नवसर्जनाचे पाईक म्हणविले जाणारे देशातील नवोद्योगी पर्यावरण हे एक आभासी विश्वच आहे; यातला प्रत्येकच महान-थोर असे काही करण्यासाठीच जणू जन्मला आहे; आशियातील सर्वात धनाढय़ व्यक्ती आणि नवश्रीमंतांचा मेरुमणी ‘अलिबाबा’ जॅक मा याचे हे सारे भारतीय अवतारच! या वैयक्तिक नवोद्योगी आविष्कारातील बन्सल, मित्तल, बहल, सिंघल, गोयल, गर्ग वगैरे आधुनिक पिढीच्या वणिकसंप्रदायातील प्रत्येकाने अल्पावधीत तेजोवलय कमावले आणि त्याने गुंतवणूकदार, ग्राहकांनाच भुरळ घातली; इतकेच नव्हे तर धोरणकर्ते आणि नियामक यंत्रणांनाही जाळात ओढले. ई-व्यापार पेठांची प्रारंभिक धडाडी इतकी की, गल्लोगल्लीच्या वाण-सामानाच्या पारंपरिक विक्रेत्यांनी आता जणू दुकानांना टाळे लावावे लागावे. तथापि महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप इंडिया उत्सवाला रंगत चढण्याआधीच उत्तररंग सुरू झाला आहे. अनेक नवोद्योगी प्रयत्न रसातळाला जाणे किंवा लोप पावून कुठल्या तरी प्रस्थापित प्रवाहात त्यांनी विलीन होणे वगैरे हेच दर्शविते. स्नॅपडील-फ्लिपकार्टचे सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू राहिलेल्या चर्चा-वाटाघाटीनंतर फिस्कटलेले एकत्रीकरण या उत्तर प्रवासाचा नमुना म्हणता येईल. जेमतेम जुळून आलेले सूत एकाएकी तुटण्याने अनेक प्रश्न पुढे आणले आहेत. जुगाडू दृष्टिकोन, भन्नाट कल्पकता, दुर्दम्य ध्यास व अवीट जिद्दीच्या या पहिल्या पिढीच्या उद्योजकतेला नाट लावण्याचा हा यत्न नाही; परंतु नव्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचा घटक असली तरी ही उद्योजकता कितीही झाले तरी रूढ सामाजिक-सांस्कृतिक परिघापल्याड मजल मारत नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. स्वयंप्रेरणा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून मूळ धरलेल्या या उद्योगी प्रघाताच्या पुढच्या विस्तारात ही व्यक्तिगतताच मोठा अडसर ठरावी, याचाही प्रत्यय येतो आहे. या संभाव्य एकत्रीकरणाला स्नॅपडीलच्या भागधारक, गुंतवणूकदार सर्वानी संमती दिली होती. केवळ कुणाल आणि रोहित या संस्थापक असलेल्या बन्सल द्वयींनी मोडता घातल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत आहे. कंपनीतील त्यांचा एकत्रित ६.५ टक्क्यांचा भांडवली वाटा व स्वमालकी गमावली जाण्याच्या भीतीने दोहोंना पाऊल मागे घेण्यास भाग पाडले असावे. उल्लेखनीय म्हणजे स्नॅपडीलच्या बन्सल द्वयीने यापूर्वी भारंभार कंपन्या संपादित करण्याचे अनेक आतबट्टय़ाचे व्यवहार केले. मुकुटमणी म्हणून गौरविलेली एखादी कंपनी मोठी किंमत मोजून ताब्यात घ्यायची, तिच्या सामिलीकरणासाठी आणखी काही रक्कम खर्ची घालायची आणि शेवटी कवडीमोल भावात ती विकून तोटा सोसायचा असला प्रकार त्यांनी अनेकवार केला. तो सहन न झाल्याने कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील अनेकांनी वेगळी वाट धरल्याचेही दिसले. नव्या पिढीच्या या सर्वच कंपन्यांच्या व्यवस्थापनातील असले बेबनाव प्रकाशात येतच असतात. पुरत्या नफाक्षमही न बनलेल्या अनेक नव कंपन्यांनी, एकंदर परिपक्वतेच्या अभावी अकाली जीव गमावल्याची उदाहरणेही अनेक आहेत. जगाच्या प्रगत हिश्शात अर्निबधता हाच ई-व्यापाराचा आत्मा राहिला आहे. आपल्या सरकारने या व्यवसायासंबंधाने धोरणनिश्चितीसाठी आस्ते-कदम भूमिका घेत हे विनार्निबध स्वातंत्र्य त्यांना आजवर पुरते बहाल केले. आता विकासाचा पुढचा टप्पा म्हणून छोटय़ांचे विलीनीकरण आणि मोजक्या मोठय़ा कंपन्यांनाच वहिवाट खुली करणे हाच उपाय असल्याचे सांगितले जाते. फ्लिपकार्ट-स्नॅपडीलच्या एकत्र येण्याकडे याच आशादायी नजरांनी पाहिले गेले. प्रत्यक्षात ई-व्यापार कंपन्या या विक्रेते व ग्राहक यांच्यातील तंत्रज्ञानाचे व्यासपीठ पुरविणाऱ्या दुवा आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील लक्षावधी उत्पादक-विक्रेत्यांना देशव्यापी बाजारपेठ खुली करण्याची ई-पेठेची भूमिका कौतुकपात्रच आहे; परंतु यात मेख अशी की, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील या ई-पेठांचे स्वत:चेच मोठे विक्रेता जाळे आहे. ऑनलाइन विश्वातील अनेक छोटय़ांना सामावून घेत त्यांनी त्यांच्याशी संलग्न शेकडो विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणत आजवर मक्तेदारी निर्माण केली. त्यामुळे शुद्ध बाजारपेठेचा आत्मा आणि स्पर्धात्मकतेला ग्रहण लावून जुळणारे हे सूत तूर्त तुटले हे बरेच झाले. तरी संकटाचा दोर मात्र कायम आहेच.