चीनमध्ये २४ लाख कुटुंबे कोटय़धीश असली, तरी सुमारे ४५.६० कोटी कुटुंबांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे आणि ही श्रीमंत चिनी कुटुंबे जेवढय़ा वेळात २५ अमेरिकी डॉलर कमावतात, तेवढय़ा काळात अतिगरीब चिनी कुटुंबे अवघा एक अमेरिकी डॉलर कमावू शकतात. या आकडेवारीचा संबंध एरवी चित्रकलाजगताशी जोडला गेलाही नसता. मात्र, अमेदिओ मोदिग्लिआनी (१८८४-१९२०) या इटालियन चित्रकाराने रंगविलेले एक नग्नचित्र (न्यूड) लिलावातून विकत घेण्यासाठी तब्बल ११२४ कोटी रुपये- म्हणजे १७०४ लाख अमेरिकी डॉलर- एवढी बोली एका चिनी कोटय़धीश महाभागाने मंगळवारी लावली, तेव्हा त्या सुंदर तैलचित्राइतकेच जगातील वाढत्या गरीब-श्रीमंत दरीचेही चित्र सामोरे आले. चीनची आर्थिक स्थिती चारच महिन्यांपूर्वी खालावली होती, अमेरिकादी पाश्चात्त्य देशांचीही आर्थिक स्थिती २००८ च्या फटक्यानंतर पूर्णत: सशक्त झालेली नाही आणि तरीही चित्रलिलावांच्या बातम्या जेव्हा येतात, तेव्हा हे- काही हजार कोटी रुपये किंवा काही शे डॉलरांचे- आकडे भुईनळय़ासारखे फुलत असतात. एवढा पैसा या चित्रासाठी कसा काय ओतला गेला, याचे एक उत्तर तयार असते ते म्हणजे, ‘चित्र तेवढेच महत्त्वाचे आहे’! हे उत्तर चुकीचे किंवा असत्य असते असेही नाही.. उदाहरणार्थ, मोदिग्लिआनी हा थोर इटालियन चित्रकार मानला जातो. मानवाकृतीचे चित्रण करताना काहीसा लांबट आकार देण्याची ‘इलाँगेटेड’ शैली त्याने वापरली, तीच पुढे थोर स्विस-इटालियन शिल्पकार आल्बेतरे जिआकोमेत्ती यानेही स्वीकारली. मानवाकृतीचे आधुनिकतावादी काळातील रूप-शोध पॉल गोगँ, व्हॅन गॉ, हेन्री मातिस, पाब्लो पिकासो असे सारे जण घेऊ पाहात होते, त्या काळात भौमितिक आकार, लालित्य आणि यथार्थदर्शन या तिन्हीचा मिलाफ साधून मोदिग्लिआनीने नवसृजन केले. आधुनिक काळातील निर्विकार- वस्तुनिष्ठ विचारधारा मोदिग्लिआनीच्या चित्रांतून दिसते.. तरीदेखील, या इटालियन चित्रकाराच्या कलेचे म्हणावे तेवढे चीज त्याच्या हयातीत आणि मृत्यूनंतरही झाले नव्हते. विशेषत: पिकासोमुळे जो नायकत्ववादी पंथ आला, त्याच्या परिणामी मोदिग्लिआनी काहीसा झाकोळला. त्याचे हे चित्र १९१७-१८ साली रंगवलेले आहे. पॅरिसमध्येच ते १९२८ पर्यंत होते, तेथून इटलीत आल्यानंतर पुन्हा १९३४ सालच्या लिलावात त्याची मालकी बदलली, नव्या मालकांनीही हे चित्र मिलान शहरातील गियानी मॅटिओली यांना विकले आणि या मॅटिओलींच्या तिसऱ्या पिढीने ते ‘ख्रिस्टीज’ या लिलावसंस्थेमार्फत विक्रीला काढले. हा पूर्वेतिहासही चित्राची किंमत वाढवणारा ठरतो. परंतु लिलाव कंपन्यांचा एकंदर ‘हे खास लोकांसाठीच’ असा ताठा आणि अतिश्रीमंतांमध्ये स्पर्धा लावून देण्यासाठी त्यांनी वापरलेला युक्तिव्यूह यांमुळे चित्रांची किंमत वाढते, हे सहसा सांगितले जात नाही. ‘ख्रिस्टीज’ने हे चित्र लिलावपुस्तिकेच्या मुखपृष्ठावरच छापले होते, त्या लिलावाची मध्यवर्ती कल्पनाच ‘चित्रकार-शिल्पकारांच्या स्फूर्तिदेवता’ अशी होती. सहा अतिश्रीमंतांना नऊ मिनिटे एकाहून एक चढय़ा बोली लावणे भाग पडावे, इतकी स्पर्धा या चित्रासाठी झाली आणि ‘जिंकले’ चिनी उद्योजक लीउ यिकिआन. १९८०च्या दशकात टॅक्सी चालवणाऱ्या यिकिआन यांनी उदारीकरणाचा फायदा घेऊन भांडवली बाजारात पैसा केला असे सांगितले जाते. त्यांची आजची मालमत्ता आहे १ अब्ज ७० कोटी अमेरिकी डॉलर. हा उत्कर्ष अपवादात्मकच आणि त्यामुळे काहीसा संशयास्पदही. त्यामुळेच, चित्रलिलावांतील बोलींचा पैसा येतो कोठून, हे याचे उत्तर येथेही झाकलेलेच राहणार.