‘भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या आठवणीत आणि भविष्याच्या चिंतेत नुसतेच आजच्या वर्तमानकाळातील आनंदाचे क्षण आपण गमावून बसत नाही तर वर्तमानकाळही दु:खी करतो.’ हे वाक्य ऐकायला छान वाटलं आणि प्रत्यक्षात आणायला कठीण असलं तरी त्यावर जाणीवपूर्वक काम करायला हवं. कारण आत्ताचा क्षण महत्त्वाचा असतो त्यासाठी आनंदी वृत्ती अंगात बाळगता यायला हवी. मुलांच्या भाषेत, त्या त्या क्षणी चिल घे, थंड घे, एन्जॉय..
आज सकाळपासून केतकीच्या मनाप्रमाणे एकही गोष्ट होत नव्हती. तिला ऑफिसला लवकर जायचं होतं. गजर कधी झाला हे तिला कळलं नाही. उठायला उशीर झाला. लवकर आंघोळ आटपायला हवी म्हणून गिझर लावला तर लाईट गेले. आज नाश्त्याला इडली करणार होती, पण पीठ फुगलं नव्हतं त्यामुळे त्याच्या इडल्या करता येणार नव्हत्या. इतक्यात कामवाल्या बाईचा फोन आला की, तिला बरं वाटत नाही त्यामुळे ती येणार नाही. तेव्हाच अस्मिता, केतकीची मोठी लेक स्वयंपाकघरात चहा करायला म्हणून आली. आता केतकीचा पेशन्स संपला. ती अस्मितावर कावली, ‘‘अगं, बारावीची परीक्षा संपली आहे. अजून सगळ्या प्रवेश परीक्षा बाकी आहेत. आपल्यासाठी आयते प्रवेश कोणी ठेवले नाहीत गं. मलाच सर्वाची चिंता. फक्त आठ गुणांनी माझी इंजिनीअिरगची सीट गेली. प्रवेश न मिळाल्याचं दु:ख तुला आता नाही कळणार. अभ्यास करायचा सोडून इथे का आलीस?’’ त्यावर अस्मिता चहाचं आधण ठेवत म्हणाली, ‘‘चिल आई. जरा थंड घे. मी पहाटे तीनलाच उठले आहे. आता माझा ब्रेक आहे. आपल्या सगळ्यांना चहा करते. आज आपण दोघी मिळून मस्तपैकी चहा घेऊ .’’ हे ऐकून केतकी अधिकच चिडली. तिला म्हणाली, ‘‘अगं मला उठवायचं नाही का? चिल काय आणि थंड काय घे? मला तुम्हा मुलांची इंग्रजी काय आणि मराठी काय कोणतीही भाषा कळेल तर शप्पथ! वैताग आलाय अगदी. काय वाईट दिवस उजाडलाय, वीज नाही, बाई नाही, पिठाचं हे असं झालंय.’’ त्यावर अस्मिताचं उत्तर होतं, ‘‘कूल आई. कशाला वैतागतेस? पण तुझी झोप तर छान झाली की नाही? तू रात्री उशिरा झोपली होतीस. आले होते उठवायला तुला, पण इतकी गाढ झोपली होतीस की उठवायचं जिवावर आलं. अध्र्या तासात उठली नसतीस तर येणार होते तुला उठवायला.’’ तिने केतकीची जवळ जाऊन पापी घेतली तर केतकीने तिला झिडकारलं. अस्मिता म्हणाली, ‘‘आई, मी बाहेरून नाश्ता आणि पोळी-भाजी पण आणेन.’’ केतकीचा यावर प्रश्न होताच, ‘‘अभ्यासाचं काय? तो कधी करणार?’’ अस्मिता थोडी दुखावली आणि नाराज होऊन म्हणाली, ‘‘मी पहाटे तीनपासून अभ्यासच करते आहे की. कितीही अभ्यास करा तुझं समाधानच होत नाही. इतर वेळी काम करत नाही म्हणून ओरडतेस. आता वेळेला काम करते म्हणाले तर ते पटत नाही आहे. डोन्ट वरी. मी माझा ब्रेक संपला की जाईन. आता हा चहा झालाय तो घेऊ यात.’’ केतकीने तसाच उभ्या उभ्याच चहा प्यायला. मकरंदने तिला ऑफिसला सोडलं. आणि ती वेळेच्या आधी पंधरा मिनिटं पोहोचली.

वेळ होता म्हणून तिने फोनवरचे मेसेजेस वाचायला सुरुवात केली. आजचे मेसेजेस खूपच छान होते.
वि. स. खांडेकरांचे एक वाक्य होतं. ‘भूतकाळ तुम्हाला स्मृतीचा आनंद देईल, भविष्यकाळ स्वप्नांचा आनंद देईल, पण जीवनाचा आनंद मात्र वर्तमानकाळच देईल.’ म्हणून हा सोन्यासारखा वर्तमानकाळ हातातून निसटून न देता त्याचा आनंद घेण्यास आपण शिकलो तर हा सुखाचा काळ आपल्याला सतत आनंद, शांती व तृप्ती देईल. दुसरा मेसेजचा मथितार्थ होता की, ‘भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या आठवणीत आणि भविष्याच्या चिंतेत नुसतेच आजच्या वर्तमानकाळातील आनंदाचे क्षण आपण गमावून बसत नाही तर वर्तमानकाळही दु:खी करतो.’
तिसरा होता की, ‘आपल्या मनाप्रमाणे झालं की आपण आनंदित होतो आणि मनाप्रमाणे नाही झालं की दु:खी होतो. मग चिडचिड करतो, दुसऱ्या वर राग काढत. परिस्थितीला, माणसांना, नशिबाला, देवाला दोष देत राहतो. कधी कधी ती गोष्ट नंतर क्षुल्लकही वाटते. पण आपण राईचा पर्वत केलेला असतो आणि वेळ निघून गेलेली असते. आपल्याला छोटय़ा छोटय़ा गोष्टी खुपणाऱ्या लागलीच लक्षात येतात तशा छोटय़ा छोटय़ा आनंद देण्याऱ्या गोष्टी लक्षात यायला हव्यात. ते क्षण टिपता यायला हवेत. उपभोगता आले पाहिजेत. हे आनंदाचे क्षण कसे गोळा करायचे तर स्वत:ला विचारायचं, एकमेकांना विचारायचं आणि सांगायचं ‘आज कोणती चांगली गोष्ट घडली?’

केतकीला सकाळी घडलेल्या सगळ्या घटना आठवल्या, ‘आज सगळ्या समस्या एकदम आल्या हे खरं. आता हे असं कधी तरी होणारच या वस्तुस्थितीचा मी स्वीकार केला नाही. अस्मिता समोर आली की फक्त परीक्षाच का डोळ्यासमोर येते? मला अभियांत्रिकीला प्रवेश नाही मिळाला ही मला खूप मोठी दु:खद घटना वाटते. या गोष्टीला पंचवीस र्वष झाली तरी ती मी माझ्याच मनाने तयार केलेली जखम भळभळत ठेवली आहे. मी इंजिनीअर नाही झाले म्हणून काय बिघडलं माझं? इंजिनीअर लोकांपेक्षाही चागलं करिअर आहे माझं. खरं तर ती अभ्यास करत होती. मी तिचा एक व्यक्ती म्हणून का विचार करत नाही? तिलाही थोडा ब्रेक हवाच ना. ती माझाच विचार करत होती, काळजी घेत होती. मला कशी झोप मिळेल हे बघत होती. बाई येणार नाही तर तिने त्यातून पटकन मार्ग काढला, नाश्ता, जेवण आणेन म्हणाली. ती मला मदतच करत होती. हेही गुण असणं किती महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसातल्या या चांगल्या गोष्टी होत्या. हे खरे आनंदाचे क्षण होते. मला हे काहीच दिसलं नाही. ते क्षण मी उपभोगले नाहीत. माझीच तक्रार असते आता तुम्ही मुलं मोठी झालात, जवळसुद्धा येत नाहीत. आपण एकत्र वेळ घालवत नाही. माझी अस्मिताने छानशी पापी घेतली पण मी तिला झिडकारलं. मला चहा करून दिला. एकत्र चहा पिऊ म्हणाली, यातलं तिचं प्रेम, जिव्हाळा मी कळून घेतला नाही. तर आपण वेळ नाही म्हणून उभ्या उभ्या चहा प्यायला, पण ऑफिसला पंधरा मिनिटं लवकर आलो. माझ्या या तक्रारीला काही अर्थ आहे का? अस्मिता, आम्ही दोघी खरेदीला जातो, दोघी ‘बिनडोक सीरिअल’ बघतो, अशा फक्त दोघी एकत्र गोष्टी करतो त्याला ‘मदर डॉटर टाइम’ म्हणते. असे मी दोघींनी एकत्र चहा पिण्यातले ‘मदर डॉटर टाइम’चे आनंदाचे क्षण गमावले.’’ केतकी स्वत:च आपल्या एकेक वागण्याचा अर्थ लावू लागली होती. ती आणखीनच भूतकाळात शिरली. तिला आठवलं,

‘‘आदित्य लहान असताना खूप ताप चढला तेव्हा त्याचे डॉक्टर म्हणाले की, लहान मुलांचा असा ताप एकदम चढू शकतो. औषध दिलं आहे. मी इथेच थांबतो. स्पंजिंग करू. त्याने ताप कमी होईल. पण माझी काळजी कमी होईना. माझी अस्वस्थता आणि डोळ्यातलं पाणी बघून तेच म्हणाले, ‘‘तुम्ही स्वत:शी म्हणा बरं एकदा, ‘खूप ताप आहे. सो व्हॉट? ठीक आहे. स्पंजिंगने कमी होईल.’’ असं म्हटल्यावर खरंच बरं वाटलं होतं. काही वेळा आपण वापरतो त्या शब्दांनी, वाक्यांनी ‘गुड फिलिंग’ येतं. सकाळच्या घटनांनी असं कोणतं आकाश कोसळलं होतं की संकट आलं होतं? सो व्हॉट? ठीक आहे, असं का नाही म्हणाले? भूतकाळाचे ‘सो कॉल्ड दु:ख’ मी गोंजारत राहिले. भविष्याची चिंता करत बसले आणि आनंदाचे क्षण गमावले. आनंदी वृत्ती अंगात बाळगता यायला हवी. मुलंही खरं तर त्यांच्या भाषेत हेच सांगतात. लाइफ एन्जॉय करतो म्हणतात म्हणजे स्वत:च्या आनंदाची जबाबदारी स्वत: घेतात. एन्जॉय, कुल, चिल, थंड घे ही भाषा वाईट नाही. त्या मागचे विचार आणि भावना महत्त्वाच्या. हे विचार मनात रुजायला हवेत. आनंदाचा हर्ष उन्माद व्हायला नको आणि दु:खातही अडकायला नको. त्यातून पटकन बाहेर येता यायला हवं, त्याची तीव्रता कमी होईल हे बघायला हवं. त्यासाठी संगीत ऐकणं, पुस्तकं वाचणं अशा अनेक गोष्टी करता येतील. घरी गेल्यावर अस्मिताची माफी मागू.’’

‘माफी मागू’ या विचारानेही केतकीला खूप हलकं वाटू लागलं. घरी गेल्यावर जेवताना ‘आजच्या दिवसातील चांगली, आनंदाची गोष्ट’ यावर बोलून रोज रात्री एकमेकांना दिवसभरातली चांगली घटना एकमेकांशी शेअर करण्याचं तिनं नक्की केलं. आठवडय़ातच घरातील प्रत्येकाकडे सांगायला दिवसातील एकच नाही तर अनेक घटना होत्या. आज पहिल्या पावसात भिजलो, खूप दिवसांनी मैत्रीण भेटली, आज हवा गार होती, ट्राफिक कमी होता, झाडावर फुल उमललं, कॉफी मस्त झाली अशा अनेक आनंदाच्या गोष्टींचा खजिना होता. ‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ची प्रचीती येऊ लागली होती.

– माधवी गोखले