सध्या जे काही सारे सुरू आहे, ते संपवायचे असेल, तर शिवाजी महाराजांसारखा कुणी तरी महापुरुष जन्माला यायला हवा असे लोकांना नेहमी वाटत असते. शिवरायांनी मने जोडली आणि जिवाला जीव देणारे साथीदार उभे केले, तेव्हा स्वराज्यनिर्मितीची क्रांती झाली. त्यामुळे क्रांती म्हटले की ती रक्तरंजितच असायला हवी असे नसते. शांतीच्या मार्गानेही क्रांती होऊ  शकते, हे शिवरायांच्या इतिहासाने दाखवून दिले असल्याने, शिवरायांचे सच्चे पाईक असलेल्या शिवसैनिकांनाही शांतिमार्गाचीच क्रांती प्रिय असणार हे ओघानेच येते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या संदर्भातील अलीकडचे विचार अत्यंत उद्बोधक असेच आहेत. शिवसेनेच्या तपातपांच्या तपश्चर्येनंतर मुंबई-ठाण्याच्या महापालिकांवर फडकलेला भगवा किंवा पन्नास वर्षांच्या शांतिमार्गी वाटचालीनंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांदा हाती आलेली अर्धीमुर्धी सत्ता ही त्या शांतिमार्गी क्रांतीचीच फळे आहेत, असेच उद्धवजींच्या विचारांचे सोने लुटताना रविवारी पुणेकरांना वाटून गेले असणार. पूर्वीच्या काळी राजकीय विरोध हा विचारांतून व्यक्त होत असे, हे त्यांचे स्मरणरंजनही नव्या पिढीच्या शांतिप्रिय सैनिकी बाण्याला उद्बोधक असेच आहे. शिवसेनेचा इतिहास हा जणू मनपरिवर्तनाचा आणि मने जोडण्याच्या अनोख्या प्रयोगाचा  आहे, असाच या विचारांतून नव्या पिढीच्या सैनिकांचा समज व्हावा, हीदेखील परिवर्तनाची आणि क्रांतीची एक नवी नांदीच म्हणावी लागेल. विचारांचा विरोध विचाराने व्हावा हा शिवसेनेचा बाणा आता अनेकांना अविश्वसनीय वाटत असला, तरी यापुढे या पक्षाचे वैचारिक पावित्र्य याच बाण्यातून जपले जावे, असा स्पष्ट संदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी पुण्यातील भाषणातून दिला आहे. त्यामुळे ‘शिवसेना स्टाइल’ या काहीशा बदनाम झालेल्या शब्दाला नवी पवित्र झळाळी प्राप्त झाली आहे. पूर्वीच्या काळी विचारांतून विरोध व्यक्त व्हायचा, आता मात्र विरोधकांना संपविण्यापर्यंत राजकीय विरोधाची मजल गेली आहे, हे उद्धवजींचे वाक्य सेनेच्या इतिहासातील जुनी काही पाने पुसून नव्याने लिहावयास घेतलेल्या इतिहासाची प्रस्तावना ठरावी एवढे मौलिक ठरेल यात शंका नाही. गिरणगावाच्या तावरीपाडय़ात पाच दशकांपूर्वी पेटलेल्या एका संघर्षांत कम्युनिस्ट नेता कृष्णा देसाई यांचा निर्घृण खून झाला होता, तेव्हा सेनेच्या वैचारिक विरोधकांना संपविण्याच्या दहशतनीतीची ती नांदी होती, असे इतिहासाने नोंदविले असले, तरी जी शिवसेना आज शांतिमार्गाचे व  वैचारिक विरोधनीतीचे गोडवे गाते, त्या शिवसेनेचा त्या खुनाशी संबंध जोडणे हाच मुळी राजकीय विरोधक संपविण्याच्या कटाचाच भाग असावा, असे आता वाटणे आश्चर्यकारक नाही. खरे म्हणजे, शिवसेनेचा हा शांतिमार्ग आजचा नाही. तो पूर्वीपासूनचाच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची अस्मिता जागी करण्यासाठी ‘मार्मिक’ सुरू केले, त्याचे ‘घोषवाक्य’ हाच मुळी ‘अहिंसेचा महान उद्गार’ होता. ‘खीचो न कमां को, न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो’ असे म्हणत मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई तर विचाराच्या आधारावरच सुरू झाली होती. न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाचे मार्ग अंगीकारल्यावर कधी तरी सैनिकांनी तोफा-तलवारी घेऊन संघर्षांचा रस्ता पकडलाही असेल, पण तो शिवसेनेचा स्वभाव नाही, हेच मार्मिकच्या घोषवाक्यातून स्पष्ट केले गेले होते. उद्धवजींनी त्याचाच पुनरुच्चार केला आहे. कधी काळी कृष्णा देसाईंचा खून झाला असेल, ‘गद्दारांचा खोपकर करा’ असेही कधी कुणी बोलून गेले असेल, पण हे वैचारिक विरोधाचेच मार्ग होते, हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेसारख्या शांतिप्रिय पक्षाने वैचारिक विरोधकांना संपविण्याच्या हिंसामार्गाचा विरोध केला, तर राजकारणाच्या शुद्धीकरणाचे नवे पर्वच सुरू झाले असे म्हणता येईल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पहिले पाऊल टाकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.