राज्यातील एका मोठय़ा भूभागात आणि त्याहून विस्तृत अशा मनोभूमीमध्ये सध्या मोठी खळबळ माजलेली आहे. सध्या मराठवाडय़ात ठिकठिकाणी निघत असलेल्या मोर्चामध्ये तिचा आविष्कार दिसत आहे. कोपर्डी येथील बलात्काराची घटना ही खळबळ वर येण्यास कारणीभूत ठरली. त्या घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा समाजातील लोक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने, कोणत्याही पक्षाचा वा संघटनेचा ध्वज खांद्यावर न घेता हे मोर्चे आणि निषेधसभा होत आहेत. त्याबद्दल या समाजातील विवेकी मंडळी अभिनंदनास पात्र आहेत. कोणत्याही सामाजिक घटनेमागे राजकारण असतेच. ते सत्ताकारणच वा पक्षीयच असते असे नव्हे. ते लोकांचे राजकारण असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या राजकारणाला एक वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असून, त्याचे पुढारपण सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याचे दिसते. कोपर्डी घटनेतील आरोपी हे दलित समाजातील आहेत. त्यामुळे या प्रकरणाला दलित वि. मराठा असे वळण देण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पवार यांनी त्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याविरोधाचे तेल ओतले. पवार यांच्या म्हणण्यानुसार या कायद्याचा काही वेळा दुरुपयोग केला जातो. तसा तो अनेक कायद्यांचा होतोच. तेव्हा अशा कायद्यांमध्ये सुधारणा करावी अशी पवारांची मागणी असेल तर त्यात काहीही गैर नाही. परंतु मुद्दा इतका साधा नाही. कोपर्डी घटनेचा या कायद्याशी काहीही संबंध नसताना त्यात हा विषय घुसडण्याची राजकीय हातचलाखी पवार व त्यांच्या शिष्योत्तमांनी केली. मराठा समाजात गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या असंतोषाला दलितांविरोधात वळविण्याचा हा प्रयत्न आहे. पवार हे एके काळी नामांतरापासूनच्या अनेक प्रश्नांवर दलित समाजाच्या बाजूने आणि बहुसंख्याकांच्या विरोधात उभे राहिलेले महाराष्ट्राने पाहिले आहे. तेच पवार राज्यातील मराठा समाजासमोर कधी ब्राह्मणांना, तर कधी दलितांना उभे करून येथील राजकारणात नवी ‘बायनरी’, हे विरुद्ध ते असे समीकरण तयार करताना दिसतात तेव्हा तो जेवढा पवार सांगत असलेल्या सत्यशोधकी वारशाचा पराभव असतो, तेवढाच तो पवारांनीच केलेला पवारांचा पराभव असतो. स्व त: पवार हे अमान्यच करतील. राज्यातील सत्ता हातातून गेलेल्या ३२ टक्केमराठा समाजाला मेळविण्याचे प्रयत्न करणारा कोणताही नेता हे अमान्यच करील. तेव्हा पवार करीत असलेल्या खुलाशांमध्ये काहीही अर्थ नाही. या सर्व प्रकरणात पवारांनीच पवारांचा आणखी एक पराभव केला आहे. मराठा समाजातील असंतोषाची कारणे जोखण्यात ते कमी पडत आहेत, असे म्हणणे हा त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचा अवमान ठरेल. शेतीची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, त्यातून कर्जबाजारीपणा, त्यातून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिकूनही मिळत नसलेल्या नोकऱ्या.. एके काळी राज्याच्या सत्तेतील प्रभावशाली मराठा समाजासमोरच्या या समस्या आहेत. राज्यातील ग्रामीण अर्थकारणही आज या समाजाच्या हातून निसटते आहे. त्याला सरकारचे सहकारचा बाजार उठविण्याचे धोरण किती कारणीभूत आणि मराठा नेत्यांनी केलेला सहकारातील सावळागोंधळ किती जबाबदार हा निराळा प्रश्न. परंतु या साऱ्यातून मराठा तरुणांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्यावर उपाय योजण्याऐवजी आज मराठा पुढारी त्याला इतिहासाच्या गुटय़ा खिलवून त्याच्यासमोर ही ना ती जात शत्रू म्हणून उभी करीत आहेत. आजवर ही खास हिंदुत्ववाद्यांची रणनीती होती. आज पवारांसारख्या नेत्यांनाही तिचा अंगीकार करावा लागत आहे. हा पवारांचा पवारांनीच केलेला सर्वात मोठा पराभव आहे.