पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा चेहरा किती वरवरचा असू शकतो आणि त्यामागे धर्मवाद्यांचे किती विखारी दडपण येऊ शकते हे आतापर्यंत ज्यांना समजून आलेले नाही त्यांना ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेल्या व्यक्तीवरून तरी कळावे. देशातील या सर्वात मोठय़ा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी म्हणवून घेणाऱ्या आदित्यनाथ या गृहस्थाची निवड मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. हा प्रकार वाटतो तितका सहज नाही. या योगी म्हणवून घेणाऱ्या आदित्यनाथाच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या निवडीने काही अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात. ते मांडणे आवश्यक ठरते.

यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, उद्या समजा अन्य पक्षाने कोणा मुल्लामौलवी वा ख्रिस्ती धर्मगुरूस मुख्यमंत्रिपदी बसवले तर भाजपची भूमिका काय राहील? असे करताना अन्य पक्षांनीही हे अन्य धर्मगुरूदेखील विकासवादी आहेत, असा युक्तिवाद केल्यास भाजप तो कोणत्या तोंडाने नाकारणार? की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे असे भाजप म्हणणार? वास्तविक हे आपण करू शकतो याची चुणूक भाजपच्या हरयाणवी मुख्यमंत्र्याने दिगंबर धर्मगुरूस विधानसभेत बोलवून दाखवून दिलीच आहे. त्यातून चेपलेल्या भिडेमुळे भाजप एक पाऊल पुढे गेला असून कडव्या धर्मवाद्यास थेट मुख्यमंत्रिपदी बसवण्याइतका बेलगामपणा दाखवण्यापर्यंत त्या पक्षाची मजल गेली आहे.

यातून दिसतो तो राक्षसी बहुमतातून जन्माला आलेला माज. त्याची चव खुद्द आदित्यनाथ यांनीच दाखवून दिली. पक्षाचा नेता निवडण्याच्या बैठकीत या योग्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला. योगी, योगी अशा घोषणा देत आपण काय करू शकतो याची चुणूक आदित्यनाथ अनुयायांनी दाखवून दिली. आमच्या धर्मगुरूस मुख्यमंत्रिपदी बसवले नाही तर याद राखा, असाच तो इशारा होता. निवडणुकीत कबरस्तान विरुद्ध स्मशान अशी भूमिका स्वीकारल्यानंतर त्याची तार्किक परिणती हीच होणार होती. मोदी आणि त्यांचे प्रतिरूप अमित शहा यांनी त्यातून योग्य तो बोध घेतला आणि अधिक तमाशा नको म्हणून मुख्यमंत्रिपद आदित्यनाथ यांना बहाल केले. यात मोदी यांना आपल्याच कृतीचे प्रतिबिंब दिसले असणार. चार वर्षांपूर्वी भाजपच्या गोव्यातील बैठकीत मोदी साजिंद्यांनी आपल्या नेत्याच्या नावाचा गजर करत पक्षास धमकावले होते. काँग्रेसच्या बैठकांची आठवण करून देणाऱ्या त्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी पक्षास भाग पाडले गेले. आदित्यनाथांनी तोच प्रयोग मोदी आणि शहा यांच्यावर केला आणि मुख्यमंत्रिपद खेचून घेतले. सध्या ज्या गतीने भाजपचे गुन्हेगारीकरण होत आहे ते पाहता आगामी काळात या पक्षातील लोकशाही प्रक्रियेचे काय याचाही अंदाज बांधता येईल. यापुढे अन्य राज्यांत अन्य भाजप नेत्यांनी याच मार्गाचा अवलंब केला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.

तिसरा मुद्दा पक्षाच्या कथित विकासवादी दृष्टिकोनाचा. राज्यव्यवस्था, प्रशासन, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत आपली मते काय आहेत, हे या योग्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे. गोरखपूरचा हा मठाधिपती कोणती मूल्ये मानतो, हेदेखील पुरेसे दिसून आलेले आहे. हिंदू युवा वाहिनी या नावातूनच काय ते कळेल अशा संघटनेचे ते संस्थापक आहेत. अनेक गुन्हे त्यांच्या नावावर असून बिहारात ज्याप्रमाणे जातीपातींच्या खासगी सुरक्षा संघटना असतात तशी या योग्याची समांतर लष्करी व्यवस्था असून तिची मोठय़ा प्रमाणावर दहशत आहे. तरीही अशा व्यक्तीच्या हाती राज्याचा शकट सोपवला जाणार असेल तर त्यातून काय अर्थ काढणार? आम्ही कोणाचेही लांगुलचालन करीत नाही, असे हा गृहस्थ आणि त्याच्या पक्षाचे अधिपती म्हणतात. हे विधान करताना त्यांच्या डोळ्यासमोर अन्य पक्षांकडून केले जाणारे मुसलमानांचे तुष्टीकरण असते. मतांसाठी, निवडणुकीसाठी अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करणे हे वाईटच, यात शंका नाही; परंतु म्हणून त्याच उद्देशाने होणारे बहुसंख्याकांचे लांगुलचालन कमी अधिम  कसे ठरते? म्हणजे इतके दिवस या देशातील असाहाय्य जनतेने काँग्रेसादी पक्षांकडून केला जाणारा मुसलमान अनुनय मुकाट सहन केला. आता भाजपच्या काळात हा दुसऱ्या टोकाला जाणार; परंतु बहुसंख्याकांचे तुष्टीकरण योग्य असे मानणारे निर्बुद्ध मानस प्रसार पावत असताना अनेकांना यात गैर ते काय, असा प्रश्न पडू शकतो; परंतु मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकवाद जितका घातक तितकाच बहुसंख्याकवाददेखील धोकादायक असतो, हे आपण समजून घ्यायला हवे.

चौथा मुद्दा योगी आदित्यनाथ यांच्या निवडीमागील असाहाय्यतेचा. हे योगी भाजपच्या अन्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांप्रमाणे मोदी-जीवित नाहीत. आदित्यनाथ यांचे स्वत:चे समाजात स्थान आहे. भले ते विखारी आणि प्रदूषित असेल. त्यामुळे त्यांना काहीही करण्यासाठी मोदी यांच्या अनुमतीची गरज राहणार नाही आणि ती घेण्याचा त्यांचा स्वभावदेखील नाही. याचाच अर्थ असा की, हा योगी उद्या तशीच वेळ आल्यास मोदी आणि शहा यांच्या अरेला कारे म्हणण्याचे धैर्य दाखवू शकतो. मुख्यमंत्रिपद मिळण्याआधीच त्यांनी हे करून दाखवले आणि २०१९ साली सत्ता टिकवण्यासाठी असाहाय्य असलेल्या मोदी आणि कंपनीविरोधात तेव्हा ते करणार नाहीत, अशी हमी देता येईल असा त्यांचा लौकिक नाही.

हे काहीही लक्षात घेण्याच्या परिस्थितीत भाजप नाही इतका तो निवडणुकीच्या मतानंदात आणि मदानंदात मश्गूल आहे. एकेकाळी काँग्रेसचे गुन्हेगारीकरण हा भाजपच्या राजकीय कार्यक्रमपत्रिकेवरील पहिला मुद्दा असे. तो भाजपने सोडला त्यास बराच काळ उलटला; परंतु हे प्रच्छन्न गुन्हेगारीकरण, काहीही करून सत्ता आणि विकासाच्या नावाखाली हिंदू विरुद्ध अन्य अशी मांडणी ही या पक्षाची कार्यशैली बनू पाहत आहे. एकेकाळी या देशात कोणीही गांधी टोपी घातली की त्या टोपीखालील डोके आदरणीय मानावयाचा प्रघात होता. तसे सर्रास करणे किती मूर्खपणाचे आहे, हे कळावयास या देशाला ६० वर्षे लागली. सध्या या टोपीची जागा भगव्या कफनीने घेतली असून प्रत्येक भगव्या कफनीधारी देहास साधू-संत-साध्वी म्हणण्याचा प्रघात पडला आहे. तो गांधी टोपीला वंदनीय मानण्यापेक्षाही घातक आहे. कारण हे असे लोक कोणतीही राज्यव्यवस्था मानत नाहीत, आपणास कोणतेही नीतिनियम, कायदेकानू लागू होत नाहीत, असे त्यांना वाटते. आतापर्यंत या सगळ्यांकडे दुर्लक्ष करता येत होते; परंतु या मंडळींना राजसिंहासनावर बसवण्याचा धोकादायक प्रघात मोदी सरकार पाडत असून कोणाही किमान शहाण्यास यामागील गांभीर्याची जाणीव व्हावी. बहुत भ्रमिष्ट मिळाले। त्यांत उमजल्याचें काय चाले। अशी सध्याची परिस्थिती आहे.