स्मार्टफोनवरून ‘व्हिडीओ कॉलिंग’ हे आता नवीन राहिलेले नाही. एकमेकांशी थेट संवाद साधण्यासाठी फोन किंवा मेसेजिंगचा वापर न करता थेट ‘व्हिडीओ कॉल’ करून समोरासमोर गप्पा मारल्यासारखा संवाद साधणे सहज शक्य आहे. मात्र, प्रत्येक स्मार्टफोनवर ‘व्हिडीओ कॉलिंग’ची सुविधा असतेच असे नाही. काही ‘व्हिडीओ कॉलिंग’ अ‍ॅप केवळ मोबाइल डेटाचाच वापर करून चालू शकतात, तर काही व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपचे सदस्यत्व घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हे दोन्ही पर्याय खर्चीक असल्याने ‘आयएमओ चॅट’सारखे काही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरतात. या अ‍ॅपद्वारे ‘वायफाय’मधूनही थेट व्हिडीओ संवाद साधणे शक्य होते; परंतु ‘आयएमओ’च्या सदस्यांची संख्या कमी असल्याने ते फारसे लोकप्रिय होऊ शकले नाही, पण आता गुगलनेच ‘डय़ुओ’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ‘व्हिडीओ कॉलिंग’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या अ‍ॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते हाताळण्यास अगदी सोपे आणि सुटसुटीत आहे. अर्थात ‘डय़ुओ’च्या माध्यमातून ‘व्हिडीओ संवाद’ करण्यासाठी तुम्ही ज्यांच्याशी संपर्क करत आहात, त्यांच्याकडेही हे अ‍ॅप असणे आवश्यक आहे. मात्र, या ‘व्हिडीओ कॉल’चा दर्जा खूपच चांगला आहे. दुसरे म्हणजे या अ‍ॅपवरून ‘वायफाय’वरूनही ‘व्हिडीओ कॉलिंग’ करता येते. शिवाय अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप चालत असल्याने संपर्कातील अडचण उद्भवत नाही.

छायाचित्रांना आकर्षक ‘इफेक्ट’

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या छायाचित्रांना आकर्षक ‘इफेक्ट’ देण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. काही स्मार्टफोनमध्ये तर फोटो काढतानाच त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळय़ा रंगसंगतीत, स्वरूपात ते सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधा असते. अशा अ‍ॅपमध्ये आधीच तयार करून ठेवलेल्या विविध इफेक्ट्सच्या बटणांमुळे छायाचित्राचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी स्वत:चे डोके लढवण्याची गरज लागत नाही. अशाच प्रकारचे एक अ‍ॅप सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘प्रिझ्मा’ हे अ‍ॅप तुमच्या छायाचित्रांना ‘आर्टवर्क’मध्ये रूपांतर करते. हे अ‍ॅप छायाचित्रावर वेगवेगळय़ा प्रक्रिया करून ते अधिक आकर्षक बनवते किंवा त्याचे रेखाचित्र, व्यंगचित्र अशा प्रकारांत रूपांतर करते. विशेष म्हणजे, मंक, पिकासो अशा जगविख्यात चित्रकारांच्या शैली पद्धतीवर आधारित ‘इफेक्ट्स’ या अ‍ॅपमध्ये वापरण्यात आले आहेत.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com