राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा हवा असेल, तर ‘मातोश्री’वर चर्चेसाठी यावे, ही ‘रोखठोक’ भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची होती. पण परवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे यांना दूरध्वनी केला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) च्या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा आतापर्यंतचा शिरस्ता मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत डेरेदाखल झाले. महाराष्ट्रात पूर्वी शिवसेना मोठा भाऊ तर भाजपला छोटय़ा भावाची भूमिका वठवावी लागे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व लक्षात घेता भाजपचे दिल्लीतील नेतेही त्यांच्या कलाने घेत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. भाजप मोठय़ा भावाच्या तर शिवसेना छोटय़ा भावाच्या भूमिकेत गेली आहे. शेवटी सत्ता महत्त्वाची असते आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. ‘मातोश्री’ला बहुधा त्यांचा अंदाज आला असावा. कारण सध्या देशात भाजपची चलती आहे आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. मुंबई, ठाण्यापुढे शिवसेनेची जागा भाजपने घेतली आहे. अशा वेळी भाजपशी दोन हात करणे कितपत योग्य होईल, असा प्रश्न शिवसेनेला भेडसावत आहेच. मोदी-शहा जोडी आतापर्यंत शिवसेनेकडे कानाडोळाच करीत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेला सांभाळून घ्यावे लागत होते. भाजपने आतापर्यंत शिवसेनेला गृहीतच धरले होते. अगदी लोकसभेत तेलगू देशमपेक्षा जास्त खासदार असतानाही केंद्रात शिवसेनेकडे दुय्यम खाते, तर तेलगू देशमच्या वाटय़ाला हवाई वाहतूकसारखे महत्त्वाचे खाते आहे. पण राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आणि राजकीय संदर्भ बदलायला लागले. भाजपला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्याकरिता २० ते २५ हजार मूल्य असलेली मते कमी पडत आहेत. परिणामी २१ खासदार आणि ६३ आमदारांचे २५,८९३ मतांचे मूल्य असलेल्या शिवसेनेचा भाव साहजिकच वाढला आहे. तामिळनाडूतील अण्णा द्रमुकचा पाठिंबा भाजपला अपेक्षित होता. पण तेथील राजकीय संदर्भ बदलले आणि बंडखोर गटाला भाजपने मदत केल्याने अण्णा द्रमुक शशिकला गट भाजपला मदत करण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी शिवसेना दूर गेल्यास ५० हजार मतांच्या मूल्याचा फटका बसू शकतो. यामुळेच मोदी-शहा उदार झाले. मग विमान प्रवासात गोंधळ घातल्याबद्दल शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्धची कारवाई मागे घेण्यास आधी टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत शिवसेनेच्या पद्धतीने गोंधळ घातल्यावर २४ तासांच्या आत खासदार गायकवाड यांच्याविरुद्धची हवाई प्रवासाची बंदी उठली; जेणेकरून शिवसेना नाराज होणार नाही याची खबरदारी भाजपकडून घेण्यात येत आहे. मुंबईची जहागिरी शिवसेनेकडे सोपवून भाजपने आधीच एक पाऊल मागे घेतले होते. भाजपने साद घातल्यावर उद्धव ठाकरे हेही नरमले. भाजपबरोबर युतीत शिवसेना सडली, असा हल्ला चढविणाऱ्या ठाकरे यांनी दिल्लीतील चाणक्यपुरीत झालेल्या बैठकीला हजेरी लावली. लागोपाठ तीन राष्ट्रपतीपद निवडणुकांत शिवसेनेने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. अर्थात, त्यापैकी दोनदा काँग्रेसची सत्ता होती. उद्धव ठाकरे हे भाजप किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने शिवसेना यंदा फार काही ताणून धरण्याची शक्यता नाही. फक्त भाजपशी मैत्री अधिक गडद करण्याची किंमत शिवसेना कशी काय वसूल करते, याची उत्सुकता आहे. केंद्रात वा राज्यात चांगले खाते मिळावे हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. काहीही असो, भाजप आणि शिवसेना दोघांनी तूर्त तरी तह केल्याचे दिसते.