इंटरनेट वापरावर नियंत्रण

स्मार्टफोनमुळे बऱ्याच गोष्टी चुटकीसरशी पार पाडता येतात. हे सगळं बसल्या जागी करता येत असल्याने आपला वेळ आणि पैसादेखील वाचतो. परंतु हे सगळं करण्याची किंमत मोजावी लागतेच. ती किंमत म्हणजे आपल्या इंटरनेटचा वापर. स्मार्टफोनवरून एखाद्या सिनेमाचं तिकीट खरेदी करणं असो की प्रत्यक्षात यूटय़ूबवर एखादा व्हिडीओ पाहणं असो प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटचा वापर होत असतो. अगदी ‘ऑफलाइन’ म्हणवून घेणाऱ्या गेममध्येही थोडय़ाफार प्रमाणात इंटरनेट डेटा वापरला जातो. आपल्या कळत-नकळत हे सारं घडत असतं आणि प्रत्यक्षात जेव्हा ‘नेट पॅक’ संपतो किंवा इंटरनेट वापराचं बिलं भरपूर येतं तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो. पण या परिस्थितीवर नियंत्रण आणणं शक्य आहे. त्यासाठी ‘ओनाव्हो काऊंट’ (Onavo Count)) हे अॅप अतिशय उपयुक्त आहे. या अॅपद्वारे तुमच्या मोबाइल डेटाच्या वापरावर नियंत्रण आणणे सहज शक्य आहे. तुमच्या मोबाइलमधील इंटरनेटच्या वापराची नोंद ठेवून वेळोवेळी तुम्हाला सतर्क करणं, हे अॅपच मुख्य काम. त्याचबरोबर कोणतं अॅप तुमचा इंटरनेट डेटा जास्त वापरत आहे किंवा कोणतं अॅप तुमच्या नकळत इंटरनेटचा वापर करत आहे, यावरही हे अॅप लक्ष ठेवतं. याशिवाय व्हिडीओ, मॅप, संगीत या संदर्भातील अॅप वापरताना इंटरनेट डेटा कमीत कमी कसा वापरता येईल, याचं मार्गदर्शनही हे अॅप करतं. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्यात इंटरनेट वापराची मर्यादा ठरवू शकता. या मर्यादेच्या जवळ पोहोचल्यानंतर ताबडतोब हे अॅप तुम्हाला सावध करतं. शिवाय वापरलेल्या इंटरनेटचा नेमका खर्च किती हेदेखील दाखवून देते. याशिवाय तुमच्या वायफाय वापराचीही हे अॅप व्यवस्थित नोंद ठेवते.

संपर्काचं योग्य नियोजन
स्मार्टफोनमधील ‘कॉन्टॅक्ट्स’ अर्थात संपर्क क्रमांक हे केवळ क्रमांकापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, जीमेल, ईमेल अशा प्रत्येक अॅपच्या निमित्ताने मोबाइलमधील ‘कॉन्टॅक्ट्स’ची संख्या वाढते. यातील बहुतांश ‘कॉन्टॅक्ट्स’ तेच तेच असल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. पण ते एकत्र करणं शक्य नसतं. काही स्मार्टफोनमध्ये अशी व्यवस्था आहे. मात्र असे कॉन्टॅक्ट्स शोधणं आणि ते ‘मर्ज’ अर्थात एकत्र करणं कटकटीचं आणि वेळखाऊ काम आहे. अशा वेळी ‘कॉन्टॅक्ट्स ऑप्टिमायजर’ (Contacts Optimizer) हे अॅप उपयोगी पडू शकतं. स्मार्टफोनमधील ‘डुप्लिकेट’ संपर्क क्रमांक हटवण्याचं काम हे अॅप करतं. याशिवाय तुमच्या भल्या मोठय़ा ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील सारखीच नावे, क्रमांक, ईमेल यांचा शोध घेऊन ते एकत्रित करण्याचं काम हे अॅप करतं. याशिवाय संपर्क संपादन (एडिट कॉन्टॅक्ट्स), सामूहिक स्थानांतर करणे, चुकीचे संपर्क क्रमांक हटवणे अशी कामेदेखील हे अॅप करतं. याशिवाय दूरध्वनी क्रमांकांना योग्य एसटीडी अथवा नॅशनल कोड जोडण्याचं कामही हे अॅप करतं. अलीकडे काही नवीन स्मार्टफोननी अशा प्रकारची सुविधा दिली आहे. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करताना तुमच्या फोनमध्ये आधीच तशी सुविधा नाही ना, याची खातरजमा करा. याशिवाय काही स्मार्टफोनमध्ये हे अॅप काम करत नाही. त्यामुळे ते डाऊनलोड करताना याचीही खबरदारी घ्या.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com