विज्ञान संशोधनासाठी हल्ली पुण्या मुंबईतून फार जण येतंच नाहीत. येतात ते अर्धग्रामीण, अर्धनागरी सीमारेषांवरच्या शहरांतून. त्यांचा बौद्धिक दर्जाही चांगला असतो. काही काही तर अत्यंत हुशार असतात. पण पुण्या मुंबईतल्या तरुणांना हे क्षेत्र आता महत्त्वाचं वाटत नाही, हे खरंच..

एका अर्थानं हा प्रसंग अत्यंत आनंददायी आणि उत्साह वाढवणारा आहे आणि त्याच वेळी तो प्रचंड निराश अशी वास्तवाची जाणीव करून देणारादेखील आहे. हे परस्परविरोध समजून घेण्यासाठी थोडी पाश्र्वभूमी मांडावी लागेल.
गेल्या काही ‘अन्यथा’ सदरांत परदेशी विद्यापीठं, त्यांचं मोठेपण, तिथे दाखल होऊन मोठं काम करणाऱ्यांच्या गौरवगाथा बऱ्याच दिल्या गेल्या. त्यांचं उत्तम स्वागतदेखील झालं. काहींना त्यामुळे आपण कुठे आणि का आहोत, हे कळायला मदत होतीये असं वाटलं, तर काहींच्या मते त्या हताश करणाऱ्या आणि भारतमातेला वगरे कमी लेखणाऱ्या होत्या आणि आहेत. अशातल्या काहींनी तर, हे भारतमातेचं मानभंग करणारं असं काही लिहू नका.. अशी धमकीवजा प्रेमळ सूचनाही केली.
या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ उपक्रमासाठी विदिता वैद्य यांना बोलवायचं ठरलं. वैज्ञानिक संशोधनासाठीचा यंदाचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला. वैद्य मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत असतात. ‘मेंदू आणि भावभावना’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय. ही टाटा मूलभूत संशोधन संस्था देशातलं आद्य विज्ञानपीठ. देश स्वतंत्रदेखील झाला नव्हता तेव्हा जेआरडी टाटा नावाच्या द्रष्टय़ा उद्योगपतीनं आपल्या पशातनं ती स्थापन केलेली. देश स्वतंत्र झाला तर बाकीच्या गोष्टी विकत आणता येतील, पण अभियंते एका रात्रीत कसे घडणार, हा त्यांचा यामागचा विचार. याच संस्थेतनं मग होमी भाभा, विक्रम साराभाई वगरे तगडे वैज्ञानिक घडत गेले आणि भारत विज्ञानाच्या क्षेत्रात एकेक पाऊल पुढे टाकत गेला. तर अशा या शुद्ध वैज्ञानिक संस्थेत विदिता वैद्य असतात. तेव्हा त्यांची कथा लोकांना सांगायलाच हवी, या विचारानं त्यांना लाउंजमध्ये निमंत्रण द्यायचं ठरलं.
जरा धाकधूकच होती, कारण विज्ञान क्षेत्रातल्या महिला हे प्रकरण काही आपल्याला माहीतच नाही. शोधायचं म्हटलं तर एकदम कमलाबाई सोहोनींपर्यंत मागे जावं लागतं. नंतर हा रस्ता तसा कोरडाच आणि दुसरं म्हणजे बाबा-बापू, गोमाता, मार्गशीर्षांतले गुरुवार, लक्ष्मी व्रत, शकुन-अपशकुन, गंडेदोरे वगरे ठासून भरलेल्या वातावरणात विज्ञानाला कोण विचारतंय हीदेखील भीती होतीच. त्यामुळे हा कार्यक्रम मारे आपण करतोय.. पण लोक तरी येतील का.. नाही तर आपलीच फजिती व्हायची वगरे चर्चा कार्यालयात झडल्या होत्या; पण या सगळ्या निर्बुद्ध रूढींवर आपण सतत कोरडे ओढत आलो आहोत आणि आधुनिक असल्याचा आव आणत गावोगावची देवदेवळं वगरे छापण्याचा उद्योग कधी आपल्याला करावा लागलेला नाही, तेव्हा विज्ञानावरील निष्ठेसाठी तरी यांना आपल्या कार्यक्रमात बोलवायला हवं.. ते आपलं कर्तव्यच आहे, असं म्हणून तो कार्यक्रम ठरला. विदिता वैद्यदेखील त्यासाठी तयार झाल्या.
आनंदाचा भाग तो आता; तो म्हणजे या कार्यक्रमाला झालेली आबालवृद्धांची तुडुंब गर्दी. कार्यक्रमस्थळी वरच्या मजल्यावर जाणारे सर्व रस्ते रोखावे लागले इतकी ही गर्दी होती. सभागृहाइतकेच, किंबहुना जास्तच लोक बाहेर होते. मग त्यांच्यासाठी कार्यक्रम प्रक्षेपणाची सोय करावी लागली.
आनंद अर्थातच गर्दी झाली म्हणून फक्त नाही. आनंद याचा की, अजूनही विज्ञानावर प्रेम असलेले आपल्याकडे उदंड आहेत. बाबा-बापूंचे अनुयायी, सिद्धिविनायकाला चालत जाण्याचं व्रत करणारे वाढते असले तरी अस्सल विज्ञानाच्या करकरीत बौद्धिकतेवर प्रेम करणारेही चांगल्या संख्येने आहेत, हा आनंद आणि मग आला या आनंदामागचा विषाद.
त्यास कारणीभूत ठरली विदिता वैद्य यांनी ‘लोकसत्ता’च्या संपादक वर्गाशी केलेली बातचीत. बोलता बोलता त्या सहज बोलून गेल्या..
विज्ञान संशोधनासाठी हल्ली पुण्यामुंबईतून फार जण येतंच नाहीत.. येतात ते अर्धग्रामीण, अर्धनागरी सीमारेषांवरच्या शहरांतून.. त्यांचा बौद्धिक दर्जाही चांगला असतो.. काही काही तर अत्यंत हुशार असतात.. पण पुण्यामुंबईतल्या तरुणांना हे क्षेत्र आता महत्त्वाचं वाटत नाही.. हे खरं.. कदाचित इथली.. म्हणजे पुण्यामुंबईतली मुलं अमेरिका आणि अन्यत्र जाण्यात धन्यता मानत असावीत..
हे असं का होत असावं? या प्रश्नावरही त्यांचं उत्तर भेदक आणि डोळे उघडणारं आहे..
पुण्यामुंबईत किंवा अन्य मोठय़ा शहरांत विज्ञानाचं वगरे असं काही छापलंच जात नाही. आताही बघा.. भटनागर पुरस्काराची बातमी एकाही इंग्रजी वर्तमानपत्राला तितकी महत्त्वाची वाटली नाही. त्या वर्तमानपत्रात पुरस्काराच्या घोषणेच्या चार ओळी छापून आल्या, कर्तव्य म्हणून. भाषिक वर्तमानपत्रांनीच त्या मोठय़ा छापल्या आणि इंग्रजी वर्तमानपत्रांना या विद्यापीठीय संशोधनाचं वावडं आहे, असं म्हणावं तर तेही नाही, कारण प्रिन्स्टन, हॉर्वर्ड, एमआयटीमध्ये वगरे खुट्ट झालं तरी ही वर्तमानपत्रं एवढी मोठमोठी जागा देतात त्या बातम्यांना.. पण देशांतर्गत विज्ञान संशोधनाला कधी इतकी प्रसिद्धी मिळत नाही आणि तशी प्रसिद्धी नसते म्हणून त्याचं महत्त्व आíथकदृष्टय़ा उच्च वर्गातल्यांना इथे कधी जाणवतच नाही. या वर्गाला वाटतं अमेरिकेतल्या वगरे विद्यापीठांत चालू आहे तेच मोठं आणि महत्त्वाचं. त्यामुळे इथली मुलं कधी आमच्या संस्थांत येतच नाहीत.
विदितांच्या या वक्तव्यावर एका बडय़ा इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकार मित्राचा अनुभव आठवला. तो त्याच्या संपादकाला ही अशीच एक चांगली बातमी किती महत्त्वाची आहे, पान १ वर मोठी छापायला हवी.. वगैरे सांगायला गेला. तर तो संपादक त्याला म्हणाला.. हू रीड्स धिस? गिव्ह मी सम सेक्स ऑर क्राइम.. बेटर इफ बोथ. त्याच वर्तमानपत्रातल्या दुसऱ्या एका पत्रकार मित्राला पुलंच्या निधनाची बातमी पान १ वर यायला हवी यासाठी घाम गाळावा लागला होता. असो.
विदितांबरोबरच्या गप्पांत दुसरा विषय निघाला तो आपल्याकडे विज्ञान क्षेत्रात महिला का नाहीत, हा. त्यावरही त्यांचं निरीक्षण भेदक होतं.
कशा असणार? वातावरण कुठे आहे? परत दुसरं असं की, हे संशोधन करून काय मिळतं हे लोकांना कळतं त्या भाषेत दिसत नाही, त्या भाषेत सांगता येत नाही. माझ्या माहितीतली एक तरुणी आली या क्षेत्रात. २२ वर्षांची आहे. जरा कुठे स्थिरावतीये ती तर तिच्या घरच्यांची भुणभुण सुरू झालीय.. लग्न कर, लग्न कर म्हणून. आता तिचे आईवडीलच जर समजून घेऊ शकत नसतील विज्ञान संशोधन म्हणजे काय आहे ते.. मग सासू-सासऱ्यांकडून कशी अपेक्षा ठेवणार..
परिस्थिती अशी असेल तर त्या कशा आल्या या क्षेत्रात..
मी आले कारण माझ्या आईवडिलांची पाश्र्वभूमी म्हणून. ते या क्षेत्रातलेच आहेत. त्यामुळे मला जराही जड गेलं नाही, पण सगळ्यांनाच कसे असे आईवडील मिळणार..
प्रश्न बरोबर होता त्यांचा. विज्ञान क्षेत्रातल्या असल्या तरी आसपासच्या वर्तमानाचं त्यांना असलेलं भान जागं करणारं म्हणायला हवं; पण जागं होऊन तरी करणार काय?
आसपास सगळेच झोपलेले असले, की जो जागा असतो तोही कंटाळतो.. आणि थोडय़ा वेळानं तोही आडवा होतो. मग लागते डुलकी त्यालाही. आपल्याकडच्या विज्ञान शिक्षणाला लागलीये तशी. प्रिन्स्टन, हॉर्वर्ड, एमआयटी वगरेतला कसला तरी गाजावाजा झाला, की तात्पुरते डोळे किलकिले करतो आपण. मग पुन्हा झोप. जाग आलीच तर विज्ञानवास्तवाचा हा विदिता व्याघात आपण समजून घ्यायला हवा.

girish.kuber@expressindia.com
tweeter@girishkuber