कधी कधी मनुष्य समोरची स्थिती, घटना आपण बदलू शकणार नाही हे माहीत असूनही कातावलेला असतो. त्यामागे कमी पडते ती त्याची विवेकनिष्ठ विचार करण्याची पद्धत. विवेकनिष्ठ विचार म्हणजे नक्की काय हे लक्षात घेतले, की आपसूकच आपली चूक लक्षात येऊन मन शांत होऊ शकते.

मकरंदने आज सुट्टी घेतली होती. अस्मिताच्या सर्व परीक्षा संपल्या होत्या. प्रवेशाच्या वेळी डोमिसाइल लागेल म्हणून आज तो ई-सेवा केंद्रात गेला होता. त्याच्याबरोबर त्याचे तीन मित्र होते. त्यांचीही मुले बारावीला बसली होती. सर्व जण एकाच परिसरात राहात होते. पेट्रोलची बचत होईल आणि एकत्र गप्पा मारत जाता येईल म्हणून कोणाची तरी एकाची गाडी घेऊन जाऊ या, असं ठरवलं.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

एका मित्राच्या, रमेशच्या मुलीचा परदेशातून फोन आला. त्याचे स्काइपवरचे बोलणे लांबले, त्यामुळे निघायला उशीर झाला आणि खूप ट्रॅफिक लागले. गाडी सिग्नलला थांबली. यांना सिग्नल मिळाला, पण समोरून येणाऱ्या गाडय़ा थांबतच नव्हत्या, त्यामुळे यांच्या गाडीला वळता येत नव्हते. नीलेश गाडी चालवत होता. तो शांतपणे शेवटची गाडी गेल्यावर वळला. गाडीमध्ये तिन्ही मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मकरंद त्यांच्या गप्पांमध्ये जुजबी सहभाग घेत होता. तो हळूहळू अस्वस्थ होऊ लागला. त्याला कळत नव्हते की, असा कसा हा रमेश उशीर करतो? वेळेची किंमत नाही याला. त्यात समोरचा सिग्नल पाळत नाही याने नीलेशला काहीही फरक पडत नाही आहे. केवढा ट्रॅफिक आहे? जायला उशीर होणार तरी हे तिघेही कसे हसू, खिदळू शकतात. त्याला गप्प बसलेले बघून नीलेशने त्याला गप्प गप्प का आहेस म्हणून विचारले. मकरंद म्हणाला, ‘‘किती ट्रॅफिक आहे, आता उशीर होणार.’’ अजय हसत म्हणाला, ‘‘अरे! अशी कुठे ऑफिसची वेळ किंवा मीटिंगची वेळ गाठायची आहे. असू देत ना ट्रॅफिक. त्यामुळे बोलायला तर मिळतंय. ब्लिसिंग इन डिसगाइस.’’ ई सेवेच्या ऑफिसमध्ये गर्दी होती. नुसती कागदपत्रं द्यायची होती, पण दीड तास लागला. त्यामुळे मकरंदची अस्वस्थता वाढतच गेली. ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा एक वाजला होता. सर्वानुमते बाहेर जेवायला जायचे ठरले.

तिघांनी तळलेले पापड, फ्राइड फिश, बटर चिकन, बटर नान याची ऑर्डर दिली. मकरंदने प्लेन डाळ, कोशिंबीर आणि प्लेन रोटीची ऑर्डर दिली. सगळे त्याला म्हणाले की, कसले तुझे डाएट. खा रे एक दिवस. काही होत नाही. जेवण झाल्यावर ब्राऊनी विथ आइस्क्रीम मागितले. याने मात्र नको म्हटले, तर सगळे हसले. म्हणाले, ‘‘तुला रणवीर सिंग व्हायचे आहे की तू म्हातारा झाला आहेस म्हणून खात नाही आहेस?’’ हे ऐकून मकरंदची तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला, ‘‘टिंगल करा माझी.’’ अजय समजुतीने घेत म्हणाला, ‘‘अरे! लहान मुलासारखा काय चिडतोस सारखा. आमच्या प्रेमाखातर खा थोडेसे.’’ मकरंदने शेवटी ब्राऊनी विथ आइस्क्रीम खाल्ले, पण खाताना डोक्यात एकच विचार, की जीममधली डाएटिशिअन ओरडणार. ती तर एक चमचा साखर खाऊ देत नाही. तिला काय माहीत माझे मित्र कसे आहेत ते; भरीस पाडतात. हॉटेलमधून बाहेर पडताना अस्मिताचा मेसेज आला की, कोणत्याही प्रवेशासाठी डोमिसाइल लागणार नाही. आता मकरंदच्या रागात भरच पडली. त्याचे म्हणणे होते की, ‘सरकार, शिक्षण संस्था, विद्यापीठ एक नियम का ठेवत नाहीत? सारखे नियम का बदलतात? या सगळ्यात पालकांचे किती हाल होतात. आजची सुट्टी फुकट गेली.’

हॉटेलमधून सर्व जण बाहेर पडले. पार्किंगला जागा न मिळाल्याने गाडी लांब पार्क करावी लागली. बाहेर प्रचंड उकडत होते. तिथे पोहोचेपर्यंत मकरंद घामेजून गेला. त्यातही त्याने मनातल्या मनात मुंबईच्या उकाडय़ाला शिव्या घातल्या. घरी पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. त्याने तणतणतच घरात पाऊल टाकले. जोरात दरवाजा आपटला. केतकी घरी लवकर आली होती. तिला काही कळेचना. तिने त्याला थंडगार पाणी प्यायला दिले आणि ‘‘शांत हो’’ म्हणाली. याने मकरंदच्या रागाचा भडका उडाला. तो म्हणाला, ‘‘शांत कसा होऊ? या रमेशला वेळेची किंमत नाही. मुलीशी स्काइपवर बोलत बसला. निघायला उशीर झाला. त्यात ट्रॅफिक. लोक सिग्नल पळत नाहीत. तरी गाडी चालवताना नीलेश शांत होता. म्हणे नीतिनियम पाळा. नियम फक्त आपल्यासाठी, बाकीच्यांसाठी नाहीत? तिघेही मस्त गप्पा मारत होते. ई सेवा केंद्रात ही गर्दी. तिथे एवढा वेळ उभे राहून काम केले आणि अस्मिताने सांगितले डोमिसाइलची गरज नाही. या लोकांना एकच कायदा कायमसाठी का बनवता येत नाही? त्यात एवढे उकडतेय, चिकचिक होतेय. हवापण घाण आहे. वजन कमी कर म्हणालीस म्हणून जिम लावले. जसे जमेल जेवढे जमेल तितक्या गोष्टी पाळतो. तरी त्या डाएटिशिअनची कटकट असतेच आणि व्यवस्थित खाण्याचा प्रयत्न करावा तर मित्र बसलेच आहेत टिंगलटवाळी करायला, पाय खेचायला. तुझे त्यात अजून योगाभ्यास कर मन:शांतीसाठी. शवासन करायला लागल्यावर हेच विचार डोक्यात घोळतात. एक सेकंदसुद्धा शांत वाटत नाही. मी काही योगी नाही शांत राहायला. साधा हाडामांसाचा माणूस आहे.’’
केतकीने त्याला शांत करत विचारले, ‘‘यातल्या खरेचच कोणत्या गोष्टी त्रासदायक, खटकणाऱ्या होत्या? यातले तुला न आवडणारे काय काय बदलू शकतोस? प्रयत्न करू शकशील? मुंबईचा ट्रॅफिक, कार्यालयातील गर्दी, मुंबईचे हवामान, मित्रांचे वागणे?’’ मकरंद तिला तिरसटपणे म्हणाला, ‘‘मी तुला देव वाटतो का?’’ केतकी म्हणाली, ‘‘मग तू असाच चिडत राहणार का? याचा त्रास कोणाला होणार? किंवा चिडल्याने त्रास कमी होणार का? किंवा कोणताही उपयोग होणार का?’’ या बोलण्याने मकरंदचा राग कमी झाला नाही, पण तो विचारात मात्र पडला. केतकीने त्याला विवेकनिष्ठ उपचार पद्धतीवरील एक पुस्तक दिले आणि यातून काही मार्ग मिळतोय का बघ म्हणाली.

मकरंद ते पुस्तक बरेच दिवस वाचत होता. तो मनापासून समजावून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने चक्क वही केली आणि त्यात ज्या दिवशी केतकीने पुस्तक दिले त्या दिवशीपासून घडलेले त्रासदायक प्रसंग, ते का घडले हे लिहून काढायला सुरुवात केली. ‘सगळ्यात प्रथम म्हणजे हे काम अस्मिता करू शकली असती. तिच्यावर ही जबाबदारी विश्वासाने टाकायला हवी होती. त्या दिवशी रमेशने आम्ही ठरवलेल्या वेळेलाच निघायला पाहिजे, असे माझे ठाम मत होते. माझ्या मताप्रमाणे तो वागला नाही, त्यामुळे मला त्याचा राग आला. खरे तर तो त्याच्या लेकीशी बोलत होता. तिला जाऊन काही महिनेच होत आहेत. ती होमसिकपण झाली होती. याचा मी विचार केला नाही. मी बाहेर जातो तेव्हा मुलांना खूप मिस करतो. तेथून तर मी त्यांच्याशी तासन्तास बोलतो. मी त्याच्या जागी असतो तर मला बोलणे मधेच थांबता आले नसते.’

‘ट्रॅफिक तर नेहमी असतोच. तसेच क्लिनिकमध्ये, अशा कचेऱ्यांमध्ये गर्दी असणारच. त्याच्यावर कोणालाही काही करता येणे शक्य नसते. मुंबईची दमट हवा कशी बदलणार? तेव्हा हे मला आवडत नाही म्हणून चिडचिड करून स्वत:ला त्रास देण्यात काय अर्थ आहे? इथे तिघांनी मिळालेला वेळ मस्त गप्पा मारण्यात घालवला. नीलेश गाडी चालवत होता. त्याची सिग्नल न पाळणाऱ्या लोकांमुळे चिडचिड होत नव्हती. त्याचे म्हणणे होते की, लोकांनी नियम पाळावेत असे मला वाटते. रस्त्यावर शाळेतील मुले किंवा गट आपणहून वाहतूक नियंत्रणाचं काम करतात तसे मला जमणार नाही. त्यामुळे त्यांनी कसे वागावे हे माझ्या हातात नाही, पण मी कसे वागावे हे माझ्या हातात आहे. त्याचे मला समाधानही आहे. म्हणून तो कामाला वेळेच्या आधी निघत असे.’

‘आपण कधी कधी खूप तिरका विचार करतो. खाण्यावरून मित्र बोलले तर ते टिंगल करतात असे वाटले. अगदीच बालिश विचार केला आणि अगदी त्यांनी टिंगल केली ती आपण का धरून ठेवायची? डाएटिशिअनने तसे आपल्याला बरेच पर्याय दिले होते. कधी जंक फूड खायची वेळ आली तर कोणताही विचार न करता खा, नाही तर अपराधी भावनेने तुम्ही एन्जॉय करू शकणार नाहीत, फक्त अति प्रमाणात खाऊ नका, असे म्हणाली होती.

ब्राऊनी विथ आइस्क्रीम माझी अत्यंत आवडती डिश. मी मात्र ते चिडचिड करत, अपराधी भावना बाळगत, तिला शिव्या घालत खाल्ली. नुसते आइस्क्रीम खाऊ शकलो असतो. त्याने थोडय़ा कॅलरीज कमी गेल्या असत्या किंवा संध्याकाळी व्यायाम करू शकलो असतो; पण या रागवण्यामुळे मला विचारच करता येत नव्हता हे खरे.’ त्याला आता आपल्याच कृतीचे अर्थ कळू लागले होते.
त्याने वही केतकीला दाखवली. म्हणाला, ‘‘थोडं थोडं समजतेय. वागता येईल का बघू.’’

– माधवी गोखले
madhavigokhale66@gmail.com