स्वयंपाक किंवा जेवण बनवणे ही एक कला आहे. प्रत्येक जण यात पारंगत असतोच असे नाही. आपल्याकडे ही कला परंपरेनुसार जबाबदारी म्हणून स्त्रीच्या गळय़ात पडते; पण आज अनेक  पुरुष पाककलेत रस घेताना दिसत आहेत. कधी ‘भाजीत दाण्याचं कूट घाल’ असे म्हणून तर कधी ‘भेंडी चिरल्यानंतर तव्यावर परतून घे’ असे सांगत आपल्या घरातील किचनमध्ये पुरुषांचीही लुडबुड सुरूच असते. आता तर प्रत्यक्ष स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांची संख्याही वाढत चालली आहे. यातील प्रत्येकालाच नवनवीन पाककृती, पाककृतींच्या टिप्स यांची उत्सुकता असते. टीव्ही, मासिके, पुस्तके यांतून अशा गोष्टी पाहायला, वाचायला मिळतात; परंतु अँड्रॉइडवर ‘किचन स्टोरीज’ नावाचे एक अ‍ॅप असे आहे, जे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य ‘शेफ’नी तयार केलेल्या पाककृतींचा खजिना उलगडते.

आतापर्यंत हजारो लोकांनी वापरलेले ‘किचन स्टोरीज’ हे पाककला शिकू पाहणाऱ्यांसाठी तसेच आपल्या किचनमध्ये नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्यांसाठी उपयुक्त अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये पाककृतींची वेगवेगळय़ा विषयांनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीत असंख्य ‘रेसिपी’ असून प्रत्येक पाककृतीचे तपशील, छायाचित्रे, व्हिडीओ पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, पदार्थाच्या पाककृतीच्या प्रत्येक टप्प्याची छायाचित्रे अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय स्वयंपाकघरातील टिप्स आणि ट्रिक्सही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही निवडलेल्या पाककृतीची ‘शॉपिंग लिस्ट’ आपोआप तयार होते. त्यामुळे बाजारात त्यासाठी सामान खरेदी करण्यासाठी उठाठेव करावी लागत नाही. याशिवाय मापांमध्ये बदल, निर्धारित वेळ, पदार्थ तयार झाल्याचा ‘अलार्म’ आदी गोष्टी या अ‍ॅपमध्ये पाहायला मिळतात.

-असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com