिसून आले. यापूर्वीची निवडणूक २०११ साली झाली होती, तेव्हापेक्षा १०५ जास्त जागा यंदा मिळाल्या. ही निवडणूक दुहेरी पद्धतीने होते. एक मत पक्षाला आणि दुसरे उमेदवाराला. अशा प्रकारे ४५० जणांच्या सभागृहातील ३४३ जागांवर आता पुतिनसमर्थकांचीच सद्दी असेल. यापूर्वी त्यांची संख्या होती २३८. पंतप्रधानपदासाठी निराळी थेट निवडणूक रशियात लवकरच होईल, तेव्हा पुतिन यांना लागोपाठ चौथ्यांदा सत्तापदी राहता येणार, हेच ताज्या बहुमतातून सिद्ध झाले. हे विचित्रच म्हणावे लागेल. कारण रशिया आर्थिक संकटाच्या गडद छायेत असूनही पुतिन हे युक्रेनमध्ये फौजा घुसवणे किंवा सीरियातील तेलखाणी टिकवण्यासाठी तेथील कारवाई इतर देशांची वाट न पाहता सुरू करणे अशा निर्णयांवर रशियाचा उरलासुरला पैसा उधळत राहिले आहेत. त्यांची सामाजिक लोकप्रियतादेखील जवळपास शून्यच म्हणावी अशी.. तर टीकाकारांची तोंडे दाबणे, राजकीय विरोधकांची दखलच न घेता परस्पर निर्णय घेणे, हीच कार्यपद्धती गेल्या १५ वर्षांत कायम असल्याने राजकीय लोकप्रियताही व्यस्तच. तरीदेखील पुतिन जिंकतात, याचा साधा अर्थ एकच असू शकतो. तो म्हणजे, राजकीय यश आणि देशहित पाहण्यातील आस्था या दोन बाबींचा काहीच संबंध उरलेला नाही. रशियातही हेच दिसले. राजकीय विरोधकांची लैंगिक कुलंगडी बाहेर काढण्यात पुतिन यांचे पित्ते असलेल्या माध्यमांनी गेल्या वर्षीपासूनच प्रचंड रस घेतला होता. भ्रष्टाचार विरोधकच करतात, अशा प्रचारातही कुठे कसर नव्हती. जे जे ‘सकारात्मक’ ते ते फक्त पुतिन यांचे, अशी या पुतिनशाहीतील रशियन माध्यमांची तऱ्हा कायम असतानाच, आंतरराष्ट्रीय वाहिन्यांच्या प्रसारणावर रशियात छुपे र्निबध तरी येत होते किंवा त्यांना रशियाचे हित पाहवत नाही अशी भावना-भडकावणी स्थानिक पातळीवर होत होती. याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि पुतिन यांचा पक्ष ‘दगडापेक्षा वीट मऊ’ ठरला. रशियात एकंदर ७५च्या आसपास राजकीय पक्ष असले आणि त्यापैकी २८ पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असली, तरी खरी लढत चारच पक्षांत दिसली. बाकीचे पक्ष एक टक्क्यापेक्षा कमी मत मिळवणारे, पण त्यांनी विरोधकांची मते खाल्ली आणि ‘पुतिन यांनीच हे पक्ष पोसले आहेत’ हा विरोधकांचा आरोपही खरा ठरला. रशियात ११ कोटी मतदार आहेत. त्यांपैकी फार तर दोन कोटी ८१ लाख ६८ हजार ५८० जणांचा पाठिंबा पुतिन यांच्या पक्षाला असल्याचे ताजा निकाल सांगतो. ही संख्या कमी, कारण मतदानच ४७ टक्क्यांच्या आसपास झाले. रशियात ‘डय़ुमा’साठी १९९३ ते २०११ या काळात ज्या निवडणुका झाल्या, त्यांहून यंदाची मतदान टक्केवारी  नीचांकी आहे. म्हणूनच, २० टक्क्यांहून कमी मतदारांनी पाठिंबा देऊनही ‘पुतिन लाट’ दिसते आहे! निवडणूक जिंकणे हा जिथे निव्वळ सत्ताधाऱ्यांचा खेळ होऊन बसतो, त्या प्रत्येक देशातील लोकशाही नेहमीच खिळखिळी होत असते. रशियातही तेच होत असून पुतिनशाही मात्र भक्कम होते आहे.