वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सुरक्षा यंत्रणा कडेकोट केली. इतकी की आपल्या माजी राष्ट्रपतींना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना विमानतळावर काटेकोर तपासणीला सामोरे जावे लागले होते. हीच गोष्ट शाहरुख खानच्याही बाबतीत झाली होती. सगळ्याच मुस्लिमांबरोबर भारतीयांनाही एकाच मापाने मोजणाऱ्या अमेरिकनांच्या नावाने आपल्याकडे सगळ्यांचा चडफडाट झाला होता. युरोपात, अमेरिकेत भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी अशा सगळ्यांनाच एकच म्हणजे ‘ब्राउन’ समजले जाते याचीही भारतीयांना खोलवर बोच असते. त्यामुळे पाकिस्तानी माणसाने केलेल्या चुकीसाठी अमेरिकन लोकांनी भारतीय माणसाला वेठीला धरल्यास त्यांच्या वर्णद्वेष्टेपणाबद्दल, जगाच्या भौगोलिक, ऐतिहासिक अज्ञानाबद्दल आपला तिळपापड होतो. पण आपण याबाबतीत त्यांच्यापेक्षा जराही वेगळे नाही हे सुदानी माणसाने केलेल्या चुकीबद्दल टांझानियन मुलीला घृणास्पद वागणूक देऊन आपण सिद्ध केले आहे. एखादी घटना घडल्यावर सामान्य माणसे ‘झुंडशाही मानसिकते’ला बळी पडतात, हे एक वेळ समजण्यासारखे आहे. कारण गर्दीचे मानसिक वय दोन वर्षांचे असते असे समजले जाते. पण ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था सोपवलेली आहे, ती पोलीस यंत्रणाही अशा प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी मख्ख आणि असंवेदनशीलच कशी काय वागते? कारमधून चाललेल्या सुदानी ड्रायव्हरने एका ३५ वर्षीय स्त्रीला चिरडल्यानंतर स्थानिक लोकांनी अध्र्या तासाने तिथून चाललेल्या टांझानियन विद्यार्थ्यांची गाडी थांबवून, त्यात बसलेल्या मुलीला नग्न केले जाणे हे बंगळुरूसारख्या आयटी सिटीत नव्हे तर तालिबान्यांच्या राज्यातच घडू शकते. ती मुलगी तशीच पोलिसांकडे गेली तेव्हा पोलिसांनी तिला सांगितले की सुदानी काय, टांझानियन काय, सगळे सारखेच दिसतात. त्यांना वेगळे कसे ओळखणार? शिवाय तक्रार नोंदवून घ्यायला नकार देऊन पोलिसांनी उलट त्या सुदानी ड्रायव्हरला शोधून आणायची जबाबदारीही त्या मुलीवर आणि तिच्या मित्रांच्याच गळ्यात टाकली. त्या सगळ्या घटनेशी टांझानियन विद्यार्थ्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. असलाच किंवा आहे असे कुणाला वाटत असेल तरीही, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे हेच सयुक्तिक ठरले असते. पण त्यातल्या मुलीला नग्न करणे, तिला मदत करायला पुढे येणाऱ्या स्थानिक नागरिकाला मारहाण करणे हे कुठल्या संस्कृतीत बसते? गायीचे मांस घरात आणल्याच्या ‘संशयावरून’ दादरी इथे मोहम्मद अखलाकला दगडांनी ठेचून मारले जाते. दक्षिणेत सुदानी आणि टांझानियन नागरिकांमध्ये गल्लत करून त्यांचा घृणास्पद छळ केला जातो. ही सगळी असहिष्णुता नाही, असे ठरवण्यासाठी आता ‘मुलीला जमावाने नग्न केलेच नव्हते’ असे खुलासेही सुरू होतील. मात्र आम्हाला कुठेच न्याय मिळणार नाही म्हणून आम्हीच कायदा हातात घेतो आणि निकाल लावून टाकतो, असा ‘तालिबानी’ विचार सर्वसामान्य लोकांनी करणे याचा अर्थ आपल्या सगळ्याच यंत्रणांनी त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे असा होतो, हे या खुलासेदार राज्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.