वेळेत मिळालेले उपचार शेकडोंचे प्राण वाचवू शकतात आणि क्षणाचा विलंब रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकतो, असे म्हटले जाते. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचे प्राण गेल्याच्या घटना वेळोवेळी आपल्या वाचनात, ऐकण्यात, पाहण्यात येत असतात. तर दुसरीकडे, ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून एखाद्या मृत व्यक्तीचे हृदय शेकडो मैल अंतरावरील रुग्णालयातील रुग्णापर्यंत काही मिनिटांत पोहोचल्याने त्याचे प्राण वाचल्याच्या घटनाही अलीकडे वाढल्या आहेत. यावरून वैद्यकीय उपचारांत वेळेचं महत्त्व किती आहे, हे उघड होतं. नेमके हेच जाणून आहे त्या ठिकाणी रुग्णाला तातडीने मदत पोहोचवण्याची सुविधा देणारे ‘एमअर्जन्सी’(टव१ॠील्लू८) हे अ‍ॅप विकसित करण्यात आलं आहे. या अ‍ॅपवर एक क्लिक करताच काही मिनिटांतच तुम्ही आहात त्या ठिकाणी डॉक्टर, नर्स किंवा वैद्यकीय उपचार पथक दाखल होते. हृदयविकार किंवा तत्सम आजारांचा धोका असलेल्या रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या जाळ्याशी जोडणारे असे हे अ‍ॅप आहे. केवळ डॉक्टरच नव्हे तर आप्तेष्टांशी जोडण्यातही हे अ‍ॅप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीच्या वेळी रुग्ण आपल्या जवळच्या व्यक्तींशीही थेट संपर्क साधू शकतो. याखेरीज या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या आजारावरील उपचारांसाठी योग्य डॉक्टर शोधून त्यांच्या भेटीची वेळही ठरवता येते. याखेरीज जवळपास असलेली रुग्णवाहिका, रुग्णालये, पोलीस ठाणे, एटीएम यांचीही माहिती या अ‍ॅपवरून तत्काळ मिळते.
7डॉक्टर तुमच्या सेवेशी..
सर्दी, खोकला किंवा नित्यनेमाने उद्भवणाऱ्या आजारांसाठी आपण नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. मात्र, बऱ्याचदा काही विशिष्ट आरोग्य समस्या वा आजारांसंदर्भात विशेषज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची गरज लागते. बऱ्याचदा शेजारीपाजारी, नातलग, मित्रमंडळी वेगवेगळ्या डॉक्टरांची नावे सुचवतात. त्यामुळे नेमके कोणत्या डॉक्टरांकडे जायचं, हा प्रश्न उद्भवतो. असाच प्रकार काही विशिष्ट रक्त तपासण्या किंवा अन्य वैद्यकीय चाचण्यांच्या बाबतीत निर्माण होतो. आपल्या मनात उद्भवणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे ‘प्रॅक्टो’ या अ‍ॅपद्वारे मिळू शकतील. आपल्या शहरातील विविध स्पेशालिस्ट डॉक्टर, तपासणी केंद्रे, दवाखाने यांचा शोध घेऊन योग्य डॉक्टरांच्या भेटीची वेळ ठरवण्यात हे अ‍ॅप मदत करते. एवढेच नव्हे तर या अ‍ॅपद्वारे शहरातील सर्व सलून, स्पा, जिम यांचीही माहिती घेता येते. याशिवाय या अ‍ॅपद्वारे तुम्ही नामवंत डॉक्टर किंवा आरोग्यतज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्लेही घेऊ शकता. तसेच या अ‍ॅपवर आपल्या आरोग्याशी संबंधित नोंदीही ठेवता येतात.
याशिवाय आरोग्याविषयीच्या टिप्सही या अ‍ॅपवरून पुरवण्यात येतात.

– असिफ बागवान