संगीतात जो कलावंत आयुष्यभर अभिजाततेचा ध्यास धरतो, त्याच्या हाती काही ना काही लागतेच. वीणा सहस्रबुद्धे या अशा कलावंतांपैकी एक होत्या. संगीत माणसाच्या हृदयाला हात घालते, त्याच्या संवेदना जाग्या करते आणि त्याच्या मनातील तरल भावनांना वाट करून देते, हे खरेच. पण हे घडून येण्यासाठी प्रचंड रियाज आणि मेहनत याच्या बरोबरीने बुद्धीचा वापर करणेही आवश्यक असते. उच्चशिक्षाविभूषित असलेल्या वीणाताईंनी संगीताच्या क्षेत्रात प्रत्यक्ष गाण्याबरोबरच जे संशोधन केले, तेही मोलाचे आहे. आपली प्रत्येक मैफल अनुभवाच्या पातळीवर रसिकांना काही तरी देती व्हायला हवी, असा आग्रह धरताना, केवळ रसिकानुरंजन न करण्याचा हट्ट धरणाऱ्या कलावंत म्हणून वीणाताईंची ओळख कधीही पुसली जाणार नाही. त्यांचे वडील शंकरराव बोडस आणि बंधू नारायणराव बोडस हे दोघेही उत्तम गायक कलावंत. भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याचे ते पाईक. वीणाताईंना हा घराणेदार वारसा असा सहज मिळाला, तरीही गाणे येण्यासाठी त्यांनाही कसून मेहनत करावी लागली. ती करताना आपण सौंदर्याचा शोध घेत आहोत, याचे भान ठेवणेही आवश्यक होते. वीणाताईंनी स्वत:चेच कठोर परीक्षण करीत अशी मेहनत केली. गळ्यावर स्वरांनी अलगदपणे येण्यासाठी आधी त्यांना खूप मनवावे लागते, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच ख्याल, भक्तिसंगीत अशा प्रकारांमध्ये त्यांना प्रभुत्व मिळवता आले. पंडित भीमसेन जोशी अनेकदा असे सांगत की, आपले गायन सर्वात आधी आपल्याला आवडायला हवे. वीणाताईंनीही नेमके हेच केले. ग्वाल्हेर गायकीचे संस्कार आपल्या गळ्यावर चढलेले असताना किराणा आणि जयपूर घराण्यातील भुरळ पडलेल्या सौंदर्यस्थळांना आपल्या शैलीत अतिशय अलगदपणे सामावून घेताना, त्यांच्यातील सर्जनशीलता टवटवीत राहिली. त्यांचे पती हरि सहस्रबुद्धे हे संगणक क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचे नाव. त्यांनी वीणाताईंच्या संगीत प्रतिभेला जे सहकार्य केले, त्यामुळे त्यांना हा स्वरांचा संसारही अधिक अर्थपूर्ण करता आला. संगीतात घराण्यांच्या पोलादी भिंती वितळण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. घराण्याच्या अभिमानाचे दुराभिमानात रूपांतर झाल्यानंतर आपोआपच त्यातील कडकपणा कमी झाला. संगीत सभा आणि परिषदांमुळे इतर घराण्यांचे गाणे सहज ऐकण्याची शक्यता निर्माण झाली. तोपर्यंत दुसऱ्या घराण्याचे गाणे ऐकण्याचीही मुभा गाणे शिकणाऱ्यांना नसे. परंतु काळानुसार हे गाणे सर्वासमोर आले आणि त्यामुळे सगळीच घराणी एकमेकांसमोर उभी ठाकली. एकमेकांमधील आदानप्रदान वाढू लागले. घराण्याच्या शैलीचा आग्रह ठेवूनही हे घडू शकले, याचे कारण संगीतात प्रकांड अभ्यास केलेल्या पलुस्कर, करीम खाँ, अल्लादिया खाँ यांच्यासारख्या दिग्गजांनी संगीत करीत असतानाच त्यामध्ये वादचर्चाही घडवून आणली. एकमेकांच्या संगीताबद्दल कमालीचा आदर असल्याशिवाय हे घडून आले नसते. त्या चर्चाचा उपयोग पुढील पिढीसाठी झाला आणि त्यांची संगीताकडे पाहण्याची नजरही विस्फारली. पंडित भीमसेन जोशी हे अशा कलावंतांचे नेते म्हणायला हवेत. त्यांनी किराणा घराण्याच्या शैलीला धक्का न लावता अन्य घराण्यांतील सौंदर्यस्थळांना आपल्या गायकीत सामावून घेतले. वीणाताईंपुढे हाच आदर्श होता. त्यांनीही ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर असा त्रिवेणी संगम घडवताना आपली प्रतिभा पणाला लावली आणि त्यातून एका अतिसुंदर संगीताचा जन्म झाला. ही सगळी प्रक्रिया ग्रंथरूपाने लिहून ठेवण्याचे जे कार्य वीणाताईंनी केले, ते अधिक महत्त्वाचे. त्यांच्या निधनाने संगीताकडे नव्याने पाहण्याची एक प्रेरणाच संपली आहे.

 

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!