वास्तविक त्या दोन्हीही कंपन्या आपापल्या क्षेत्रात जगात ओळखल्या जातात. कारण त्या क्षेत्रात भारताची जवळपास मक्तेदारी आहे.  या दोन्हीही कंपन्यांचं तसं उत्तम चाललं होतं आणि बक्कळ नफाही मिळत होता. मग त्यांना अचानक अवदसा का आठवली, हा प्रश्न भारतीय व्यवस्थापन क्षेत्राला पडलाय..

आपल्याला हा अनुभव तसा नेहमीचाच.

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

म्हणजे दुकानात वस्तू खरेदी करताना तिच्या गुणांचं इतकं काही कौतुक केलं जातं की आपण भारावूनच जातो आणि ती वस्तू घेऊनच टाकतो. म्हणजे कापड असेल तर ते कसं चुरगळतच नाही, विजेवर चालणारं उपकरण असेल तर त्यामुळे ९० टक्के वीजबचत कशी होते, कीटकनाशकांच्या त्या निळ्या दिव्यानं अगदी डाससुद्धा कसे गायब होतात, अमुक अमुक पदार्थ खाल्ला की वजन कसं झरझर कमी होतं, १० मिली द्रावासाठी हजार रुपये आकारले जातात कारण तो द्राव लावला की चकचकीत टकलावर काळंभोर जंगल कसं उभं राहातं.. वगैरे वगैरे..

पण घरी आल्यावर लक्षात येतं की सांगितलं गेलंय त्यातलं काहीही आपण चोख दाम मोजून घेतलेल्या उपकरणांत/ वस्तूंत/ तेलात वगरे नाहीये. मग काय करतो आपण?

काहीही नाही! परत असंच कोणी आपल्या डोक्यावरनं हात फिरवत नाही तोपर्यंत जे काही झालंय ते विसरून जातं. मग याची सवय लागते आपल्याला. असं फसवून घ्यायची आणि त्यांना असं फसवण्याची. मग या सवयीतनं त्यांचा तो स्वभावच बनतो. जी गोष्ट सरळ, प्रामाणिकपणे होऊ शकते ती गोष्ट तशी करायचीच नाही. काही तरी फसवाफसवी झालीच पाहिजे तिच्यात. हे असं एकटय़ादुकटय़ाचं झालं तर ठीक आहे. पण सगळ्या समाजाचंच झालं तर? तो प्रश्न आपल्याला पडावा अशाच घटना घडतायत.

उदाहरणार्थ वेलस्पन.

ही तशी नाव राखून असलेली कंपनी. उच्च दर्जाचे टॉवेल्स, बेडशीट्स असं काय काय ही कंपनी तयार करते. मोठय़ा मॉल्समध्ये वगरे या कंपनीची उत्पादनं मिळतात. जवळपास ३०० कोटी डॉलरची उलाढाल असलेला ग्रुप आहे हा. देशात अशा प्रकारची उत्पादनं तयार करणारी सगळ्यात मोठी गिरणी आहे या कंपनीची. आशियातली दुसऱ्या क्रमांकाची म्हणून ही कंपनी ओळखली जाते. आता इतकं मोठं नाव आणि लौकिक असल्यावर कंपनीची उत्पादनं जगाच्या बाजारात जाणार हे काही नवल नाही. त्यात पुन्हा कापसापासनं बनवलेली उत्पादनं ही तर खास भारतीय खासियत. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात भारतात या कंपनीच्या बनलेल्या सुती वस्त्रांना/ कपडय़ांना मागणी असते. यातला सगळ्यात मोठा कोपरा म्हणजे अमेरिका.

तर अमेरिकेतल्या वॉलमार्ट, टाग्रेट आदी महादुकानांत या आपल्या वेलस्पनची उत्पादनं मोठय़ा अभिमानानं विकली जात होती. जात होती असं म्हणायचं कारण यातल्या टाग्रेट कंपनीनं आपल्या दुकानांसाठी वेलस्पनच्या चादरी विकत घेणं बंद करायचा निर्णय घेतलाय. कारण काय?

तर वेलस्पननं टाग्रेट कंपनीला शब्द दिला होता की, आपल्या चादरी या उच्च प्रतीच्या इजिप्शियन कापसापासनं बनवलेल्या असतील. सुरुवातीला त्या तशा होत्याही, असं म्हणतात. पण जसजसा व्यवसाय वाढत गेला, मागणी वाढत गेली तसतशी ही कंपनी आपल्या शब्दाला जागेनाशी झाली. धंदा वाढतोय म्हटल्यावर दुसराच कोणता तरी हलक्या प्रतीचा कापूस वापरून बनवलेल्या चादरी कंपनीनं अमेरिकी ग्राहकांच्या गळ्यात मारायला सुरुवात केली. काही दिवस गेले तसेच.

पण दर्जाबाबत कमालीच्या जागरूक असणाऱ्या या दुकानांनी आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहायची सवय असलेल्या या दुकानांना वेलस्पनच्या चादरींबाबत संशय यायला लागला. ही दर्जाची सवय अमेरिकी दुकानांना ग्राहकांच्या धाकाने लागलीये, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. म्हणजे हा सांगतोय एक आणि विकतोय भलतंच असं जर एखाद्या ग्राहकाला वाटलं तर तो सरळ त्या उत्पादकाला.. मग तो कितीही मोठा असो.. कोर्टात खेचतो आणि रग्गड नुकसानभरपाई वसूल करतो. यामुळेही असेल आपल्यावर अशी वेळ यायच्या आधीच काय ते करायला हवं असं या टाग्रेट समूहाच्या लक्षात आलं. वेलस्पन आपली फसवणूक करत असला तरी म्हणून आपण आपल्या ग्राहकांची फसवणूक करणं योग्य नाही, हे या दुकान मालकांना जाणवलं.

म्हणून मग त्यांनी वेलस्पनचं कंत्राटच रद्द केलं. केवढं होतं ते? ९ कोटी डॉलर. म्हणजे जवळपास ६०० कोटी रुपये.

दर्जाबाबत तडजोड केल्याची ही किंमत? पण फक्त त्यावरच वेलस्पनची सुटका झाली नाही. अमेरिकी महादुकानाच्या कारवाईच्या वृत्ताने बाजारात या कंपनीचा समभाग चांगलाच गडगडला. एका दुकानानं वेलस्पनचा माल परत पाठवला, आता दुसरेही पाठवणार की काय.. अशी भीती निर्माण झाली. रास्तच होती ती. त्यामुळे या कंपनीच्या समभागधारकांनी आपल्याकडे होते ते समभाग विकायला सुरुवात केली. कंपनीचा भाव पडला. तब्बल सहा हजार कोटी रुपये यात धुपले गेले.

वेलस्पन ही काही एकटीच नाही.त्याच्या आधी काही आठवडे रॅनबॅक्सी या पहिल्या भारतीय बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपनीचा घोटाळा उघडकीस आला. ही कंपनी जपानी दाईची सॅन्क्यो या कंपनीनं १९,८०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकत घेतली. हा व्यवहार २००८ सालचा. म्हणजे तो होऊनही तशी आठ र्वष झालेली. परंतु तो होत असताना या कंपनीनं आपल्याबाबतची सर्व कथित सत्य परिस्थिती आपल्या संभाव्य मालकाला सांगितली नाही, असं उघड झालं आणि रॅनबॅक्सीविरोधात सिंगापुरातील लवादात खटला भरला गेला.

त्याचा निकाल देताना त्या लवादानं रॅनबॅक्सीवर चांगलेच ताशेरे ओढले. या कंपनीनं आणि तिच्या प्रवर्तकांनी संशोधनापासून ग्राहकांपर्यंत अनेकांची दिशाभूल केली. त्याची कोणतीही माहिती दाईची सॅन्क्यो या कंपनीला दिली गेली नाही, किंबहुना ती दडवूनच ठेवली गेली. ही शुद्ध फसवणूक आहे, असं हा लवाद म्हणतो.

वास्तविक वेलस्पन काय किंवा रॅनबॅक्सी काय. या दोन्हीही कंपन्या आपापल्या क्षेत्रात जगात ओळखल्या जातात कारण त्या क्षेत्रात भारताची जवळपास मक्तेदारी आहे. म्हणजे जगातल्या एकंदर चादर बाजारपेठेपकी साधारण ४७ टक्के चादरी भारतीय कंपन्या बनवतात. रॅनबॅक्सीही जेनेरिक औषधांमधली आघाडीची निर्मिती. त्याचंही कारण तेच. जगातल्या जेनेरिक औषध बाजारपेठेत भारताचा वाटा २० टक्क्यांच्या आसपास आहे. तेव्हा मुद्दा हा की या दोन्हीही कंपन्यांचं तसं उत्तम चाललं होतं आणि बक्कळ नफाही मिळत होता.

मग त्यांना ही अवदसा का आठवली, हा प्रश्न भारतीय व्यवस्थापन क्षेत्राला पडलाय. पण प्रश्न फक्त या क्षेत्राचाच नाही. तो साऱ्या देशाचाच आहे. देशातल्या नागरिकांच्या मूल्यसंस्कृतीचा आहे. कारण एखादा व्यवसाय या देशात, मातीत उभा राहात असेल तर तो इथलीच मूल्यसंस्कृती रक्तात घेऊन वाढणार.

आणि ही मूल्यसंस्कृती ग्राहकांच्या वजनात मारणारी आणि कबुतरांना खायला घालणारी असेल तर या वातावरणातल्या कंपन्यांची संस्कृती त्याला अपवाद ठरेल का?

या दोन कंपन्यांवर, त्याआधी इनसायडर ट्रेडिंगसाठी तुरुंगवास पत्करावा लागलेले मॅकेन्झीचे रजत गुप्ता, वोखार्द ही कंपनी, पवनचक्क्यांच्या पात्यांच्या खराब दर्जासाठी दंड झालेली सुझलॉन.. अशा अनेकांवर जी काही वेळ आलीये त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजून घ्यायला हवं. कारण मूल्यांची किंमत कधी कळणार, हाच तर खरा मुद्दा आहे.

 

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

 Twitter : @girishkuber