25 September 2017

News Flash

काळ सोकावतोय..

दहशतवाद्यांना, गुंडांना मानवाधिकार आहेत, मग सैनिकांच्या आणि पोलिसांच्या मानवाधिकारांचे काय?

लोकसत्ता टीम | Updated: June 22, 2017 3:20 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दहशतवाद्यांना, गुंडांना मानवाधिकार आहेत, मग सैनिकांच्या आणि पोलिसांच्या मानवाधिकारांचे काय? फिल्मी म्हणतात तशा प्रकारचा हा संवाद. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही मोठय़ा सात्त्विक संतापाने तोच सवाल केला होता. सुकमा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी विचारले होते, ‘आपली कालबाह्य़ विचारधारा पसरविण्यासाठी हिंसेचा मार्ग निवडणाऱ्यांसाठीच केवळ मानवाधिकार असतात काय? सामान्य नागरिक आणि सुरक्षारक्षकांना ते नसतात काय?’ तर या प्रश्नाचे ‘अधिकृत’ उत्तर आता मिळाले आहे. ते आहे- नसतात. २४ एप्रिलच्या ज्या सुकमा हल्ल्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या २५ जवानांना मारले, त्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारचा मानवाधिकारांचा भंग झाला नसल्याचे सीआरपीएफने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ भयंकर आहे. सुरक्षा दलांतील कर्मचाऱ्यांच्या काही घटनात्मक अधिकारांवर सरकारचे र्निबध असतात; परंतु त्या अधिकारांत जगण्याच्या अधिकाराचा समावेश नसतो. परंतु नक्षलवाद्यांनी जवानांना मारणे हा जवानांच्या मानवाधिकारांचा भंग नाही, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे असेल, तर त्याचा अर्थ त्या जवानांना घटनेने दिलेला जगण्याचा अधिकारच नाकारणे असा आहे. मानवाधिकारांचे याहून मोठे उल्लंघन अन्य कोणते नसेल. खरे तर व्यंकय्या नायडू यांच्यासारख्या विचारवंतांनी याबाबत आता आवाज उठवला पाहिजे; परंतु ते तसे करणार नाहीत. त्यांच्या ठिकाणी कोणताही – अगदी काँग्रेसचाही मंत्री असता, तरी तो तसे करणार नाही. याचे कारण मानवाधिकार हे सर्वसामान्यांनी अर्निबध सत्तेला दिलेले आव्हान असते हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. म्हणूनच सत्तेचा मानवाधिकारांना विरोध असतो. ती हुकूमशाही असेल, तर तो थेट असतो. लोकशाहीत त्याला मर्यादा येतात. त्यांवर मात करण्याचे एक साधन म्हणजे दुष्प्रचार. उपरोक्त सवाल हा त्याचाच एक भाग हे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. वरवर साधासरळ वाटणारा हा प्रश्न आपल्या मनात मानवाधिकार कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण करण्याचे काम करीत असतो. ते दहशतवाद्यांचे, समाजकंटकांचे पाठीराखे असतात असा अपसमज निर्माण करीत असतो. यात खुबी ही असते, की त्यात दंडसत्ताच पोलीस असते आणि दंडसत्ताच न्यायाधीश. म्हणजे कोण दहशतवादी हे सत्ताधारीच ठरवणार. ते सांगतात त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवायचा. ‘चकमक संस्कृती’ फोफावली ती त्यातूनच. पोलीस एखाद्याला गोळ्या घालणार आणि सांगणार की तो गुंड होता. यातून आपल्याला ‘ताबडतोब फैसला’ झाल्याचे फिल्मी समाधान मिळते. मारला गेला तो खरेच गुंड वगैरे होता का या भानगडीत पडण्याचे आपल्याला काही कारण नसते. कायद्याचे राज्य वगैरे कल्पना तर आपल्यापासून खूपच दूर असतात. आपल्या हे ध्यानातच येत नाही, की यातून समाजावर सत्तेचे पाश आवळले जात असतात. ते जेव्हा आपल्यातील एखाद्याच्या मानेपर्यंत येतात, तेव्हा मात्र खूपच उशीर झालेला असतो. अनेक जण वैयक्तिक पातळीवर हे अनुभवत असतात. त्यात सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असतात, तसे सामान्य नागरिकही असतात. दंडसत्तेच्या या खेळाला विरोध करणारा मानवाधिकार मात्र तोवर शक्तिहीन झालेला असतो. कारण त्याला हवे असलेले जनतेचे बळच त्याच्याविरोधात उभे करण्यात दंडसत्तेला यश आलेले असते. कालपर्यंत जवानांच्या, पोलिसांच्या नावाखाली मानवाधिकारांना विकासद्रोही, समाजद्रोही ठरविले जात होते. आता त्याच जवानांनाही मानवाधिकार नाही, असे सांगण्यात येत आहे. सीआरपीएफच्या कारवाईचे तपशील दडविण्यासाठी हे करण्यात येत आहे असे जरी मानले, तरी तत्त्वत: ते चुकीचेच आहे. यातून मानवाधिकारांची म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच, पण त्याहून काळ सोकावण्याचे भय अधिक आहे.

First Published on June 22, 2017 3:19 am

Web Title: venkaiah naidu on terrorists human rights
 1. P
  pritam lade
  Jul 10, 2017 at 2:37 pm
  प्रथम धन्यवाद सर ! कारण पहिल्यांदा सैनिकांच्या ानु ीपूर्वक लेख तुम्ही लावलात. आतंकवाद्यांच्या मरणाला हजारो लोक ज ेत. हे दाखवण्यापेक्षा सैनिक काश्मीरमद्दे किती लोकांची मदत करतात हे. किती मुलांना शिक्षण पुरवितात याचा लेखाजोखाही जरा वृत्तपत्रात दाखवत चला साहेब. म्हणजे विनाकारण लोंकांमद्धे काकतालीय न्याय निर्माण होणार नाही. वृत्तपत्र खपवण्यासाठी देश खपवू नका म्हणजे बरं होईल.
  Reply
  1. V
   Vijay Raybagkar
   Jun 22, 2017 at 9:43 am
   या जगात स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार कुणालाही नसतो हा निसर्गाचा नियम आहे. जीवो-जीवस्य जीवनं हा मूळ सिद्धांत. त्याला मानवाने आपल्या सोयीने वाकवण्याचा उद्योग अद्याप थांबविलेला नाही. जोवर इतर प्राणी मरत होते (आणि आहेत) तोवर त्यांच्या अधिकारांचा विचार कुणी करताना दिसले नाही, मात्र खुद्द माणसेच दुसऱ्या देश/वंश/धर्मांच्या जीवावर उठल्यावर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होत असल्याने सर्व मानव-निर्मित, कागदोपत्री छान दिसणारे नियम गळून पडणार हे सुद्धा नैसर्गिकच म्हणावे लागेल! श्रीलंकेने जेव्हा हे केले तेव्हाच त्यांचा देश हिंसाचारातून बाहेर पडू शकला हे याचे ढळढळीत उदाहरण आहे.dw942
   Reply
   1. R
    rmmishra
    Jun 22, 2017 at 8:45 am
    तुमचे प्रतिपादन चुकीचे वाटते। मानवाधिकार हा सामान्यान्च्या रक्षणासाठिच असतो। सत्ताधा-यान्ना हा लागु होत नाही। जेम्व्हा तुम्हि सरकारी यन्त्रनेत नोकरि करता तेम्व्हा तुमचा हा मानवाधिकार सम्पतो, कारन तुम्हि सत्ताधा-यान्पेेकि एक होता। तुमच्या हातात सत्ता येते आनि त्याचबरोबर सामान्य लोकान्वर अन्याय व अत्याचार करन्याचि ताकदहि। सामान्य लोकान्जवल ही सत्ताही नसते आनि अन्याय करन्याचि ताकदहि। म्हनुन मानवाधिकार हा सामान्य लोकान्करिता त्यान्चे जीवित सुरक्षित ठेवन्यासाठि असतो। सरकारी नौकरी करना-यान्ना हा अधिकार नाही।
    Reply