अभ्यासाच्या प्रेमात

वर्षांतले १०-११ महिने अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे स्वातंत्र्याची अनुभूती असते. पण मुलांना असं वाटण्याचं कारण तरी काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर पुस्तके, वह्य़ा, शाळा, शिकवण्या यांच्या जंजाळातून मुलांना मोकळा श्वास घेऊन मनसोक्तपणे हवं ते करता येतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आणि अभ्यासाचा बाऊ वाटणं, हे काय आजच्या काळातलं लक्षण नाही. आधीच्या तीन पिढय़ांतली मंडळीदेखील अशाच अनुभवातून गेलेली आहेत. परंतु सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण आणि अभ्यास यांचा ताण इतका वाढला आहे की, मुलं त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोखण्यासाठी आणि मुलांना अभ्यासाची गोडी वाटावी, यासाठी अध्यापनाच्या रंजक पद्धती पुढे येऊ लागल्या आहेत.
शैक्षणिक टॅब हे त्यातलंच एक उदाहरण. पण अ‍ॅण्ड्रॉइडवरदेखील अशी अनेक अ‍ॅप्स आहेत, जी मुलांना खेळता खेळता किंवा रमतगमत अभ्यासक्रम शिकवतात. ‘बीवायजेयू’ (BYJU’S – The Learning App) हे असंच एक अ‍ॅप आहे. माध्यमिक शाळेच्या सहाव्या इयत्तेपासून १२ वीपर्यंतच्या गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यासक्रम अतिशय रंजकपणे शिकवणारे तसेच जेईई, सीएटी, आयएएस अशा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करणारे हे अ‍ॅप आहे. विद्यार्थ्यांना सर्वात धास्ती असते ती गणित आणि विज्ञान या विषयांची. मात्र पुढच्या शैक्षणिक कारकीर्दीसाठी आणि एकूणच आयुष्यभरासाठी हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांना घोकंपट्टी न शिकवता या विषयाचे विविध पैलू त्यांच्या पद्धतीने, सोप्या भाषेत त्यांना शिकवण्याचे काम हे अ‍ॅप करते. भारतातील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपमध्ये विविध विषयांतील प्रकरणांच्या अध्यापनाचे व्हिडीओज पाहायला मिळतात.
यात प्रत्येक विषय अतिशय सोपा करून, प्रात्यक्षिके दाखवून शिकवला जातो. विशेष म्हणजे, यामध्ये सीबीएसई, आयसीएसईच्या अभ्यासक्रमांसह देशभरातील विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. शिवाय शिकवलेल्या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, नमुना प्रश्नपत्रिका या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकलेल्या विषयाची उजळणीही करता येते. या अ‍ॅपमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्हिडीओ उपलब्ध आहेतच; पण त्याचबरोबर विद्यार्थी आपल्या शंकांचे देशातील नामवंत तज्ज्ञ शिक्षकांकडून निरसन करून घेऊ शकतात.
मेंदूला खुराक
मुलांना स्मार्टफोनचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे आईबाबांचा किंवा दादाताईचा स्मार्टफोन टेबलावर ‘निवांत’ दिसताच, त्यांची त्यावर झडप पडते. अर्थात स्मार्टफोनमधील गेम हेच त्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. स्मार्टफोनवर हजारो प्रकारचे गेम उपलब्ध आहेत. त्यातून मुले आपल्याला आवडतील, असे गेम्स डाऊनलोड करतात आणि खेळतात. पण यातील अनेक गेम्स ‘अ‍ॅडिक्टिव्ह’ अर्थात व्यसन लावणारे असतात. हे व्यसन अर्थातच गेम खेळण्याचे. अशा गेमची सवय लागल्यानंतर मुले दुसरे काही खेळणे विसरून जातात. ‘बसलाय ना शांत’ असं म्हणून आईवडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं तर परिस्थिती अधिक बिघडत जाते. मुलं या गेमिंगच्या विश्वात पुरती हरवून जातात. मग हळूहळू याचा त्यांच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होऊ लागतो. चंचलपणात वाढ, एकलकोंडेपणा, चिडचिड, आक्रमकता यांतून हे परिणाम दिसून येतात. या साऱ्याचा दोष शेवटी स्मार्टफोनवर येऊन पडतो. परंतु स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या विश्वातून काय चांगले किंवा काय वाईट याचा निर्णय घेण्याची जबाबदारी वापरकर्त्यांची असते. मुलांचे मनोरंजन होतानाच गेमचा त्यांच्या मानसिक अवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही, असे अनेक अ‍ॅप्स, गेम्स स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत. मेमोरेडो (Memorado – Brain Games) हे अ‍ॅप असेच एक. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे. ‘न्यूरोसायन्स’वर आधारित १५ गेम्सच्या ४५० लेव्हल्स या अ‍ॅपमध्ये आहे. या गेममध्ये विविध प्रकारच्या आकृती, चित्रे, अक्षरे यातून खेळणाऱ्याच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेतली जाते. स्मरणशक्ती, लॉजिक, एकाग्रता, प्रतिसाद आणि बौद्धिक चपळाई या गुणांचा विकास करणारे गेम्स या अ‍ॅपमध्ये आहेत. शिवाय आपल्या मेंदूची सक्षम चाचणी करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये आहे.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com