दिवाळीचे पाच दिवस आता सरले असले तरी, दिवाळीचा मूड कायम आहे. दिवाळी म्हटलं की उत्साहाचा उत्सव. खरेदीपासून घरसजावटीपर्यंत आणि रोषणाईपासून रांगोळीपर्यंत प्रत्येक बाबतीत आपला उत्साह ओसंडून वाहत असतो. याच काळात खाण्यापिण्याचीही चंगळ असते. चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या या दिवाळीनिमित्त खास केल्या जाणाऱ्या फराळावर आपण प्रत्येक जण आडवा-उभा ताव मारत असतो. याशिवाय चॉकलेट, मिठाया, सुकामेवा यांची खादाडी सुरूच असते. हे सगळं ज्या वेळी सुरू असतं त्या वेळी सणासुदीचा आनंद असल्याने आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण राहात नाही आणि मग उत्सव सरला की, वजनवाढीची चिंता मनात घर करू लागते.

अलीकडच्या काळात महिलावर्गाप्रमाणे पुरुषवर्गही ‘हेल्थ कॉन्शियस’ होऊ लागला आहे.  या पाश्र्वभूमीवर दिवाळीचा भर ओसरताच प्रत्येकाची शरीर नियंत्रणात आणण्यासाठीची धडपड सुरू होते. मग कुणी जिमकडे धाव घेतो तर कुणी डाएटवर भर देतो. या सगळ्यांवर मोठय़ा प्रमाणात खर्च होत असतो. हा खर्च टाळायचा असेल तर, तुम्हाला तुमचा स्मार्टफोन मदत करू शकेल. व्यायाम, आहार नियंत्रण आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन करणाऱ्या अ‍ॅपबद्दल या सदरात आपण आधीही माहिती घेतली आहे. मात्र, ‘हेल्दीफायमी’ (HealthifyMe) हे अ‍ॅप अशा अ‍ॅपमध्ये अधिक सक्षम असे अ‍ॅप आहे. ‘गेट फिट, इट बेटर अ‍ॅण्ड लुझ वेट’ असे ब्रीदवाक्य घेऊन अँड्रॉइडच्या अ‍ॅप बाजारात वावरणारे ‘हेल्दीफायमी’ हा एक प्रकारे तुमचा वैयक्तिक आहारतज्ज्ञ आणि व्यायाम प्रशिक्षक ठरू शकतो.

व्यायामाचे विविध प्रकार, तो करण्याबाबतचे मार्गदर्शन, आहाराच्या पद्धती व वेळा, योगाभ्यास अशा अनेक माध्यमांतून ‘हेल्दीफायमी’ तुम्हाला वजन कमी करण्यासाठी स्वयंसाहाय्यक ठरू शकतो. या अ‍ॅपमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत.

  • ध्येयनिश्चिती पूर्तता वजन कमी करणे, व्यायाम किंवा आरोग्यदायी आहार घेणे यापैकी कोणतेही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही त्याच्या पूर्ततेसाठी काम करू शकता.
  • कॅलरी ट्रॅकिंग हे अ‍ॅप तुम्ही किती कॅलरी ग्रहण केल्या व खर्च केल्या यांची नोंद ठेवू शकते. अ‍ॅपमध्ये ‘जीपीएस ट्रॅकर’ बसवण्यात आले असल्याने तुमच्या चालण्यानुसार ते किती कॅलरी खर्च झाल्या, याचा तपशील मांडते.
  • आहारतज्ज्ञ, फिटनेस प्रशिक्षक, योग प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन. ‘व्हच्र्युअल समुपदेशन’.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com