भारताचे सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात गेल्या सप्टेंबरमध्ये महासंचालक पातळीवरची बैठक झाली. त्या बैठकीला सीमेवरील गोळीबाराच्या वाढत्या घटनांची पाश्र्वभूमी होती. एकटय़ा ऑगस्टमध्ये सीमेवर शस्त्रसंधीभंगाच्या ५८९ घटना घडल्या होत्या. दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण होते. अशा परिस्थितीत झालेल्या त्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला, की दोन्ही बाजूंनी बंदूक उचलण्याआधी फोन उचलावा. त्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील शस्त्रसंधीभंगाच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली. सप्टेंबरमध्ये अशा दोन घटना घडल्या. ऑक्टोबर पूर्ण शांततेत गेला. नोव्हेंबरमध्ये एकच घटना घडली. याचा अर्थ पाकिस्तानची शेपटी अगदी सुतासारखी सरळ झाली आहे असा नाही. त्या बैठकीनंतर शस्त्रसंधीभंगाच्या ज्या-ज्या घटना घडल्या त्या जम्मूतील हिरानगर-सांबा भागामध्ये. भारतात घुसखोरी करण्यासाठी या भागाचा वापर प्रामुख्याने केला जातो हे लक्षात घेतले पाहिजे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे सोमवारी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची झालेली भेट. गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी न्यूयॉर्कमधील एका हॉटेलात राहूनही एकमेकांना न भेटलेले हे नेते पॅरिसमध्ये सर्व औपचारिकता बाजूला ठेवून भेटतात; अधिकारी, सचिव आदी लवाजमा दूर ठेवून दोघेच शेजारी बसून चर्चा करतात, याचा अर्थ या दोन्ही देशांना पुन्हा एकदा बंदुकीऐवजी फोन उचलणे अधिक लाभदायक असल्याची जाणीव झाली असावी. वस्तुत: पाकिस्तानबरोबर संबंध सुरळीत करण्याचे मोदी यांचे पहिल्यापासून प्रयत्न असल्याचे दिसले आहे. शरीफ यांना शपथविधी सोहळ्याचे आवतण देणे, त्यांच्या मातोश्रींना साडीचोळी पाठविणे वगैरे गोष्टी आता इतिहासाचा भाग झाल्या आहेत. अर्थात अशी आशादायी पावले भारताने उचलण्याचीही ती काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा असे घडलेले आहे आणि त्या-त्या वेळी पाकिस्तानी लष्करशहांनी त्यात मोडता घातलेला आहे. भारताशी तणाव ही त्या लष्करशहांच्या सत्तास्वार्थाची किल्ली आहे. त्यामुळेच हा प्रश्न सुटणे अत्यंत अवघड बनलेले आहे. गेल्या जुलैमध्ये भारत-पाक चर्चा होऊ शकली नाही त्याचे कारण काश्मीरच्या मुद्दय़ाचा त्या चर्चेत समावेश असावा हा पाकचा हट्टाग्रहच होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांपासून मिळेल त्या व्यासपीठावरून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी या मुद्दय़ावरून भारतविरोधी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला. कदाचित पॅरिस हल्ला झाला नसता तर हे वातावरण अधिक उग्र होत गेले असते. त्या घटनेनंतर मात्र पाकिस्तानी राज्यकर्ते ताळ्यावर आल्याचे दिसत आहे. शरीफ यांनी भारताशी विनाअट चर्चेची तयारी दर्शविणे याचा अर्थ तोच आहे. यातूनच पुढे मोदी आणि शरीफ यांची ही भेट झालेली आहे. त्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप उघड झालेले नाही. पण त्यात पुढच्या चर्चेची चाचपणी झाली असणार हे नक्की. कर्नल महाडिक यांच्या स्मृती अजूनही ताज्या असताना भारताचे पंतप्रधान पाकिस्तानी पंतप्रधानांशी गुप्तगू करताना दिसतात हे काहींच्या राष्ट्रप्रेमाच्या व्याख्येत बसणारे नाही हेही नक्की. तेव्हा यावर टीका होणारच. तीस एकच उत्तर आहे. आणखी काही महाडिक होऊ नयेत यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. मोदी त्या वाटेनेच चालले आहेत.