ग. रा. कामत यांना मराठी चित्रपटसृष्टीत यावेसे वाटले, याचे कारण त्या काळी त्या विषयात येणारे बहुसंख्य सुशिक्षित असत. मुंबईच्या रुईया महाविद्यालयात शिक्षण घेताना मराठीतील ज्येष्ठ समीक्षक न. र. फाटक यांचा आवडता विद्यार्थी होण्याचे भाग्य कामतांच्या वाटय़ाला आले. यावरून त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात नाव काढणे स्वाभाविक ठरले असते. चित्रपटाच्या रंगीबेरंगी दुनियेने त्यांना खुणावले, म्हणून केवळ ते तिकडे वळले नाहीत. आपल्याकडे असे काही आहे, ज्याला तेथे निश्चित संधी आहे, याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. म्हणूनच अतिशय धाष्टर्य़ाने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. अन्यथा ‘मौज’ आणि ‘सत्यकथा’ या त्या काळातील सर्जनशीलतेच्या कक्षा रुंदावणाऱ्या नियतकालिकांतून किंवा वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम करीत असताना येत असलेला जगाचा संबंध आणि त्यातील घडामोडींच्या पाठीशी लपलेल्या नाटय़मयता याबद्दल त्यांना आकर्षण वाटते ना. त्या काळच्या मराठी चित्रपटसृष्टीला अशा साहित्यिक व्यक्तिमत्त्वांची गरज होतीच. ग. रा. कामत यांनी ती सर्वशक्तीनिशी पुरी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. यश हा एकच निकष असलेल्या या रुपेरी दुनियेत दीर्घकाळ टिकून राहणे ही सोपी गोष्ट नसते. कामतांनी ती करून दाखवली. चित्रपटांसाठी कथालेखन करणे हे त्यांचे क्षेत्र. ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न लेखकाच्या बरोबर ‘लाखाची गोष्ट’ आणि ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांचे सहलेखक होण्याचे भाग्य कामतांच्या वाटय़ाला आले. मराठी चित्रसृष्टीत स्थिरावत असतानाच हिंदीत आपली कामगिरी करण्याची संधी त्यांनी सोडली नाही आणि त्यामुळे अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या यशाचे त्यांना भागीदार होता आले. ‘काला पानी’ या १९५७ मधील चित्रपटाने पदार्पणातच त्यांना यशस्वी होता आले. त्यानंतर ‘दो चोर’, ‘दो रास्ते’, ‘मेरा साया’, ‘बसेरा’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘मनचली’, ‘कच्चे धागे’ यांसारख्या अनेक चित्रपटांनी त्यांना या दुनियेत आपले बस्तान बसवता आले. सुमारे चार दशके ग. रा. कामत या सृष्टीत आपले नाव झळकवत होते आणि तरीही त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रेखा कामत यांच्यासारखे चंदेरी वलय त्यांच्यापाशी नव्हते. आपल्या शब्दांबद्दलचा दुराग्रह न बाळगता आवश्यक त्या गोष्टींचा समावेश करतानाही आपल्या गाभ्यातील संकल्पनेशी प्रतारणा होऊ न देण्याचे कसब त्यांना अंगी बाणवता आले. आजकालच्या चित्रवाणी मालिकांच्या कथा आणि संवाद लेखकांना साहित्यबाह्य़ असलेल्या ज्या अतिरेकी संकटांना सामोरे जावे लागते, ती संकटे कामतांच्या वाटय़ाला आली नाहीत. सुदैवाने चित्रपटसृष्टीतील एके काळची मूल्यव्यवस्था नामशेष होण्यापूर्वीच कामतांनी आपली निवृत्ती जाहीर करून टाकली आणि त्यामुळे त्यांचे नाव नेहमीच यशाशी जोडले गेले. कामत चित्रपटसृष्टीत कार्यरत होते, तो काळ अनेक कारणांनी सृजनाचा होता. निष्ठुरपणे पडद्यामागील कलावंतांना वागवण्याची तेव्हा रीत नव्हती. लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक या साहित्यिकांबद्दल तेव्हा पुरेसा आदर असे. त्यामुळे आपल्याला काही किंमत मिळावी, यासाठी संपासारखे हत्यार तेव्हा कुणाला उगारावे लागले नाही. चित्रपट अभिनेत्याचा असतो, असाही समज तेव्हा रूढ झालेला नसल्याने कामतांच्या वाटय़ाला प्रशंसाच आली. ती यथायोग्य होती, म्हणून त्याचे अप्रूपही अधिक. शांतपणे काम करीत राहून समाधान मिळवणाऱ्या ग. रा. कामत यांच्या निधनाने हिंदी चित्रपटांत मान्यवर असलेला एक मराठी माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.