जागतिक नौदलांच्या इतिहासात सर्वाधिक काळ कार्यरत राहण्याचा मान मिळालेली, भारतीय नौदलातील विराट ही विमानवाहू युद्धनौका निवृत्तीच्या प्रवासाला निघाली असून, आणखी काहीच दिवसांत ती सागरी सेवेतून कायमची बाहेर पडेल. विक्रांत ही युद्धनौका अलीकडेच अशा पद्धतीने निवृत्त करण्यात आली होती. भारतीय नौसेनेतील प्रत्येकाला अभिमान वाटावा, अशा या दोन्ही नौकांनी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात हळवी जागा मिळवलेली होती. काळानुरूप काही गोष्टी लयाला जातात, हा सृष्टीचा नियम दाखवत त्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याने हे हळवे कोपरे आता अश्रुमय होतील, पण त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नौदलास वाटत नाही. हे असे घडते, याचे कारण भारतीयांच्या मनातील अशा अनेक प्रतिष्ठेच्या, प्रेमाच्या आणि अभिमानाच्या गोष्टी हेतुत: पुसून टाकून आपला इतिहासच नव्याने लिहिण्याची झालेली घाई. आपल्या देशात आजवर नोंदी करणे, ठिकाणांची, वस्तूंची जिवापाड निगा राखणे याबाबत कायमच हेळसांड झालेली आहे. आपण काही नवे घडवतो आहोत, याचे भान नाही किंवा असे काही करत असताना, त्याबद्दलच्या नोंदी ठेवण्याची सवयच नाही, अशा प्रवृत्तींमुळे या देशाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे आजवर अतोनात नुकसान झाले आहे. नौसेनेतील विराट लयाला जात असतानाच दूरदर्शन या एकेकाळी एकमेव असलेल्या दूरचित्रवाहिनीने सुनील गावसकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीतील सोन्याचा क्षण हरवून टाकण्यात धन्यता मिळवली आहे. विराटचे अस्तित्व हे भारतीयांसाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. यापूर्वी विक्रांत ही नौदलातील युद्धनौका सेवेतून निवृत्त केल्यानंतर तिचे अस्तित्वही संपवून टाकण्याची चर्चा सुरू झाली होती. भारतीय नौदलास या नौकांचे जतन करणे एवढे खर्चीक वाटत असेल, तर ते अधिकच दुर्दैवी म्हटले पाहिजे. आपल्या मानांकनांची अशी मानहानी होताना, पुढील पिढय़ांसाठी आपण काय शिल्लक ठेवत आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक असते. विक्रांत या युद्धनौकेवर आज कोणासही जाता येते व तिची भेट घेता येते. विराट या नौकेबाबत काय करायचे, याचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. ‘विराट’ने या देशाच्या संरक्षणात महत्त्वाची कामगिरी बजावली होती, याचे स्मरण ठेवून ती नामशेष होणार नाही, याची काळजी घेणे अधिक औचित्याचे ठरणार आहे. सुनील गावसकरसारख्या भारतीय फलंदाजाबाबत दूरदर्शनने केलेली हेळसांड हे याच मनोवृत्तीचे लक्षण आहे, यात शंका नाही. १९८७ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात गावसकर यांनी कसोटी सामन्यांतील दहा हजार धावांचा विक्रम केला होता. कोणाही भारतीयासाठी ती घटना अतिशय अभिमानाची अशीच होती. त्या वेळी दूरदर्शनवर तो सामना पाहिलेल्या सर्वाच्याच मनात तो प्रसंग कोरून ठेवल्यासारखा ताजा असेल. या सामन्याची ध्वनिचित्रफीत उपलब्ध नसल्याचे सरकारी उत्तर देणाऱ्या दूरदर्शनला आपण काय हरवले आहे, याची जाणीव नसली पाहिजे. मुंबई दूरदर्शननेही अशाच अनेक महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ध्वनिफिती गहाळ करून आपण कसे अट्टल सरकारी आहोत, हे सिद्ध केले आहे. ‘रेडिओ सिलोन’सारख्या नभोवाणी केंद्रावर भारतीय चित्रपट संगीताचे जे अचाट असे संग्रहालय आहे, ते पाहिल्यावर कोणाचेही ऊर आनंदाने भरून येईल. एवढय़ा छोटय़ा केंद्रास जे जमू शकते, ते दूरदर्शनसारख्या सरकारी वाहिनीस जमू नये, ही शरमेचीच बाब आहे. ‘द संडे एक्स्प्रेस’ने या संदर्भात माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीची उत्तरेदेखील सरकारी पद्धतीने देण्यात आली आहेत. हे सगळे चीड आणणारे आणि मनस्ताप देणारे आहे. परंतु जबाबदारी झटकण्यातच शहाणपण सामावलेल्या सरकारी बाबूंना विराट आणि गावसकर यांचे मोल कसे कळणार?