ट्रम्प म्हणतात, स्थलांतरितांनी अमेरिकेची वाट लावली. सबब आता अमेरिकेत स्थलांतरित नकोत. अमेरिका फक्त अमेरिकनांची. ते जेव्हा असा स्वदेशीचा नारा देत होते त्या वेळी त्यांची वैयक्तिक स्थिती कशी होती?
संस्कृती उत्क्रांत होत असताना त्या प्रवाहात मधले अनेक ओहोळ, झरे मिसळत असतात की तो प्रवाह एखाद्या बंदिस्त नळीतनं वाहतो?
उत्तर या प्रश्नाचं माहीत असलं तरी हा प्रश्न पडायचं काही थांबत नाही. तो आत्ता पडला त्यामागची कारणं दोन. पहिलं म्हणजे एका मित्राचे स्वदेशप्रेमी वडील आणि दुसरं म्हणजे अर्थातच अमेरिकेत अध्यक्षपदी निवडले गेलेले ट्रम्प. पहिले इकडे मुंबईत असतात आणि दुसरे तिकडे अमेरिकेत; पण गंमत म्हणजे दोघांची भाषा एकच आहे. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणावा का त्याला? क्रूर विनोद ठरेल तसं करणं.
कारण हे वडील अजिबात जागतिकीकरणप्रेमी नाहीत. आपला देश, आपले मजूर, आपली उत्पादनं वगैरेंवर त्यांचा ठाम विश्वास आहे. धर्मप्रेमी आहेत. उपास-तापास करतात; पण सर्व काही स्वदेशी. इथपर्यंत ठीक आहे; पण इतरांनीही तसं करावं असा त्यांचा आग्रह असतो. घरचे कावतात त्यामुळे. तर परवाच्या दिवशी माझा मित्र त्यांना वैतागून म्हणाला, अहो, काय घेऊन बसलाय हे स्वदेशी.. तुम्ही उपवासाला खाता तो बटाटा परदेशातनं आलाय.. मिरची आपल्याकडची नाही – साबुदाणा तर नाहीच नाही..
मित्र रागावलेला होता. त्यामुळे यादी जरा जास्तच लांबली. त्याचा उद्वेग जाणवण्यासारखा होता. त्याच रेटय़ात तो म्हणाला.. त्यांना तरी दोष किती देणार म्हणा.. ते ट्रम्प तरी दुसरं काय करतायत.. घरी हे वडील आणि तिकडे ते ट्रम्प.. दोघेही एकाच माळेचे मणी! या मित्राचा मुलगा आयटी कंपनीत आहे. ट्रम्प यांची एकूण धोरणं लक्षात घेता त्या मुलाचं अमेरिकेत जाणं कंपनीनं लांबवलंय. तेव्हा मित्राच्या उद्वेगामागे असाही अर्थ आहे. असो.
त्याच्या वडिलांचं जाऊ द्या; पण ट्रम्प यांच्यामुळे ही स्वदेशीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये. अशा वेळी अमेरिकेचं काय काय स्वदेशी आहे हे यानिमित्तानं तपासायला हवं.
अमेरिकेचं राष्ट्रप्रेमी देशगीत आहे ‘गॉड सेव्ह अमेरिका’. त्याचा जनक आयर्विग बर्लिन. तो काही अमेरिकी नव्हता. बेलारूस या देशाचा मूळचा तो. अमेरिकेत स्थलांतरित म्हणून आला. तिथेच राहिला. हे आपल्यासारखंच. म्हणजे ‘सारे जहाँसे अच्छा..’ लिहिणारा इक्बाल हा कवी पाकिस्तानात गेला. तिकडे गेल्यावर हिंदोस्ताला सारे जहाँसे अच्छा असं म्हटल्याबद्दल त्यानं खंत व्यक्त केली. ते आपल्याकडे अनेकांना माहीत नाही. आपण त्याचं ‘सारे जहाँसे..’ प्रेमानं अगदी २६ जानेवारीच्या संचलनातही वाजवत असतो.
तर अमेरिका म्हणजे व्हाइट हाउस. वॉशिंग्टनमधलं ते विख्यात निवासस्थान. जगातल्या एकमेव महासत्तेच्या प्रमुखाचं घर; पण तेसुद्धा स्थलांतरितानं बांधलंय. जेम्स होबन हा त्याचा आरेखनकार. मूळचा तो आर्यलडचा. अमेरिकी म्हणूनच पुढल्या पिढय़ांत तो ओळखला जातो.
वॉशिंग्टननंतरचं अमेरिकेतलं सगळ्यात लोकप्रिय शहर म्हणजे न्यूयॉर्क. पार्क लेन, वॉल स्ट्रीट वगैरेच्या जोडीनं ते शहर ओळखलं जातं ते विख्यात ब्रुकलीन ब्रिजमुळे. रात्री दिव्यांच्या उजेडात काय सुंदर दिसतो हा पूल; पण तोही अमेरिकनानं बांधलेला नाही. जॉन रोबलिंग हा जर्मन विस्थापित त्याचा जन्मदाता. तोही जर्मनीतनं स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आलेला. पुढे अल्बर्ट आइन्स्टाइन त्याच मार्गानं अमेरिकावासी झाला. तोही मूळचा जर्मन ज्यू. त्या वेळी तरुणपणीच त्यानं जर्मनीचं राष्ट्रीयत्व नाकारलं. का? तर त्या वेळचा जर्मनी फारच राष्ट्रवादी आणि असहिष्णू होता म्हणून.
अमेरिका ओळखली जाते ती जीन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरटासारख्या जाड, पण रंगानं निळ्या, अशा दणकट कापडाच्या बनलेल्या विजारींमुळे. त्यातला लेवाईस नावाचा ब्रँड म्हणजे जीन्सप्रेमींचा अत्यंत आवडता. तो अमेरिकी; पण कर्ता अमेरिकी नाही. जेकब युफीस हा मूळचा रशियातला. आताच्या लाटवियातला. ज्यू. व्यवसायानं शिंपी. वयाच्या २३ व्या वर्षी तो अमेरिकेत आला. आपली शिलाईची दुकानं त्यानं सुरू केली. तो घोडय़ांसाठी पांघरूणं, तंबूची कापडं वगैरे बनवायचा. त्यासाठी कापडाचे तागे घ्यायचा तो लेवाईस स्ट्रॉस या व्यापाऱ्याकडनं. हा स्ट्रॉसदेखील ज्यू, पण जर्मनीतला. एकदा एक महिला त्याला म्हणाली, लाकडाच्या वखारीत काम करणाऱ्या माझ्या नवऱ्यासाठी चांगली दणकट विजार हवीय. तर यानं ती तंबूच्या कापडाची शिवली. ती इतकी अनेकांना आवडली की हा लिवाईसला म्हणाला, मला भांडवल पुरव.. आपण या विजारीचं पेटंट घेऊ या. त्यांनी ते घेतलंही आणि १८७३ साली पहिली जीन्स जन्माला आली. यातली महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघेही मूळचे अमेरिकी नाहीत. स्थलांतरितच.
अमेरिकेची दुसरी ओळख म्हणजे हॉट डॉग्ज नावाचा एक रद्दी पण पोटभरीचा पदार्थ. लांबुडक्या पावात सॉसेजस चेपायचे आणि त्यावर मस्टर्ड सॉस किंवा मेयोनिज वगैरे घालून गरम गरम खायचं. अमेरिकेतल्या कुठल्याही शहरातल्या पदपथावर हे हॉट डॉग्ज बनवून विकणारे फिरत असतात. आपल्याकडच्या वडापावसारखा हा पदार्थ. मुळात जन्माला आला श्रमिकांसाठी. कमी पैशात जास्तीत जास्त पोटभरीचा प्रकार. पोषणमूल्य वगैरे पाहायचं नाही. तर ही हॉट डॉग ही अमेरिकेची आणखी एक ओळख.
पण या पदार्थाचं मूळ नाव फ्रँकफर्टर. म्हणजे अर्थातच फ्रँकफर्ट या जर्मनीतल्या शहरात जन्माला आलेला हा पदार्थ. तिकडे डुकराच्या मांसाचं सॉसेजेस घालून तो केला जायचा. रस्त्यावरच्या आल्यागेल्यास तो दिला जायचा, मोफत. म्हणजे नवीन राजाचं राज्यारोहण झालंय, राजपुत्र जन्माला आलाय वगैरे प्रसंगांत तो असा बनवून मोफत वाटला जायचा. चार्ल्स फेटमन नावाच्या जर्मन स्थलांतरितानं हा पदार्थ आपल्याबरोबर अमेरिकेत आणला. पुढे तो विकायलाही लागला. ही घटना १८७१ वा आसपासची. म्हणजे तिकडे स्ट्रॉस यांची लेवाईस जीन्स जन्माला आली त्याच्यापाठोपाठ हा फ्रँकफर्टर अमेरिकेत आला. अमेरिकेत आल्यावर तो झाला हॉट डॉग.
इतकंच काय, अमेरिकेचं तो शक्तिमान प्रतीक असलेला सुपरमॅन हादेखील स्थलांतरित आहे. म्हणजे कल्पनेत का असेना त्याचा जन्म अमेरिकेतला नाही. क्रिप्टन या काल्पनिक स्थानी जन्मलेला आणि कन्सास शहरात वाढलेला हा सुपरमॅन जगातल्या कोटय़वधी बालकांच्या मनात हवाहवासा महामानव बनून राहिलाय.
हल्ली आपल्याकडे अमेरिकन फुटबॉल नावाच्या खेळाचं मोठंच फॅड आलंय; पण सत्य हे की, तोदेखील अमेरिकन नाही. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेत घर करायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांचा रग्बी नावाचा खेळही अमेरिकेत आला आणि अमेरिकन फुटबॉल अशा नावानं ओळखला जायला लागला. मुद्दा अर्थातच हा की, अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळदेखील अमेरिकन नाही.
गुगल मूळच्या अमेरिकींचं नाही. सर्जी मिखायलोकोविच हा गुगलच्या संस्थापकांतला एक. तो रशियन. अ‍ॅपल शंभर टक्के अमेरिकन नाही. स्टीव्ह जॉब्ज तर चक्क सीरियन निर्वासिताचा मुलगा. आता याच सीरियातल्या नागरिकांवर ट्रम्प यांनी बंदी घातलीये. फेसबुकचंही तेच.
आणि आता ट्रम्प म्हणतात, स्थलांतरितांनी अमेरिकेची वाट लावली. सबब आता अमेरिकेत स्थलांतरित नकोत. अमेरिका फक्त अमेरिकनांची. ते जेव्हा असा स्वदेशीचा नारा देत होते त्या वेळी त्यांची वैयक्तिक स्थिती कशी होती?..
‘ईकेआ (स्वीडिश) चबुतऱ्यावर उभे राहून, सेंट गोबेन (फ्रान्स) कंपनीनं बनवलेल्या बुलेटप्रूफ काचेच्या मागे, सोनी (जपानच्या) ४ के कॅमेऱ्यात बघत, समोरच्या डॉल्बी (जर्मन) ध्वनिक्षेपकासमोर हातवारे करताना आपले रोलॅक्स (स्विस) घडय़ाळ दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला आव्हान केलं- अमेरिकी वापरा, अमेरिकींना वापरा आणि स्थलांतरितांना आवरा.. त्या वेळी त्यांच्या शेजारी त्यांची स्लोवेनियन धर्मपत्नी उभी होती.’
तेव्हा ट्रम्प यांचं हे आपल्या उपवासाच्या पदार्थासारखं आहे. ‘आपले’, ‘पवित्र’ म्हणून ते धर्मकार्यात खायचे; पण आपल्याला माहीत नसतं ते आपले नाहीत.

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
Twitter : @girishkuber

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
siddharth jawahar scam marathi news
वित्तरंजन – सिद्धार्थ जवाहर: नव -पॉन्झी
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?