स्मार्टफोनमुळे आपले बरेचसे कार्यालयीन व्यवहार करणे शक्य झाले आहे. अगदी एखाद्या मीटिंगचे पॉवरपॉइंट सादरीकरण करायचे असो की एखादी गणिती आकडेमोड असो, स्मार्टफोनवरील विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून या गोष्टी आता सहज करता येऊ लागल्या आहेत. ईमेल सुविधेने तर हे सारं आणखी जलद करून दिलं आहे. आपल्या कार्यालयीन कामकाजातील किंवा खासगी कामातील एक महत्त्वाची गरज असते ती म्हणजे ‘स्कॅनर’. कोणत्याही दस्तावेजाची ‘डिजिटल कॉपी’ करण्यासाठी स्कॅनिंगचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात किमान एक तरी स्कॅनर असतो. परंतु, स्कॅनरचा व्यक्तिगतरीत्या उपयोग अपवादाने होत असल्याने घरात कुणीही ‘स्कॅनर’ खरेदी करत नाही. परंतु, एखाद्या वेळी अचानक एखादा महत्त्वाचा दस्तावेज किंवा छापील छायाचित्र दूर असलेल्या व्यक्तीला पाठवायचे असते तेव्हा ते ‘स्कॅन’ करून पाठवावे लागते. अशा वेळी आसपास कुठे सायबर कॅफे वा झेरॉक्स, स्कॅनिंग सेंटर आहे का याची शोधाशोध करावी लागते. अशा ठिकाणी एका पानाच्या स्कॅनिंगसाठी दहा रुपयांपर्यंत दर आकारले जातात. ‘स्कॅनिंग’चा दुसरा उपाय म्हणजे बऱ्याचदा मोबाइलच्या कॅमेऱ्यातून संबंधित दस्तावेजाचे छायाचित्र काढून ते पाठवले जाते. मात्र, अशा छायाचित्रात ‘स्कॅन कॉपी’इतकी स्पष्टता नसते. या दोन्ही पर्यायांखेरीज आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे स्मार्टफोनवरील ‘स्कॅनिंग’चे अ‍ॅप्स. ‘फास्ट स्कॅनर : फ्री पीडीएफ स्कॅन’ (Fast Scanner : Free PDF Scan) नावाचे हे अ‍ॅप तुम्हाला मोबाइलमध्येच स्कॅनिंगची सुविधा देते. यासाठी हे अ‍ॅप मोबाइलच्या कॅमेऱ्याचाच वापर करते. मात्र, हे करताना त्यात ‘स्कॅिनग’चे निकष पाळण्यात येतात. त्यामुळे कोणताही दस्तावेज अतिशय सुस्पष्टपणे ‘स्कॅन’ करता येते. या अ‍ॅपद्वारे स्कॅन केलेले दस्तावेज पीडीएफ, ईमेल वा प्रिंटही करता येतात.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com