सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्मार्टफोन आपल्याला किती मदतीचा ठरतो आहे, हे सांगण्याची गरज नाही. पाककृतींपासून प्रवासाच्या तिकिटांपर्यंत आणि आरोग्यविषयक सल्ल्यांपासून मनोरंजनापर्यंतच्या प्रत्येक सुविधा स्मार्टफोनमुळे आपल्याला सहज उपलब्ध झाल्या आहेत. एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असले की मोबाइलची बिले भरण्यापासून कपडे खरेदी करण्यापर्यंतची असंख्य कामे आपण ‘क्लिक’सरशी पार पाडू शकतो. दैनंदिनी आयुष्यात स्मार्टफोन जितका उपयुक्त ठरतो तितकाच तो कार्यालयीन कामकाजातही उपयोगी पडू शकतो.

‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ या अ‍ॅपमधून याचेच प्रत्यंतर आपल्याला येते. साधे सरकारी कार्यालय असो की हायफाय कॉपरेरेट ऑफिस ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ हे सॉफ्टवेअर दिसणार नाही, असा एकही संगणक आपल्याला सहसा सापडणार नाही. प्रत्येक ठिकाणी ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ची गरज भासतेच. संगणकाच्या अगदी प्राथमिक अवस्थेपासून वापरकर्त्यांना उपयुक्त ठरलेले हे सॉफ्टवेअर आता अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोनमध्येही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कार्यालयातील बरीचशी कामे आपण घरबसल्या किंवा अगदी प्रवासातही संगणक किंवा लॅपटॉपशिवाय करू शकतो. हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य असून त्याची संपूर्ण रचना संगणकावरील ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’प्रमाणेच आहे. त्यामुळे ते हाताळताना नव्याने गोष्टी जाणून घेण्याची गरज लागत नाही. संगणकाप्रमाणेच स्मार्टफोनमधील ‘वर्ड’मध्येही मजकुरासोबत, चित्रे, तक्ते, तळटिपा, सूत्रे, आलेख तयार करता येतात. शिवाय या अ‍ॅपची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, जेणेकरून एका हातानेही ते हाताळणे शक्य होईल. या अ‍ॅपला ‘क्लाउड कनेक्टिव्हिटी’देखील पुरवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ‘वर्ड फाइल’ तयार होताच ‘क्लाउड’वर शेअर करून इतरांना लगेचच पोहोचवू शकता. या अ‍ॅपला २०१५ चा ‘गुगल प्ले’चा सर्वोत्तम अ‍ॅपचा पुरस्कारही मिळाला आहे.

संगणकाचे ‘दुरून दर्शन’
असं अनेकदा होतं की, आपण घराबाहेर अथवा कार्यालयात असताना घरातील संगणकात ठेवलेल्या फाइलची किंवा माहितीची आपल्याला अचानक गरज लागते. अशा वेळी घरातल्या व्यक्तीशी संपर्क साधणे, त्याला संगणक सुरू करायला सांगणे, त्यातील फाइल शोधायला सांगणे किंवा माहिती द्यायला सांगणे, हे सारे फारच कटकटीचे आणि वेळखाऊ असते. त्यातच घरात कुणी संगणकसाक्षर नसेल, तर हे सारं करणं अशक्यच. दुसरीकडे, कधी आपण बाहेर असताना घरातल्या संगणकात काही समस्या निर्माण झाली तर त्या वेळी संगणकावर काम करणाऱ्याचा मोठा खोळंबा होतो. या सगळ्या अडचणींतून सुटका हवी असल्यास ‘टीम व्हूअर-क्वीक सपोर्ट’ (Team Viewer Quick Support) हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये नक्की डाउनलोड करा. आपल्या स्मार्टफोनवरून कोणत्याही संगणकाला थेट जोडणारे ‘टीमव्ह्य़ूअर’ खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून दोन संगणकांमधील दुवा बनण्याचे काम करत आहे. आता तशाच प्रकारे स्मार्टफोनवरून संगणक हाताळण्याची सुविधा या अ‍ॅपने उपलब्ध करून दिली आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोन आणि संगणकावर डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून तो संगणक हाताळू शकता. याद्वारे तुम्ही संगणकातील फायली पाहण्याचंच नाही, तर प्रोग्रॅम इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करण्याचं, चॅट करण्याचं, संगणकातील बिघाड दुरुस्त करण्याचं काम करू शकतं. अर्थात त्यासाठी ज्या संगणकाशी तुम्ही संपर्क साधू इच्छिता त्या संगणकावरही ‘टीमव्ह्य़ूअर’ असणं आवश्यक आहे.