गिधाडांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या डायक्लोफिनॅकवरील बंदी आणि गिधाडांची संख्या पुन्हा एकदा वादळाच्या गर्तेत सापडण्याची शक्यता आहे. एकटय़ा डायक्लोफिनॅकवर गिधाडांच्या मृत्यूचे दोषारोपण करणे कितपत संयुक्तिक आहे, हे पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली आहे. डायक्लोफिनॅक हे वेदनाशामक औषध माणसांसाठी आणि जनावरांसाठीसुद्धा वापरले जाते, पण त्या दोघांनाही दिल्या जाणाऱ्या मात्रेत फरक आहे. डायक्लोफिनॅकचा वापर केलेली जनावरे जेव्हा मृत्युमुखी पडतात आणि ती जनावरे गिधाडे खातात तेव्हा गिधाडांचाही मृत्यू होतो. मात्र, ज्या मृत जनावराच्या शरीरात डायक्लोफिनॅकची मात्रा अधिक असेल तरच ते जनावर खाणारी गिधाडे मृत्युमुखी पडतात. अन्यथा, त्याचा परिणाम गिधाडांवर होत नाही हे सत्य आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) मात्र सरसकट डायक्लोफिनॅकला गिधाडांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवून त्यावर पूर्णपणे बंदी आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवला आहे. अलीकडेच केंद्राने यासंदर्भातला एक निर्णय जाहीर केला. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या डायक्लोफिनॅकवर पूर्णपणे बंदीचा नाही, पण त्याचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातला अध्यादेश काढला. मात्र, डायक्लोफिनॅक हे एकमेव कारण गिधाडांच्या मृत्यूसाठी कारणीभूत नाही. हिवताप, किटकनाशके आणि खाद्य या तीन गोष्टीसुद्धा गिधाडांच्या मृत्यूसाठी तेवढय़ाच कारणीभूत आहेत. ‘नावार’ या संस्थेचे डॉ. अजय पोहरकर यांनी ते सिद्ध केले आहे. दुसरीकडे याच ‘बीएनएचएस’ने गिधाडांची संख्या वाढत असल्याचा दावा केला आहे. हा दावाही पोहरकर यांनी साफ फेटाळून लावला आहे. दशकभरापूर्वी गिधाडांची संख्या १०० असल्याचे ‘बीएनएचएस’ने सांगितले आणि आता सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही संख्या चौपट वाढली आहे. मुळातच वर्षांतून एकच अंडी देणाऱ्या या पक्ष्याची संख्या दहा वर्षांत चौपट कशी काय वाढू शकते, याचे उत्तर ना ‘बीएनएचएस’कडे आहे, ना सरकारकडे आहे. गिधाडांची गणना करता येणे शक्यच नाही आणि ती गणना करायची झाल्यास त्यांच्या फिरण्याचा म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट हा कालावधी सोडून सप्टेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी या काळात गणना करावी लागेल. अन्यथा एकच गिधाड दुसऱ्या ठिकाणीही नोंदले गेल्यास ती संख्या वाढलेलीच दिसेल. गिधाडांचा मृत्यू आणि गिधाडांची आकडेवारी या दोन्ही गोष्टी संभ्रमित करणाऱ्या आहेत. डायक्लोफिनॅकच नव्हे तर कीटकनाशकांची बाधा झालेल्या आणि हिवतापग्रस्त गिधाडांना जीवदान देऊन त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची कामगिरी डॉ. अजय पोहरकर यांनी केली आहे. हिवतापग्रस्त गिधाडांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्याचा जगातील पहिला प्रयोग त्यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांची दखल घेतल्या गेली आहे. मात्र, ढिम्मच असलेले राज्य आणि केंद्र सरकारसुद्धा या व्यक्तिमत्त्वाच्या प्रयोगाची दखल घेण्यास तयार नाही. ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ ही संकल्पनासुद्धा याच व्यक्तीची, पण त्यालाही निधी देण्यास सरकारने हात आखडता घेतला. त्याचवेळी विदेशी निधी मिळवणाऱ्या श्रीमंत संस्थांच्या ‘एसी’त बसून केलेल्या संशोधनासाठी सरकारचा हात कधीच आखडत नाही. त्यांच्याच म्हणण्याची ‘री’ ओढत सरकार हळूहळू डायक्लोफिनॅक पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यामागे या संस्थेला दुसरे औषध बाजारात आणावयाचे असू शकेल, हे अन्य ‘एनजीओं’च्या कार्यपद्धतीचा अनुभव असूनदेखील सरकारच्या का आणि कसे लक्षात येत नाही, हे कोडेच आहे!