अमेरिकेच्या दक्षिणेला वसलेला, बेटांचा समूह असणारा क्युबा हा छोटासा देश- त्याची ना आर्थिक परिस्थिती चांगली ना शेजारी देशांशी असलेले नाते चांगले. असे असतानाही आरोग्याच्या क्षेत्रात जगाने धडे घ्यावेत अशा काही योजना या देशाने यशस्वी केल्या. क्युबात आज प्रत्येक ११९ नागरिकांमागे एक नर्स आणि प्रत्येक १५१ नागरिकांमागे एक डॉक्टर अशी यंत्रणा कार्यरत आहे. डॉक्टर-रुग्ण प्रमाणाच्या क्रमवारीत आज क्युबा हा देश काही सर्वोत्तम प्रमाण असणाऱ्या देशांपैकी एक आहे. कोणती प्रेरणा आहे या मागे?

फिडेल कॅस्ट्रो गेल्यावर एका क्युबन नागरिकाने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती- ‘‘आम्हा क्युबातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळते आणि आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी येथील शासन झटते. तरीही आमच्या देशाच्या विचारसरणीवर लाखोंना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवणारा अमेरिकेसारखा देश मानवी हक्क उल्लंघनाचे आरोप कोणत्या अधिकाराने करतो?’’ येथे गेली कित्येक वर्षे लोकशाहीमुळे नागरिकांना मिळणारे राजकीय स्वातंत्र्य कमी असले तरी राजकीय इच्छाशक्ती मात्र आहे, ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातात.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
Why are we 50 years behind the world in the field of irrigation
आपण सिंचन क्षेत्रातच तेवढे जगाच्या ५० वर्षे मागे का?
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

१९५९ मध्ये फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांनी मोठी राजकीय बंडाळी घडवून आणली आणि क्युबामध्ये सत्तापालट झाला. क्युबातील अत्यंत गरिबीत राहणाऱ्या ग्रामीण आणि कामगार वर्गाला शहरी आणि अमेरिकाधार्जिण्या वर्गाच्या श्रीमंतीविषयी असलेल्या संतापाचा उद्रेक

झाला. बेरोजगारी, अनारोग्यासारख्या प्रश्नांनी ते बेजार झाले होते. अर्थात राजकीय बंडाळीनंतर आणि सत्तापालट झाल्यावरही पुढील कित्येक

वर्षे क्युबात शांतता नव्हतीच. कम्युनिस्ट विचारसरणीची कास धरून राष्ट्रनिर्मितीच्या चाललेल्या क्युबातील प्रयत्नांना अमेरिकेने छुपा हल्ला करून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर व्यापारबंदीही लादली. अशा प्रकारे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या जनतेला पुन्हा रोजगार आणि चांगली आरोग्य सेवा पुरवण्याचे काम क्युबाने करून दाखविले आहे, म्हणून क्युबाचे प्रयत्न विशेष ठरतात!

‘क्युबाच्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला आरोग्यसेवा मिळणे अनिवार्य राहील,’ असे क्युबाच्या क्रांतीनंतर क्रांतिकारक चे गव्हेरा याने एका लेखामध्ये लिहून ठेवले होते. परंतु हे अमलात आणण्यासाठी त्याकाळी क्युबामध्ये आरोग्यसेवकच नव्हते. सुमारे सत्तर लाख लोकांसाठी केवळ तीन हजार डॉक्टर आणि एकच वैद्यकीय महाविद्यालय, अशी दयनीय परिस्थिती! बाकी बहुतांश डॉक्टर हे बंडाळीनंतर देश सोडून गेले. अशी बिकट परिस्थिती असताना या देशाने आरोग्यक्षेत्रात जी भरारी घेतली आहे ती वाखाणण्याजोगी आहे!

क्युबाची अमेरिकेकडून होणाऱ्या आर्थिक नाकेबंदीमुळे आधीच आर्थिक परिस्थितीला कावलेली जनता आजारी पडणे एकूण राष्ट्राकरिताच धोक्याचे होते. परिस्थितीचे गांभीर्य जाणून १९६७ मध्ये सरकारने नव्या दमाने क्युबाच्या घटनेतच आरोग्य हक्काची तरतूद करून घेतली आणि क्युबामध्ये अगदी गावपातळीपर्यंत आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा चंग बांधला. प्रथम शहरात तसेच अनेक गावांना मिळून एक असे पॉलिक्लिनिक काढून तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची फळी नेमण्यात आली. परंतु यामुळे तेथील नेमलेल्या डॉक्टरांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ  लागली. परिणामत: रुग्ण डॉक्टरकडे जाणेच टाळू लागले. तेव्हा सरकारने अधिक विकेंद्रित यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. प्रत्येक दोनशे कुटुंबांमागे एक आरोग्यसेवक आणि एक डॉक्टर अशी योजना केली. त्यांनी क्युबातील प्रत्येक नागरिकाला वर्षांतून दोनदा तपासायचे आणि काही समस्या आढळल्यास ताबडतोब त्यावर उपाय करायचा. ही पद्धती चांगलीच यशस्वी ठरली. प्रत्येक रुग्ण तपासण्याच्या ध्यासाने अनेक संसर्गजन्य रोग काबूत आले. प्रत्येक विभागाला दिलेले हे दोन आरोग्य कार्यकर्ते रुग्णांच्या सवयी, आरोग्य, प्रकृती याबाबतही लक्ष पुरवू लागले. एखाद्या आजाराचा इलाज स्थानिक पातळीवर होऊ शकत नसेल तर रुग्णाला पुढील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या पॉलिक्लिनिकमध्ये पाठविले जाऊ लागले. हळूहळू सामान्यांना या यंत्रणेबद्दल विश्वास वाटू लागला. आज ही यंत्रणा इतकी बळकट झाली आहे की क्युबात प्रत्येक ११९ नागरिकांमागे एक नर्स आणि प्रत्येक १५१ नागरिकांमागे एक डॉक्टर अशी यंत्रणा कार्यरत आहे.

एखादी मोठी साथ आल्यास ते देशाला आर्थिकदृष्टय़ा  परवडणार नाही, हे ओळखून क्युबामध्ये १९७०च्या दशकात लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली. गेल्या पाच दशकांत क्युबाने ६४ दशलक्ष पोलिओ डोस दिले आहेत आणि ३५ राष्ट्रीय पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम राबवले आहेत. सुरू केल्यापासून केवळ तीन दशकांत म्हणजेच १९९६ पर्यंत क्युबाने ९० टक्के लोकसंख्येचे लसीकरण केलेले होते. या अथक प्रयत्नांमुळे क्युबामध्ये आज हिवताप, पोलिओ, गोवर असे कित्येक रोग अस्तित्वात नाहीत. क्युबाच्या आरोग्य यंत्रणेमध्ये लोकसहभाग विशेष महत्त्वाचा आहे. क्युबाच्या प्रत्येक स्थानिक विभागात नागरिकांची एक समिती असते. या समितीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सरकापर्यंत पोहोचवणे (असेही म्हणतात की ही समिती सरकारविरोधी काम करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याचे कामही करते). प्राथमिक गरजांच्या पूर्ततेची काळजी या समितीच्या सदस्यांद्वारे घेतली जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत आता क्युबा आरोग्याच्या बाबतीत प्रगत देशांमध्ये गणला जाऊ  लागला आहे. क्युबन नागरिकांचे आयुर्मान जवळ-जवळ विकसित देशांइतके, म्हणजे ७८ वर्षे आहे. क्युबाचा पाच वर्षांखालील बालकांमधील मृत्यूदरही हजार जन्मांमागे ५ ते ६ इतका कमी आहे. जगातील बहुतांश विकसित देशात तो १-४ मृत्यूंच्या दरम्यान आहे, तर भारतात हा मृत्यूदर दर हजार जन्मांमागे ४८ इतका आहे. राजकीय परिस्थिती अनुकूल नसतानाही क्युबाने इतर अनेक गरजू देशांना आरोग्याच्या समस्यांवर मात करण्याकरिता मदतीचा हात पुढे केला आहे, हे विशेष! इबोलाने आफ्रिकेमध्ये थैमान घातले असताना सगळ्यात मोठी वैद्यकीय तुकडी पाठवणारा देश क्युबा होता. अमेरिका तसेच युरोपमधील देश इबोला आपल्या देशापर्यंत पोहोचू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. त्याच वेळेस क्युबाने मात्र ४६१ डॉक्टर्सची तुकडी पाठवून तेथील देशांना भरघोस मदत देऊ केली! गेल्या १० वर्षांत क्युबाने आणखी एक आरोग्यक्रांती घडवली आहे. क्युबामधील नेत्रतज्ज्ञांनी जगातील इतर गरीब देशांमधील ३४ लाख लोकांना दृष्टी गमावण्यापासून वाचवले आहे. ‘ऑपरेशन मिरॅकल’ या कार्यक्रमाखाली क्युबाने अनेक देशांतील लोकांना अक्षरश: दृष्टीदान केलेले आहे!

आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांनी क्युबाच्या आरोग्य व्यवस्थेला वाखाणले असले तरी काही त्रुटी ठळकपणे मांडल्या आहेत. क्युबातील जनतेला सरकारविरुद्ध बोलण्याचा अधिकार नसणे, डॉक्टरांना मिळणारा अत्यंत कमी पगार आणि आरोग्य यंत्रणेतील आधुनिकतेचा अभाव, या त्यातील काही महत्त्वाच्या त्रुटी. क्युबाची आरोग्य व्यवस्था सर्वोत्तम आणि परिपूर्ण नसली तरी अत्यंत कमी संसाधने असताना निर्माण केलेली ही व्यवस्था अनेकांकरिता मार्गदर्शक आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असूनसुद्धा क्युबाने आरोग्याच्या क्षेत्रात इतकी उत्तुंग कामगिरी केली आहे, ती  कशाच्या बळावर? भारतासारख्या देशात लोकशाही असूनही, राजकीय स्वातंत्र्य, शांतता असूनही आणि आरोग्य यंत्रणा आखलेली असूनही आरोग्याच्या समस्या म्हणाव्या तशा वेगाने कमी होताना का दिसत नाहीत? क्युबाची आरोग्यकथा जाणून घेताना असे अनेक प्रश्न मनात येतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता अमेरिकेतील तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मार्था नसबॉम यांनी मांडलेला ‘सेन्ट्रल कॅपॅबिलिटी अप्रोच’ हा सिद्धांत मदत करू शकतो. नसबॉम यांनी आरोग्याला ‘मानवी क्षमता बळकट करणारी एक मूलभूत गरज’ असे म्हटले आहे. नसबॉम त्यांच्या ‘वूमेन अ‍ॅण्ड ह्य़ुमन डेव्हलपमेंट’ या पुस्तकात म्हणतात, ‘समाजाच्या विकासासाठी प्रत्येक माणसाकडे उत्तम दर्जाचे आयुष्य जगण्याची क्षमता असणे गरजेचे असते. ही क्षमता तेव्हाच वाढू शकते जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वत:चे आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकेल आणि याकरिता शासनाने काही ठोस भूमिका घेऊन आमलात आणणे गरजेचे असते.’ हा विचार क्युबाच्या आरोग्य यंत्रणेत दिसतो. देशातील जनतेने आर्थिक आणि सामाजिक विकासात हातभार लावावा असे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाकरिता हा विचार अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहे. बालमृत्यू, हिवताप यासारखे संसर्गजन्य रोग, तसेच आधुनिक जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या दुहेरी संकटांशी झुंजावे लागत असताना आपल्या देशाने क्युबाच्या उदाहरणातून तीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे- या देशाचे आरोग्यविषयक तत्त्वज्ञान, राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी दाखवलेली कसोशी. यंत्रणा, सेवा, सुविधा या गोष्टी आर्थिक पाठबळाने उभारता येतात, पण त्या उभारण्यामागे जो विचार असणे गरजेचे आहे तो विचार समग्र हवा. आपण ‘महासत्तेचे’ जे स्वप्न पाहत आहोत त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आपली जनता आरोग्याच्या दृष्टीने सक्षम आहे का, हा प्रश्न खरे तर देशाच्या प्रत्येक नेत्याने स्वत:ला विचारायला हवा. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या नेत्यांकडे जगातील वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या चष्म्यातून पाहतील. परंतु त्यांनी क्युबन नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जी आस्था निर्माण केली; सामाजिक आरोग्याबाबत जी दूरदृष्टी दाखविली आणि इतर देशांच्या आरोग्यविषयक प्रयत्नांना जो मैत्रीपूर्ण हातभार लावला, तो आपल्याला प्रोत्साहन देऊ  शकेल का?

मुक्ता गुंडी/ सागर अत्रे  gundiatre@gmail.com