आधुनिक संस्कृत वाङ्मयाचा विचार करताना पंडिता क्षमा राव यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. संस्कृतमधील चरित्रकार, एकांकिकाकार व गद्य-पद्यलेखिका म्हणून क्षमा राव परिचित आहेत. त्यातही आधुनिक कथाप्रकारांतील पाश्चात्त्य धर्तीच्या लघुकथा हा वाङ्मय प्रकार संस्कृतमध्ये प्रथम हाताळला तो त्यांनीच. आपले पिता वेदवाङ्मयाचे अभ्यासक, संशोधक शंकर पांडुरंग पंडित यांचा वारसा प्रगल्भपणे पुढे नेणाऱ्या क्षमा पंडित-राव यांच्याविषयी.

‘चल घरात ये. अभ्यास करायचा सोडून खेळतेस काय सारखी? एक लक्षात घे, की ‘विद्याधनम् सर्वधनप्रधानम्’ सगळ्यात विद्याप्राप्ती हेच खरे महत्त्वाचे धन.’ मी खेळत होते अंगणात! दादांची हाक आल्यावर हातात धरलेलं फुलपाखरू अलगद सोडून दिलं. जराशी घुश्शातच घरात शिरले खरी, पण मन अजून फुलपाखरातच अडकलं होतं. त्या वेळी त्यांच्या सांगण्याचं महत्त्व समजलं नाही पण वाक्यं मात्र कानात आणि मनात पक्की ठसली होती. मी होते त्या वेळी लहान- चारेक वर्षांची. दादा आजारी होते आणि त्यामुळे सगळं घर हवालदिल झालेलं होतं. आम्ही न्यायमूर्ती रानडे यांच्या बंगल्यात, मुंबईला राहात होतो. ते दादांचे खास मित्र. पुढे दादा लगेचच गेले. त्यांचा सहवास फारसा लाभला नाही. तरी आईने सतत त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगून त्यांची स्मृती जागृत ठेवली आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्हा मुलांना वाढवलं.’

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

वेदवाङ्मयाचे अभ्यासक, संस्कृत, प्राकृत, मराठी साहित्यातील प्रसिद्ध संशोधक व ‘वेदार्थयत्न’ या मासिकाचे कर्ते शंकर पांडुरंग पंडित यांची क्षमा पंडित-राव ही कन्या. तिने वडिलांबद्दल सांगितलेली ही एक आठवण. एखादं कुटुंब इतक्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवू शकतं आणि विद्वत्तेचा वारसा पिढय़ान्पिढय़ा कसा चालत येतो हे या कुटुंबाकडे पाहून आपण थक्क होतो.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शंकर पांडुरंग पंडित (१८४०-१८९४) या मराठी संशोधकाने प्राचीन भारतीय साहित्य व संस्कृतीचा अभ्यास हाच आपल्या आयुष्याचा ध्यास मानला आणि ज्ञानसाधनेच्या मार्गावरून अखंड वाटचाल केली. अठराव्या वर्षांपर्यंत केवळ अक्षरओळख असणाऱ्या पंडितांनी आपल्या अवघ्या चौपन्न वर्षांच्या आयुष्यात ऋग्वेदादी वेदांचे सांगोपांग भाषांतर आणि तुकारामाच्या गाथेसह अनेक मराठी, संस्कृत व प्राकृत ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्त्या संपादित करून संशोधनाचा मानदंडच निर्माण केला.

आपल्या विद्वत्तेच्या जोरावर एखाद्या पर्वतशिखरासारख्या उत्तुंग उंचीवर पोचलेल्या आपल्या वडिलांविषयी मुलांना अभिमान वाटणं साहजिकच होतं. परंतु ते केवळ वाटणं राहिलं नाही. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. शंकर पांडुरंगांना आठ मुलं- चार मुलगे व चार मुली. त्यांपैकी वामन पंडित हे मोठे चित्रकार होते. इतर तिघेही कायदा, वैद्यक आदी क्षेत्रांत आपल्या कामाने प्रसिद्ध होते. पण आपल्या वडिलांच्या संस्कृतनैपुण्याचा खरा वारसा चालवला तो पंडिता क्षमा राव यांनी.

आज आधुनिक संस्कृत वाङ्मयाचा विचार करताना पंडिता क्षमा राव यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. संस्कृतमधील चरित्रकार, एकांकिकाकार व गद्य-पद्यलेखिका म्हणून क्षमा राव परिचित आहेत. त्यातही आधुनिक कथाप्रकारांतील पाश्चात्त्य धर्तीच्या लघुकथा (शॉर्ट स्टोरी)हा वाङ्मय प्रकार संस्कृतमध्ये प्रथम हाताळला तो त्यांनीच.

क्षमा राव यांना (१८९०-१९५४) पितृछत्र अगदीच अल्पकाळ लाभलं तरी काका, बॅरिस्टर सीताराम पंडित यांच्या मदतीने, त्यांच्याजवळ राजकोटला राहून क्षमाचं शिक्षण झालं. तत्कालीन प्रथेप्रमाणे मुलींना उच्च शिक्षण घेणं शक्य नसल्याने एखादी पदवी घेणं तिला शक्य झालं नाही. क्षमेची आई उषाबाई ही अतिशय विचारी व समंजस स्त्री होती. पतिनिधनानंतर त्या मुलांना घेऊन, पुण्याला आपल्या माहेरी काही काळ राहिल्या. त्या काळातही आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी घरी शिकवणी ठेवून, मुलांवर शिक्षण-संस्कार होतील याकडे लक्ष पुरवलं. संतसाहित्याचे अभ्यासक व चरित्रकार ल. रा. पांगारकर हे त्या वेळी या मुलांना संस्कृत शिकवायला जात असत. क्षमा जात्याच अत्यंत कुशाग्र बुद्धीची व तल्लख होती. तिने अनेक विषय भराभर आत्मसात केले.

तिचा विवाह मुंबईचे डॉ. राघवेंद्र राव यांच्याबरोबर झाला. विवाहानंतर तिचं आयुष्य एकदम बदललं. डॉ. राव यांची विद्वानांमध्ये, थोरामोठय़ांमध्ये ऊठबस होती. त्यांनी विषमज्वर (टॉयफॉइड) या रोगाविषयी विशेष संशोधन केले होते. डॉ. राव हे पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे आपल्या पत्नीच्या बुद्धिमत्तेची जाण ठेवत त्यांनी क्षमेसाठी खास संस्कृत शास्त्री नेमून तिच्या शिक्षणाची घरी सोय केली. ती इंग्लिश उत्तम प्रकारे बोलत असे, लिहीतही असे. याचबरोबर त्यांचे देश-परदेशात जाणे होते. त्या वेळी क्षमेने फ्रेंच, इटालियनही शिकून घेतले. वडिलांचा वारसा चालवत तीही बहुभाषाकोविद झाली.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सामाजिक सुधारणांचा आग्रह धरताना, मुलींनी शिक्षण घ्यावे असा शंकर पांडुरंगांचा ध्यास होता. त्यासाठी पुण्याला त्यांनी न्यायमूर्ती रानडे व इतरांच्या मदतीने हुजूरपागा या मुलींसाठीच्या शाळेची स्थापना केली. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या स्वत:च्या मुली या शाळेत गेल्या नाहीत. पण क्षमेच्या बाबतीत तिच्या पतीने दिवंगत सासऱ्यांच्या इच्छेची पूर्ती केलेली दिसते. डॉ. राव यांना ओबीई (ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर) हा किताब ब्रिटिश सरकारकडून मिळाला होता.

क्षमा राव आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत शिस्तप्रिय व वेळेचे मूल्य जाणणाऱ्या होत्या. सासरी मोठे कुटुंब. मुंबईत राहणे. त्यामुळे नातेवाईक, तसेच इतर मोठमोठे अधिकारी, गव्हर्नरादी लोक यांची ये-जा असे. त्यांच्या एका भाच्याने लिहिले आहे की, ‘सुटीत मामांकडे (डॉ. राव )राहायला गेले की मामी आम्हाला वाचण्याचा, चांगलं समजून घेण्याचा आग्रह धरत असे. तिच्या मुलांशी -लीला व मन्मथ- ती शक्यतो फ्रेंच किंवा इंग्रजीतच बोले. आमच्याही ते कानांवर पडे व काहीशी उत्सुकताही वाटे.’ क्षमा राव यांचा चुलतभाऊ म्हणजे रणजित पंडित, विजयालक्ष्मी पंडित यांचे पती. त्या मंडळींचेही जाणे येणे होते.

एकीकडे ब्रिटिशांशी व्यावहारिक संबंध असले तरी स्वत: क्षमा यांना भारतीय स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्याची फार इच्छा होती. महात्माजींचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. पण महात्माजींनी क्षमाला तशी अनुमती दिली नाही. मग त्या कस्तुरबांबरोबर गुजरातेतील खेडय़ापाडय़ांतून हिंडल्या. त्या वेळी तेथील खेडूत स्त्रियांचा पराक्रम व कणखरपणा त्यांनी पाहिला. या सत्यघटनांवर, अनुभवांवर आधारित लघुकथा त्यांनी लिहिल्या. त्यांचा संग्रह ‘ग्रामज्योति:’ या नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘कथापंचकम्’ हा पाच संस्कृत कथांचा संग्रह १९३२ मध्ये प्रसिद्ध झाला. यांची चांगलीच दखल घेतली गेली. वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक लघुकथांचा आकृतिबंध स्वीकारत, लघुकथेचे एककेंद्रित्व कायम ठेवत अतिशय सोप्या भाषेत या कथा लिहिल्या आहेत. आणखी विशेष म्हणजे या कथा पद्यात, अनुष्टुभ छंदात लिहिल्या आहेत. पद्यातून कथनात्मक निवेदन हा संस्कृतचा विशेष लेखिकेने पाळलेला दिसतो.

पुढे मात्र ‘कथामुक्तावली’ हा पंधरा कथांचा संग्रह त्यांनी संस्कृत गद्याच्या सर्व सामर्थ्यांनिशी प्रसिद्ध केला. संस्कृतसारख्या प्राचीन भाषेचे माध्यम वापरताना आधुनिक काळातील वाचकांना सोपं वाटावं यासाठी शब्दांची पुनरावृत्ती करत, संवादांवर भर देत रचना केली आहे. उदा.- ‘तापसस्य पारितोषिकम्’ या कथेत सहज संवाद येतात—

‘ऊर्मिला  – प्रसीद प्रसीद भगवन्’

‘गृहा – उत्तिष्ठ उत्तिष्ठ’ ‘स्वधर्मम् मा विस्मार्षी:’ इत्यादी.

या कथा स्त्रीकेंद्री व सामाजिक समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या आहेत. त्या काळाशी समकालीन वाटावेत असेच विषय निवडले आहेत. कथाभाग इथे देणं शक्य नाही, पण ‘परित्यक्ता’, ‘क्षणिकविभ्रम:’, ‘मत्स्यजीवी केवलम्’, ‘विधवोद्वाहसंकटम्’ यांसारख्या शीर्षकांवरूनही कल्पना येऊ  शकते.

आधुनिक संस्कृत लघुकथेची जननी ही क्षमादेवी राव यांची ओळख आहे तशीच संस्कृत चरित्रकार अशीही आहे. संतसाहित्याची आरंभापासून आवड असल्याने त्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास या संतश्रेष्ठांची चरित्रे, तसेच संत मीराबाईचे ‘मीरालहरी’ नावाचे चरित्र लिहिले. यासाठी शार्दूलविक्रीडित हे भारदस्त वृत्त वापरले. मीरेची कृष्णावरील उत्कट भक्ती वर्णन करताना किंवा मीरेची मनोरम मूर्ती वर्णिताना क्षमादेवींनी आपले शब्दभांडार अक्षरश: खुले केले आहे. प्राचीन संस्कृत काव्यातील वर्णनशैलीची छाप इथे चांगलीच जाणवते. ही चरित्रे परदेशी लोकांपर्यंतही पोचावीत म्हणून त्यांनी स्वत:च त्यांचे इंग्रजीत अनुवादही दिले आहेत. त्यावरून त्यांचे इंग्रजीतील नैपुण्यही जाणवते.

त्यांनी आपल्या वडिलांचे चरित्र अनुष्टुभ छंदात -‘शंकरजीवनाख्यानम्’ या शीर्षकाचे-लिहिले. या चरित्राची सर्वत्र खूपच प्रशंसा झाली. वडिलांचा अल्पकाळ लाभलेला सहवास व त्यात त्यांनी दिलेली शिकवण हे सांगताना मनावर कोरलेली वडिलांची मूर्ती त्यांनी यथायोग्य रीतीने वर्णन केली आहे. वडिलांनी प्रसंगानुरूप स्वाभिमानाची दिलेली शिकवण, राजानेही काही उगाच दिले तर घेऊ नये, आपल्या गुणांनी जे मिळेल तेच घ्यावे यांसारखी मूल्ये कशी शिकवली, त्यांचे महत्त्व मोठेपणी विशेष कसे वाटते याचे मोठे हृद्य वर्णन केले आहे.

या चरित्राला अनुरूप प्रस्तावना मराठीतील ‘साहित्यसम्राट’ न.चिं.केळकर यांनी संस्कृतमध्ये, त्याच छंदात लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पित्याचा वारसा पुत्र चालवतो, अथवा पुत्रानेच चालवायचा अशी आपल्याकडची पारंपरिक समजूत आहे. परंतु सुवर्णनिधीसंयुक्ता (सोन्यासारख्या गुणांनी युक्त) अशा या क्षमेने पित्याचे नाव अत्यंत समर्थपणे चालवले आहे.’ ते चरित्र वाचताना आपणही सहजच त्यांच्याशी सहमत होतो.

महात्मा गांधी हे क्षमादेवींना आदरणीय होते. त्या भावनेने त्यांनी ‘सत्याग्रहगीता’ नावाचे महाकाव्यच लिहिले. त्यात गांधींनी सत्याग्रहाची कल्पना कशी मांडली, अहिंसादी त्यांची तत्त्वे कोणती होती, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना कोणत्या हे (भगवद् गीतेप्रमाणे) १८ अध्यायातून, ६५० संस्कृत श्लोकांद्वारा सांगितले आहे. गांधी -आयर्विन करारापर्यंतच्या घटना त्यात आहेत. ही गीता १९३२मध्ये पॅरिसमध्ये प्रसिद्ध झाली, कारण इथे कोणी योग्य प्रकाशक त्यांना मिळाला नाही. नंतर त्याचा हिंदी अनुवाद झाला व अनेक आवृत्त्या निघाल्या. ते काव्य खुद्द गांधींनीही प्रशंसिले. त्यानंतर क्षमादेवींनी ‘उत्तर सत्याग्रहगीता’ही लिहिली व इंग्रजी अनुवादासह मुंबईत ती प्रकाशित झाली. १९४४ पर्यंतच्या, गांधी-जीना भेटीपर्यंतच्या घटना त्यात वर्णिल्या आहेत. मात्र गांधीजींच्या हयातीत ती प्रकाशित न झाल्याने त्यांच्या चरणी ही गीता अर्पण करता आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती वाखाणली गेली.

याच काळात त्रिवेंद्रम येथे एक १९३९ मध्ये एक ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स झाली. त्या परिषदेचं उपरोधिक शैलीतील वर्णन त्यांनी विचित्र-परिषद्-यात्रा या नावाने प्रसिद्ध केलंय.

शंकर पांडुरंगांचा वारसा क्षमा राव यांनी चालवला. त्यांचा वारसा त्यांच्या मुलीने, लीला (राव) दयाल हिने चालवला. या मायलेकींचा अनुबंध सर्व पातळ्यांवर फुललेला दिसतो. तीही आईच्या तालमीत संस्कृत, फ्रेंच, इंग्रजी इत्यादी भाषा शिकली. आईच्या संस्कृत कथांवर आधारित संस्कृत नाटके तिने लिहिली, त्यांचे प्रयोगही झाले. ‘असूयिनी’, ‘गणेशचतुर्थी’, ‘क्षणिकविभ्रम’, ‘मिथ्याभ्रमणम्’ अशी तिची अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. त्यात तिने ‘गणपतीबाप्पा मोरया’, ‘खद्दरावेष्टित:’, ‘इन्किलाब झिंदाबाद’, ‘धनदानपुस्तिका’ (चेकबुक) अशी आधुनिक काळास योग्य अशी  शब्दनिर्मितीही केलेली दिसते. ती स्वत: नृत्यविशारद होती आणि तिने ‘लास्यलहरी’सारखी नृत्यविषयक पुस्तके लिहिली. एवढेच नव्हे तर ‘क्षमाचरितम्’ नावाचे आईचे चरित्रही तिने लिहिले. संस्कृतची प्रतिष्ठा वाढावी, ती वापरात असावी म्हणून या मायलेकींनी केलेले हे प्रयत्न वाखाणण्यासारखेच आहेत.

क्षमा राव लॉन टेनिसच्या चॅम्पियन. त्यांनी येथील दुहेरी, मिश्र विजेतीपदे मिळवलेली. लीलाने त्यापुढे जाऊन विम्बल्डन गाठले व पहिली फेरी जिंकली. पुढे जाऊ  शकली नाही तरी विम्बल्डनला प्रवेश मिळवून जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

स्त्रीच्या विकासमार्गात असंख्य अडथळे असताना बुद्धिमत्ता, संस्कार, जिद्द व घरचा पाठिंबा यांच्या जोरावर क्षमा राव यांनी एक प्रकारे इतिहासच घडवला. लेखनाद्वारे सामाजिक समस्यांचे दिग्दर्शन केले, स्वातंत्र्यचळवळीला साहाय्य केले. आपल्या पितृवंशाचा धागा समर्थपणे पुढे नेताना सासरघरालाही प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रीच्या सर्वागीण विकासाचा एक उत्तम नमुना समाजापुढे ठेवला. रानडे-आगरक-फुले-कर्वे इत्यादी समाजसुधारकांनी याचसाठी धडपड केली होती ना?

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com