उदाहरणार्थ मोटारी बनवणाऱ्या कंपनीला सर्वसाधारणपणे कसली काळजी असेल? तिचा स्पर्धक कोण असेल? किंवा एखाद्या उत्तम वकिलाला कोणती भीती सतत भेडसावत असेल? किंवा विविध सेवा देणाऱ्या एखाद्या रुग्णालयाचे लक्ष कोणाकडे असेल? किंवा जगभरात एखादी मोठी हॉटेल साखळी असणारी कंपनी उद्याचा विचार करताना कोणते मुद्दे डोळ्यापुढे ठेवत असेल? किंवा..

अशी अनेक उदाहरणं देता येतील आणि त्याची उत्तरंदेखील कोणाकडेही तयार मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ मोटार बनवणाऱ्या कंपनीला दुसऱ्या मोटार बनवणाऱ्या कंपनीची धास्ती वाटत असेल किंवा एखाद्या वकिलाला आपल्यापेक्षा कोणी अधिक तज्ज्ञ वकील तर आसमंतात तयार होत नाहीये ना याची भीती असेल किंवा रुग्णालयांचं लक्ष आपल्यापेक्षा जास्त चांगलं रुग्णालय तर आसपास तयार होत नाही याकडे असेल किंवा हॉटेलांना दुसऱ्या हॉटेल साखळीचा विचार सतत करावा लागत असेल.. किंवा.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

पण ही सगळी उत्तरं साफ चूक आहेत. म्हणजे कालबाह्य़ आहेत. एके काळी म्हणजे आजपासून पाच-सहा वर्षांपर्यंत ही उत्तरं बरोबर होतीही. पण आता ती नाहीत. मग या प्रश्नांची आताची बरोबर, कालसापेक्ष अशी उत्तरं कोणती?

तर उदाहरणार्थ मोटारी बनवणाऱ्या कंपनीला गुगल किंवा अ‍ॅपलपासून धोका वाटतोय.. वकिलांना आयबीएम या कंपनीची दहशत वाटतीये.. रुग्णालयांना विविध तपासण्यांचा प्राथमिक व्यवसाय आपल्याकडून फोन कंपन्या खेचून घेणार याची धास्ती आहे आणि हॉटेल कंपन्यांना Airbnb ची भीती वाटतीये.

याचा अर्थ इतकाच की जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत त्यांना आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यापेक्षा अपारंपरिकाकडून जास्त धोका आहे. हे वास्तव आहे. त्याची चुणूक आता दिसायला लागलीये. उदाहरणार्थ जगातील सगळ्या बडय़ा मोटार कंपन्या सध्या श्वास रोखून तीन कंपन्यांकडे नजर ठेवून आहेत. त्यातली एक म्हणजे गुगल, दुसरी अ‍ॅपल आणि तिसरी टेस्ला. यातल्या पहिल्या दोन म्हणजे गुगल आणि अ‍ॅपल या चालकविरहित मोटारी बनवतायत. त्यात त्यांनी मोठी आघाडी घेतलीये. आता असं सांगितलं जातंय की २०१८ साली अमेरिकेच्या रस्त्यांवर अशा चालकविरहित मोटारी धावायला लागतील. तिकडे त्याची तयारी इतकी झालीये की संबंधित कायदेसुद्धा बदलायच्या हालचाली सुरू झाल्यात.

म्हणजे या चालकरहित मोटारी आल्या की फोनच्या अ‍ॅपवरनं जेव्हा हवी असेल तेव्हा बोलवायची. त्या अ‍ॅपवरनंच आपल्याला जिथं कुठं जायचं असेल तो पत्ता सांगायचा. तो मोटारीच्या संगणकाच्या डोक्यात भिनला की काम झालं. नंतर पार्किंगचा प्रश्न नाही, वाहन परवान्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आरटीओचीसुद्धा नाही. सगळेच प्रश्न निकालात. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं तर असं की एकदा का चालकविरहित मोटारी आल्या की मोटारी विकत घ्यायची प्रवृत्तीसुद्धा कमी कमी होत जाईल. कशाला हवं ते धूड घरात, असा विचार केला जाईल. म्हणजे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीला वाहन चालवण्याचा परवानाच काढावा लागणार नाही. आता हे वाचून आरटीओशी संबंधित जे कोणी असतील त्यांच्या पोटात गोळा येईलही.

सर्वसाधारण व्यक्ती मोटार चालवताना अपघाताची जितकी शक्यता असते त्यापेक्षा लाखभर पटींनी ही शक्यता स्वयंचलित मोटारींबाबत कमी होते. याचा अर्थ विमा कंपन्यांच्या पोटावर पाय. अपघातच झाले नाहीत तर विमा कंपन्यांचं कसं होणार, हा प्रश्नच आहे. तेव्हा या स्वयंचलित मोटारींमुळे आपलं सगळं जगणंच बदलेल. आताच्या वातावरणात जास्तीत जास्त जणांची धाव शहरांकडे असते. पण मोटार प्रवास, इंधन हे जास्तीत जास्त स्वस्त झालं की ती गरजही कमी होईल. कार्यालयीन प्रवासाविषयी इतकी नाखुशी राहणार नाही.

आणखी एक घडलंय. आयबीएम या संगणक कंपनीचा एक कार्यक्रम आहे. आयबीएम वॉटसन नावाचा. यातनं कायदेविषयक सल्ला मिळतो. हवा तो सल्ला. काही क्षणांत. सध्या हा साध्या छोटय़ा-मोठय़ा मुद्दय़ांपुरताच आहे. कंपनीचा प्रयत्न आहे त्यात गुंतागुंतीचे मुद्दे वाढवण्याचा. त्याचा परिणाम असा की वकिलांना मिळणारी साधी साधी कामं कमी झालीयेत. याचा परिणाम इतका आहे की पुढच्या साधारण दशकभरात सर्वसाधारण वकिलांची गरज ९० टक्क्यांनी कमी होईल असं भाकीत तिथले तज्ज्ञ वर्तवतायत. म्हणजे फक्त विशेष मंडळी तेवढी राहतील. या वॉटसनची भीती आतापासूनच इतकी निर्माण झालेली आहे की विधि शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांवर त्याचा परिणाम दिसू लागलाय.

हॉटेलांच्या क्षेत्रात काय होणार याची चुणूक Airbnb नं दाखवून दिली आहे. या कंपनीच्या मालकीचं एकही हॉटेल नाही. पण तरीही ही कंपनी बडय़ा बडय़ा हॉटेल कंपन्यांना घाम फोडतीये. म्हणजे ती उबरसारखं करते. उबरच्या मालकीची जशी एकही मोटार नाही तरीही जगातली आज ती सगळ्यात मोठी मोटारी भाडय़ाने देणारी कंपनी आहे, तसं या Airbnb कंपनीचं. निवासस्थानाच्या शोधात असणारे आणि निवासस्थानं भाडय़ानं देऊ इच्छिणारे या दोघांना एका प्रतलावर आणण्याचं काम तेवढं Airbnb नं केलं. उबरनं जसं मोटारमालक आणि मोटारप्रवासी यांची मोट बांधून देणारं सॉफ्टवेअर विकसित केलं तसंच Airbnb ने केलं. याचा परिणाम असा की पारंपरिक हॉटेलांचा व्यवसाय चांगलाच फटका खाऊ लागलाय. प्रवाशांमध्ये एक घटक असा नेहमीच असतो की ज्यांना हॉटेलांपेक्षा घरसदृश व्यवस्थेत राहायला आवडतं. Airbnb मुळे अनेकांची ती गरजही भागायला लागलीये. हे सगळे झाले तसे नुसते वरवरचे बदल.

खरा बदल आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात. म्हणजे Artificial Intelligence. या अशा बुद्धिमत्तेचं वाढतं प्रभाव क्षेत्र, यंत्रमानवांचा वाढता वापर या सगळ्यांमुळे आज माणसाला करावी लागतात त्यातली बरीचशी कामं संगणक, यंत्रमानव करू लागलेत. उदाहरणार्थ आयबीएमच्या वॉटसनचाच एक वैद्यकीय आविष्कार आहे. तो व्यक्तीच्या शरीरात कर्करोगाची लागण झालीये किंवा काय हे शोधून काढू शकतो. इथपर्यंत एक वेळी ठीक. पण सर्वसाधारण वैद्यकापेक्षा या वैद्यकीय वॉटसनची अचूकता चारपट अधिक आहे. म्हणजे याचा परिणाम उघडच आहे. वैद्यकांच्या पोटावर पाय.

तो असाही येणारच आहे कारण स्टार ट्रेकमध्ये होतं तसं ट्रायकॉर्डर एक्स नावाचं उपकरण विकसित होतंय. यंदाच्या वर्षांत ते बाजारातही येईल. काय करतं हे? तर हे आपल्या स्मार्ट फोनच्या साहाय्यानं काम करतं. व्यक्तीच्या बुब्बुळाचं छायाचित्र, रक्ताचा नमुना आणि उच्छ्वास ते गोळा करतं. त्यानंतर या तीन घटकांच्या आधारे हे उपकरण स्वत:हून ५४ इतक्या वैद्यकीय चाचण्या करतं आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याचं वर्तमान अगदी काही मिनिटांत मिळू शकतं. म्हणजे केवळ चाचण्यांसाठी म्हणून रुग्णालयांत जाण्याची, डॉक्टरांना कट देण्याची काही गरजच नाही. या उपकरणामुळे उलट वैद्यकीय सेवाच रुग्णापर्यंत जाईल. म्हणजे नंतर गरज राहील ती फक्त विशेष शल्यकांची. साधे शल्यक नामशेषच होतील. कारण त्या क्षेत्रातही यंत्रमानव झपाटय़ानं प्रगती करतोय. तेव्हा आंत्रपुच्छ काढण्यासारख्या नमित्तिक शस्त्रक्रिया यंत्रमानवांच्या हातीच जातील. याच्या जोडीला त्रिमिती छपाई आहेच. हे तंत्रज्ञान आताच धुडगूस घालू लागलंय.

हे सगळं आताच नोंदवायचं कारण म्हणजे अलीकडेच डेम्लर बेंझ कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे सगळे मुद्दे मांडले गेले. या सभेचं म्हणणं इतकंच होतं की हे आसपासचे बदल इतके झपाटय़ाने होतायत तर आपण कर्मचाऱ्यांनी त्यासाठी तयार राहायला हवं. या वेळच्या सादरीकरणातलं शेवटचं वाक्य फारच मोलाचं आहे. ते असं :

जगात तीनच गोष्टी शाश्वत आहेत. मृत्यू, कर आणि बदल.. म्हणजे परिवर्तन. यातल्या तिसऱ्यासाठी सतत तयार राहा असा त्या सभेचा मथितार्थ.

इतक्या प्रचंड आघाडी घेतलेल्या कंपनीला तितक्याच प्रगत व्यवस्थेत असूनही हे सगळं सांगावंसं वाटलं.

आणि आपल्याला तर किती अंतर कापायचंय.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber