काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने एका आरोग्य समस्येवर तोडगा काढण्यासाठी औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना एका खास सभेला बोलावले. आरोग्याच्या या समस्येवर जगभरातील सामान्यांना परवडेल असे औषध उपलब्ध व्हावे, ही त्यामागची भूमिका होती. दुर्दैवाने ही आरोग्य समस्या अतिशय गंभीर असूनही या कंपन्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या हाकेला जुमानले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या दृष्टीने यात काहीही आर्थिक फायदा नव्हता! आफ्रिकेत गंभीर स्वरूप धारण केलेल्या या समस्येबाबत आणखी दुर्दैवी घटना म्हणजे आफ्रिकेतल्या एका बडय़ा कंपनीनेही ‘या समस्येवरील औषध बनवल्यावर नफा होत नाही’ असे म्हणून ते बनवणे अचानक बंद केले. शहरी जनतेला फारशी अनुभवास न येणारी आणि ग्रामीण जनतेच्या आरोग्यास अत्यंत मोठा धोका निर्माण करणारी ही आरोग्य समस्या आहे- सर्पदंश!

आरोग्य, आजार आणि त्यावर होणारे संशोधन हे रुग्णांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असू शकते, किंबहुना आरोग्यक्षेत्रातही नफा ही संशोधनामागची मुख्य प्रेरणा असू शकते, याचे ठळक उदाहरण सर्पदंश, त्यावरील उपचार आणि त्यावरील संशोधन याचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. सध्याच्या काळामध्ये हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह हे जगभरातील आरोग्यतज्ज्ञांचे लाडके विषय आहेत. याचे कारण असे की त्याच्या उपचारांना, त्याबद्दल संशोधन करायला सर्व श्रीमंत देशातील नागरिक, उद्योजक, औषध कंपन्या आणि सरकारी यंत्रणा उत्सुक आहेत. या रोगांचा समाजावर होणारा परिणामही तेवढाच गंभीर आहे हे जरी खरे असले तरी आर्थिक मदतीचा ओढा बघितला तर लक्षात येईल की सर्पदंशासारखे कित्येक गंभीर आजार हे बहुतेक करून गरिबांचे आजार असल्याने पैसा आणि संशोधन यांना आकर्षित करू शकत नाहीत.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?

कुठून तरी कानावर पडल्यास किंवा बातमी वाचल्यास सर्पदंशाची घडलेली एखादी घटना आपल्याला माहीत असते. सर्पदंशाच्या कित्येक घटना ना आरोग्यतज्ज्ञांपर्यंत पोहोचतात ना वार्ताहरापर्यंत! त्यामुळेच आपल्याला या आरोग्य प्रश्नाची व्याप्ती किती आहे, याची कल्पनाच नसते. एका अभ्यासानुसार भारतात दरवर्षी ४६ हजार लोक सर्पदंशामुळे प्राण गमावतात. जगभरामध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे अनुमान प्रतिवर्षी ९४ हजार ते १ लाख २५ हजार मृत्यू इतके आहे, तर सर्पदंश होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण हे वर्षांला जवळजवळ ५० लाख व्यक्ती इतके आहे. खरे तर सर्पदंशाने होणारा प्रत्येक मृत्यू टाळण्याजोगा असतो, परंतु आरोग्य सुविधांचा अभाव, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अयोग्य उपचार, अपुरी दळणवळणाची साधने, अपुरी आर्थिक मदत अशा बहुविध कारणांनी टाळता येण्यासारख्या या घटना जिवावर बेततात. बालमृत्यू किंवा संसर्गजन्य रोग यांप्रमाणेच सर्पदंशाने होणारे मृत्यू हे बिघडलेल्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे एक प्रतीक आहेत! एखादा रोग असाध्य असेल तर त्यामुळे होणारे मृत्यू हे अपरिहार्य असतात परंतु वाढलेले बालमृत्यू, अतिसारासारखे संसर्गजन्य रोग किंवा सर्पदंशाने होणारे मृत्यू हे आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेवर उभे रहिलेले प्रश्नचिन्ह असते.

सर्पदंशावर उपयुक्त असलेले अ‍ॅण्टिव्हेनम (सर्पदंशावरील उतारा) हे अत्यंत कमी कंपन्या बनवतात. मुंबईतील हाफकिन ही त्यातील प्रमुख कंपनी आहे. हे औषध बनवणे ही अत्यंत जिकिरीची आणि जोखमीची प्रक्रिया आहे. सापांचे विष हे अनेक रसायनांचे किचकट मिश्रण असते. सापाचे विष हे रक्त, स्नायू, मज्जासंस्था या सर्वावर एकत्रित परिणाम करू शकते. त्यामुळे या विषामध्ये असलेले किचकट रासायनिक मिश्रण लक्षात घेऊनच त्यावर उतारा तयार करावा लागतो. हे रासायनिक मिश्रण प्रत्येक विषारी सापात वेगवेगळे असते. असा उतारा बनवण्याची पद्धतही तितकीच क्लिष्ट आहे. त्या त्या जातीचे जिवंत साप पकडायचे, त्यांचे विष गोळा करायचे आणि ते अल्प प्रमाणात घोडय़ांसारख्या प्राण्यांमध्ये इंजेक्शनच्या वाटे सोडायचे. विषामुळे त्या प्राण्यांमध्ये विषास प्रतिकार करणारी द्रव्ये तयार होतात. त्यानंतर त्या प्राण्यांच्या रक्तातून ती रासायनिक द्रव्ये बाहेर काढली जातात. या प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे साप आणि इतर प्राणी यांच्या मर्यादित संख्येमुळे आणि या प्रक्रियेला लागणाऱ्या वेळेमुळे अर्थातच हे अ‍ॅण्टिव्हेनम बनवण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ करणे शक्य नसते.

त्यातून भारत आणि आफ्रिकेसारख्या प्रचंड भौगोलिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे विषारी साप आढळतात. भारतात मुख्यत: नाग, मण्यार, घोणस हे साप बहुतांश भौगोलिक क्षेत्रात आढळतात. आफ्रिकेत माम्बा, घोणस, टायपान असे इतर काही भयावह साप आढळतात. अनेकदा दूर जंगलात राहणाऱ्या एखाद्या छोटय़ा बाळाला सर्पदंश झाला आणि सापाची प्रजात ओळखणारे कुणी आजूबाजूला नसेल तर सर्पदंशावर उपचार करणाऱ्या ग्रामीण वैद्यकीय तज्ज्ञांची ही मोठी परीक्षा असते. त्यातून प्रत्येक व्यक्तीला लागणारे अ‍ॅण्टिव्हेनमचे प्रमाण वेगवेगळे असते; सापाने चावताना किती विष सोडले, रुग्णास वैद्यकीय केंद्रावर यायला किती वेळ लागला या अनेक बाबींवर त्याला लागणाऱ्या औषधाचे प्रमाण ठरते. त्यातून रुग्णाच्या शरीराला झालेले नुकसान त्याने भरून येत नाहीच, तर फक्त रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

आरोग्ययंत्रणा तसेच दळणवळणाची साधने सक्षम करणे, सर्पदंशावर उपचार करू शकणाऱ्या आरोग्यसेवकांचे विकेंद्रीकरण करणे हे उपाय अर्थातच गरजेचे आहेत. परंतु काही शास्त्रज्ञ आता या प्रश्नाशी वेगळ्या पद्धतीने झुंजायचा प्रयत्न करत आहेत. सापांच्या विषाचा शास्त्रीयदृष्टय़ा विचार करून त्यातील घातक रासायनिक प्रथिनेच निरुपयोगी करणारी द्रव्ये शोधण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. या पद्धतीमुळे विविध प्रकारच्या सापांच्या विषावर एकच प्रभावी औषध बनवले जाऊ शकेल. सापाची प्रजात ओळखता आली नाही तरी रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकेल, ही यामागची मुख्य प्रेरणा आहे. अजून एक वेगळी पद्धत म्हणजे सध्या वापरात असलेली इतर रोगांची औषधे थोडी बदल घडवून सर्पदंशावरील उतारा म्हणून वापरून बघणे. आणि तिसरी एक पद्धत म्हणजे साप चावला की त्याचे विष शरीरातील पेशींमध्ये शिरण्याआधीच पेशींबाहेरच अडकवून ठेवू शकणारे अतिसूक्ष्म कण शरीरात सोडणे.

हे सगळे उपाय प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून शोधले जात आहेत. या सर्व उपायांची यादी वाचून दाखवताना मात्र एक मोठा कळीचा मुद्दा बाजूला राहता कामा नये. होसे मारिया गुतीएरेज हे या विषयातील एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ समजले जातात. गुतीएरेज यांच्या मते, हा प्रश्न त्याच्या एका वेगळ्या आयामामुळे महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, ‘‘आफ्रिका, आशिया आणि आमच्या कॉस्टा रिकासारख्या देशांतील गरीब जनतेला या अत्याधुनिक संशोधनाची गरज आहेच परंतु त्यांना साप का चावतात याचा विचार सर्वात आधी करायला हवा! प्रचंड गरिबीमुळे त्यांच्याकडे साध्या मजबूत चपला किंवा पावलाला पूर्णपणे सुरक्षित करणारे साधे बूटही नसल्याकारणाने त्यांना सर्पदंशाचा सर्वात मोठा धोका संभवतो. तरीही साप चावलाच तरी चांगल्या प्रतीचे आणि परिणामकारक अ‍ॅण्टिव्हेनम पोचवायला रस्ते आणि वाहने नसतात, अ‍ॅण्टिव्हेनम परिणामकारक राहण्यासाठी वीज आणि शीतपेटय़ा यांची कमतरता असते, ती औषधं योग्य पद्धतीने देण्यासाठी तज्ज्ञ नसतात.. हे सर्व ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात अत्यावश्यक असलेली सुविधा उपलब्ध नाही ही विषमताच या रोगाचे सगळ्यात विदारक सत्य आहे!’’

सर्पदंश हा आरोग्याचा प्रश्न हा कदाचित अशा काही प्रश्नांपैकी एक आहे, जो तोकडय़ा आरोग्य यंत्रणेबरोबरच खासगी औषध बनवणाऱ्या कंपन्यांच्या नैतिकतेशीही आणि त्याबरोबरच सामाजिक विषमतेशी संबंधित प्रश्न आहे. केवळ नफ्या-तोटय़ाच्या गणितावर सामाजिक आरोग्याचा एक महत्त्वाचा प्रश्न टांगता ठेवणे योग्य आहे का? पूर्णपणे टाळता येऊ शकणाऱ्या इतक्या गंभीर आरोग्य समस्येवर उत्तर शोधू न शकणे हे आपल्या जगातील विषमतेचे एक अत्यंत त्रासदायक प्रतीक आहे, असेच म्हटले पाहिजे. सामाजिक विषमता ही आरोग्य-विषमतेला कारणीभूत ठरते. या विषमतेमुळेच काही आरोग्यप्रश्नांचा चेहरा लपलेलाच राहतो, त्या समस्येने कितीही बळी घेतले तरी! सापाच्या विषावर उतारा म्हणून औषधच पुरे पडेल का? की ग्रामीण आरोग्याचा गंभीर विचार करणे, मुळाशी असलेली सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करणे हा अधिक शाश्वत उतारा असू शकेल?

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com