तोही एक सिनेप्रेमी होता. एकदा एका दुकानदाराने त्याचा अपमान केला. तो अपमान विसरून न जाता  मित्राच्या मदतीने त्याने मग वेगळीच संकल्पना पुढे आणली आणि आज त्याच्या कंपनीची उलाढाल  ८०० कोटी डॉलरच्या घरात आहे.. त्याने नक्की केले तरी काय?

अगदी अलीकडेपर्यंत हे असं होतं.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
water shortage in Pune
लोकजागर : पाणीकपात करा…

म्हणजे डीव्हीडी, ब्ल्यू रेज येऊन कालबाह्य़ होईपर्यंत हे असं होतं. घरच्या घरी सिनेमा पाहायचा झाला तर जवळच्या एका व्हिडीओ लायब्ररीवाल्याकडे जावं लागायचं. त्याच्याकडे सगळ्या सिनेमांच्या व्हिडीओ कॅसेट्सची फक्त खोकी आकारविल्हे लावलेली असायची. कॅसेट्स प्रत्यक्षात असायच्या दुसरीकडेच. मग त्यात आपल्याला हवा तो सिनेमा असला तर.. बऱ्याचदा नसायचाच तो.. ठीक. मग तो कुठून तरी आपल्याला कॅसेट आणून देणार. नाही तर दुसऱ्या कोणत्यावर तरी समाधान मानून घ्यायचं. लायब्ररीवाला मग नाव, पत्ता, फोन नंबर आणि अनामत रक्कम घ्यायचा. वर बजावायचा.. वेळेत परत आणून द्या.. नाही तर दंड लागेल. आपण गुपचूप हो म्हणून निघायचो.

सिनेमाची कॅसेट मिळाली हा आनंदच मोठा असायचा.

परत त्यातही डोकेदुखी म्हणजे घरातल्या व्हिडीओ प्लेअरवर ही आपल्याला हव्या त्या सिनेमाची कॅसेट्स चालते का नाही, ही धाकधूक असायची. चालली तरी बऱ्याच घरच्या वेगवेगळ्या व्हिडीओ प्लेअरवर ती वाजलेली असल्यामुळे मध्ये मध्ये ती हमखास खराब झालेली असायची. म्हणजे चु चु असा चिचुंद्री आवाज करायची किंवा पडद्यावर एकदम तिरप्या तिरप्या काळ्यापांढऱ्या रेषा दिसायला लागायच्या किंवा टेप आतल्या आतच फिरायला लागायची आणि मग तिचं असं भेंडोळं तयार व्हायचं. सिनेमा राहिलाच बाजूला. ती अडकलेली फीत काढणं हीच डोकेदुखी होऊन जायची. त्यात तुटली तर पंचाईत. व्हिडीओ लायब्ररीवाल्याला तोंड कसं दाखवायचं असा खास मध्यमवर्गीय नैतिक प्रश्न भेडसावयाचा आणि झोप उडायची.

बराच काळ हे असंच होतं. नंतर सीडीज आणि त्यानंतर डीव्हीडी वगैरे आल्या. त्या वेळी अनेकांच्या घरात टीव्ही असायचा. पण प्लेअर असेलच असं नाही. त्यामुळे मग प्लेअरसुद्धा भाडय़ानं दिले जायचे. सीडी, डीव्हीडी प्लेअरसुद्धा हे अशाच पद्धतीनं मिळायचे. त्या वेळी हे सिनेमे भाडय़ाने घेणारे त्या दुकानदाराला एक प्रश्न हमखास विचारायचे.. सीडी/डीव्हीडी ओरिजिनल आहे ना? जणू काही तो दुकानदार.. नहीं भाईसाब, ओरिजिनल कहां.. ये तो डुप्लिकेट है.. असं सांगेल अशी आशा असायची की काय कोणास ठाऊक. पण ही प्रश्नोत्तरं झडायची हे नक्की.

आणि दुसरं एक व्हायचं म्हणजे कॅसेट/सीडी/डीव्हीडी आणायचा उत्साह मारे असायचा. पण ते परत देणं मात्र लांबायचं. तू दुकानात जाऊन देणार की मी.. यावर घराघरांत वाद व्हायचे.. आणि मला वाटलं तू देशील आणि तुला वाटलं मी देईन.. या सवालजबाबात ती कॅसेट/सीडी/डीव्हीडी तशीच समोर पडलेली राहायची. परत द्यावी तर लागायचीच. मग ती द्यायला दुकानात गेलं की तो आपल्याकडे गुन्हेगाराच्या नजरेनं बघायचा आणि दंडाची रक्कम सुनवायचा. बऱ्याचदा अनुभव हा की ही दंडाची रक्कम सिनेमाच्या भाडय़ापेक्षा जास्त व्हायची. पण काय करणार, इलाज नसायचा.

तिकडे अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या रिड हेस्टिंग्ज याचाही अनुभव असाच होता. म्हणजे सिनेमाची आवड होती. पण सारखं सारखं सिनेमागृहात जाऊन पाहण्याइतकी उसंत नसायची. म्हणून सिनेमाच्या डीव्हीडीज घरच्या घरी भाडय़ाने मागवून तो सिनेमे पाहायचा. पण आपल्याकडं होतं तसंच तिकडेही झालं. भाडय़ानं आणलेली डीव्हीडी परत द्यायला त्याला झाला एकदा उशीर. ‘अपोलो १३’ हा सिनेमा बघितला होता रिडनं. पण नंतर दुकानात डीव्हीडी परत द्यायला विसरला. पण त्यामुळे तो डीव्हीडी लायब्ररीवाला दुकानदार रागावला. त्यानं चक्क ४० डॉलर इतका दंड केला रिडला.

त्या वेळी रिड एका सॉफ्टवेअर कंपनीत होता. पण व्यवसायाची उदंड हौस. अत्यंत धडपडय़ा. डीव्हीडीवाल्याकडनं झालेला हा अपमान त्याला डाचत होता. याच क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरू करता येईल का, हा प्रश्न त्याला पडला. त्यातनंच त्यानं एक नवी कल्पना राबवायला सुरुवात केली. हा टपालानं घरपोच सिनेमाच्या डीव्हीडीज द्यायला लागला. म्हणजे याच्याकडे मागणी नोंदवायची की झालं. काही दिवसांत ती डीव्हीडी थेट ग्राहकाच्या घरीच.

या कल्पनेत नावीन्य होतं. अशी काही सेवा त्या वेळी अमेरिकेत काय कुठेच नव्हती. त्यामुळे याच्या ग्राहकांची संख्या चांगलीच वाढली. पण रिडला कळत होतं, यात मजा नाही. कारण यासाठी ग्राहकाला इतकं नियोजन करायला लागायचं की त्यामुळे ऐन वेळी सिनेमा पाहण्याची गंमत निघून जायची. त्यामुळे ही पद्धतसुद्धा बदलायला हवी, असं त्याला वाटत होतं. पण म्हणजे काय, हे मात्र काही सुचत नव्हतं. त्यात त्याला या प्रयत्नात एक भागीदार येऊन मिळाला. मार्क रॅण्डॉल्फ. हादेखील रिडसारखाच. दोघांनाही सतत काही ना काही करायची फुरफुरी असायची. या दोघांनी या व्हिडीओ पुरवठा उद्योगासाठी एक कंपनीच स्थापन केली. ही गोष्ट अगदी अलीकडची. म्हणजे १९९७ सालातली.

या उद्योगात ते काय काय नवीन करायला लागले. पण काहीही करून डीव्हीडी घरी पाठवायच्या पद्धतीला काही तरी पर्याय त्यांना हवा होता. आपल्याला जे काही करायचं असतं त्यासाठी आसपासचीही परिस्थिती अनुकूल असायला लागते. त्या वेळी ती नव्हती. म्हणजे असं की दूरसंचार सेवेत वायफाय कल्पनेचा विस्तार आताइतका तेव्हा झाला नव्हता. त्याची सुरुवात होती. वायफाय मोठय़ा प्रमाणावर रुजणार असं दिसत होतं.

त्याच वेळी या दोघांच्या डोक्यात आलं, या वायफायचा वापर करून थेट ग्राहकाच्या घरी हवेतनं सिनेमा पाठवायची व्यवस्था करता येईल का?

तोपर्यंत असं काही घडलं नव्हतं. वायफायचा वापर इंटरनेटसाठी तेवढा होत होता. सुरुवातीला इंटरनेटवरनं केवळ शब्दांपुरतीच असलेली देवाणघेवाण आवाज, चित्र.. मग चलतचित्र.. अशा पद्धतीनं पसरू लागली होती. हाच क्षण होता नवीन काही तरी करून पाहण्याचा.

या दोघांनी तो साधला. नवीनच प्रयोग त्यांनी चितारला. आधी मनातल्या मनात. मग दोघांत. मग काही मित्रमंडळींत. हे जमतंय लक्षात आल्यावर दोघांनी गुंतवणूक केली त्यात. रिडच्या तर आईनेदेखील आपल्या जवळची शिल्लक लेकाच्या या जन्माला येणाऱ्या कंपनीत गुंतवली. अशा तऱ्हेनं सर्वाच्या मदतीनं या दोघांची कंपनी.. खरं तर नवीन संकल्पनाच.. जन्माला आली.

नेटफ्लिक्स.

या कंपनीचं सदस्यत्व एकदा घेतलं की घरातल्या इंटरनेटधारी टीव्हीवर, संगणकावर किंवा इतकंच काय हातातल्या छान स्मार्ट फोनवरसुद्धा हवा तो सिनेमा, मालिका वगैरे काय वाटेल ते पाहाता येतं. म्हणजे डीव्हीडी वगैरे कोणाकडून मागवायची सोय नाही. ही घटना २००७ सालची.

आजमितीला या कंपनीचे जगभरातल्या जवळपास सव्वाशे देशांत तब्बल ९ कोटी ४० लाख इतके कायमचे ग्राहक आहेत. म्हणजे ते या कंपनीमार्फत स्वत:चं मनोरंजन करून घेतात. ही संकल्पना इतकी क्रांतिकारी ठरली आहे की मनोरंजनाचा सगळा पटच आता नव्यानं मांडला गेलाय. व्हिडीओ कॅसेट्स कधीच गेल्या होत्या. सीडीजही कालबाह्य़ झाल्या. डीव्हीडी मागे पडल्या. अलीकडे ब्लू रेजची चलती होती. नेटफ्लिक्स आलं आणि हे सगळंच बदलून गेलं. हे आता असं काही घरी विकत घेऊन साठवून ठेवायची गरजच काही राहिली नाही. तब्बल ८०० कोटी डॉलरच्या घरात आज या कंपनीची उलाढाल आहे, इतकी ही संकल्पना लोकप्रिय ठरली आहे. आता नेटफ्लिक्स स्वत:च्या मालिका बनवते. जगभरात प्रचंड गाजलेली ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ही मालिका नेटफ्लिक्सचीच. यंदा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ‘व्हाइट हेल्मेट्स’ हा लघुपटही नेटफ्लिक्सचा.

गेल्या आठवडय़ात रिड भारतात होता. भारतीयांइतके वेडे प्रेक्षक दुसरीकडे कुठे सापडणार नाहीत, म्हणाला. आता भारतीय भाषांतल्या मालिका, सिनेमांत नेटफ्लिक्स गुंतवणूक करणार आहे. भारतीय नवउद्यमींना सल्ला देताना रिड म्हणाला, ‘‘काही तरी वेडपट कल्पना तुम्हाला सुचायला हवी. ती वेडपटच हवी.. शहाण्यासारखी असून चालणार नाही. कारण शहाण्यासारख्या कल्पना आधीच राबवल्या गेलेल्या असतात.’’

खरंय ते.. आपण इतक्या सगळ्यांनी डीव्हीडी, व्हीसीडी परत द्यायला उशीर झाला म्हणून दंड भरलाय.. पण हे असं काही करावं हे काही कोणाला सुचलं नाही. प्रश्नच आहे.. त्यांनाच का हे सुचतं?

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber