भारत, नामिबिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये उत्तम अभ्यास आणि नियोजन करून तयार केलेल्या याद्या आरोग्यसेवकांनी वापरल्याने प्रसूतीच्या वेळी नवजात बालक तसेच मातांचा जीव वाचू शकतो, असे समोर येत आहे. आरोग्यव्यवस्थेचे उत्तम नियोजन करणे गरजेचे आहेच, पण कसे?

अमेरिकेच्या एका विमानतळावर १९३५ मध्ये एका अद्ययावत लष्करी विमानाची चाचणी सुरू होती. हे विमान इतर विमानांपेक्षा कैक पटीने सरस आणि जलद होते. अमेरिकेच्या हवाई दलाने त्यांच्या एका दिग्गज वैमानिकावर चाचणीची जबाबदारी सोपवली होती. चाचणी सुरू झाली आणि विमान थोडय़ा उंचीवर जाताच एका बाजूला कलंडले आणि जमिनीवर कोसळून आगीत भस्मसात झाले. चाचणी पाहायला आलेले लष्करी अधिकारी अवाक् झाले! अद्ययावत आणि उत्तम तंत्रज्ञानाचे उदाहरण मानले गेलेले हे विमान असे कोसळलेच कसे? समस्या विमानात नव्हती, तर त्याला उडवायला लागणाऱ्या तयारीची होती. एका वैमानिकाच्या स्मरणशक्तीवर विमानाचे उड्डाण अवलंबून ठेवणे आता शक्य नव्हते. यासाठी मग विमान कंपनीने एक साधा उपाय शोधला, वैमानिकाला एक छोटी, सुटसुटीत यादी बनवून देण्याचा. कोणत्या साधनसामग्रीची पडताळणी कुठल्या क्षणी करायची, सूचनांचे पालन कशा क्रमाने करायचे, अटीतटीची समस्या आल्यास काय उपाय करायचा याचा मुद्देसूद तपशील या याद्यांमध्ये होता..

दिवसेंदिवस ज्ञान आणि माहिती जितकी गुंतागुंतीची होत आहे, तितकी ती मानवी क्षमतांना आव्हान देत आहे. विमान उडवताना करायच्या शेकडो छोटय़ाछोटय़ा कृतींप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही, एखाद्या शल्यविशारदाला जेव्हा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञानाचे उपयोजन करून अतिशय बारीकसारीक गोष्टींचे व्यवस्थापन करून एक मोठी, अतिमहत्त्वाची प्रक्रिया काहीही चूक न करता पार पाडायची असते. हे सगळे कुणी एक व्यक्ती करीत नाही, तर भूलतज्ज्ञ, परिचारिका, साहाय्य करणारे शल्यविशारद आणि इतर साहाय्यक असा मोठा गट करीत असतो. अर्थातच याचे उत्तम पूर्वनियोजन हवे तरच अनेकांचे जीव वाचू शकतात! परंतु हे केवळ शस्त्रक्रियेपुरते किंवा आणीबाणीच्या घटनेपुरतेच मर्यादित असावे का? जगभरात दरवर्षी साडेतीन लाख स्त्रिया प्रसूतीच्या प्रसंगी जीव गमावतात आणि २७ लाख बालके जन्मानंतरच्या पहिल्या २८ दिवसांमध्ये मृत्यू पावतात, ज्यापैकी बहुतांश मृत्यू हे जन्मानंतरच्या २४ तासांमध्ये होतात. अपुऱ्या सुविधा, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि अपुरी वैद्यकीय मदत ही यामागची प्रमुख कारणे आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ही आणीबाणीची वेळ आहे, असे म्हटल्यास मुळीच वावगे ठरणार नाही. आणीबाणीच्या प्रसंगी दर वेळेला कुठल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते असे नाही. कधीकधी आपल्या रोजच्या वापरातली एखादी लहानशी कल्पना मोठय़ा बदलाला चालना देण्यास समर्थ असते, हे डॉ. अतुल गावंडे यांच्या ‘चेकलिस्ट मॅनिफेस्टो’ या पुस्तकातून लक्षात येते. गावंडे हे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि शल्यविशारद. शस्त्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी साध्याशा ‘चेकलिस्ट’ अर्थात याद्यांची कशी मदत होऊ शकते हे त्यांनी अनुभवले आणि पुस्तकातून मांडले. मातेला रुग्णालयात दाखल केल्यावर करावयाच्या गोष्टी, प्रसूतीच्या वेळी घेण्याची काळजी, प्रसूतीनंतर न विसरता करावयाच्या प्रक्रिया अशा याद्यांचा सामाजिक आरोग्य क्षेत्रात प्रसूतीच्या प्रसंगी होणारे मृत्यू टाळण्यासाठी वापर होत आहे. भारत, नामिबिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये  उत्तम अभ्यास आणि नियोजन करून तयार केलेल्या याद्या आरोग्यसेवकांनी वापरल्याने प्रसूतीच्या वेळी नवजात बालक तसेच मातांचा जीव वाचू शकतो, असे समोर येत आहे. याद्यांनुसार शिस्तीने काम करणे हे उत्तम नियोजन करण्याचे एक उदाहरण आहे.. पण आरोग्यव्यवस्थेचे उत्तम नियोजन करणे खरेच इतके गरजेचे आहे का?

उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी प्रसंगातच याचे उत्तर दडलेले आहे. एखाद्या मोठय़ा शहरात, अत्यंत गर्दीच्या रुग्णालयात जर योग्य तितके, कायमस्वरूपी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसतील, इतक्या महत्त्वाच्या घटकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कुण्या एकाच व्यक्तीवर टाकलेली असेल, त्यासाठी आवश्यक पैसा उपलब्ध नसेल, तर दोन दिवसांत लहानग्यांचा जीव जाऊन काय हाहाकार होऊ शकतो हे आपण सर्वानी उघडय़ा डोळ्यांनी पाहिले. जपानी मेंदुज्वराने उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांमध्ये अक्षरश: थैमान घातलेले असूनही तेथील आरोग्ययंत्रणा या रोगाशी लढा देण्यास पुरेशी सक्षम झालेली नाही. २०१० ते २०१७ दरम्यान सुमारे ४ हजार लोकांचा या रोगामुळे बळी गेलेला असूनही गोरखपूरसारखा प्रसंग घडतो हे अत्यंत चिंताजनक आहे. असे प्रसंग होणे पूर्णपणे टाळायचे असेल तर देशभरातील आरोग्यव्यवस्था कायमस्वरूपी सशक्त आणि सतर्क असायला हवी. तहान लागली की विहीर खणून आरोग्य क्षेत्रात फारसा उपयोग होत नाही, हा संदेश स्थानिक आरोग्यव्यवस्थेपर्यंत पोहोचायला हवा. म्हणूनच स्थानिक पातळीवरील रोगराईचे सातत्याने पर्यवेक्षण करणे, आरोग्यसेवकांना त्या-त्या भागातील गरजानुसार याद्या तयार करून देणे, प्रत्येक आजाराच्या उपचाराची नियमावली बनवणे आणि ती सतत अद्ययावत ठेवत राहणे या सर्व गोष्टींची नितांत गरज आहे. काहीशी सकारात्मक गोष्ट अशी की, आरोग्य क्षेत्रातील उत्तम नियोजनाने किती मोठा फायदा होतो, याची कित्येक उदाहरणे आपल्याच देशात सापडतात.

मे २०१० मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेतील आरोग्य-अधिकाऱ्यांची झोप उडाली. त्या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या सरासरी मृत्यूंपेक्षा जवळजवळ हजार अधिक मृत्यू नोंदवले गेले. याबाबत अधिक संशोधन केले असता असे लक्षात आले की, यातील बहुतांश मृत्यू हे उष्माघाताचे बळी होते. खरे तर अहमदाबादवासीयांसाठी मे महिन्यातील प्रखर उन्हाळा आणि जिवाची लाहीलाही करणारी उष्णता नवीन नव्हती; परंतु उष्माघात ही सामाजिक आरोग्याची समस्या असू शकते हे इतके तीव्रपणे प्रथमच लक्षात आले. ‘भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था गांधीनगर’ यांच्या पुढाकाराने उष्माघाताशी मुकाबला करण्यासाठी एक अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला गेला. यानुसार अहमदाबादमधील सर्व शासकीय यंत्रणांना अतिउष्ण तापमानाच्या वेळी एक धोक्याची सूचना पाठवली जाऊ  लागली. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया, सामाजिक संस्था अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे उष्माघाताच्या धोक्याविषयी माहिती पोहोचवली जाऊ  लागली. शहरात ९०० ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध केले गेले. उन्हापासून विसावा घेण्याच्या जागा (सावलीखालील बाक, उद्याने) खुल्या केल्या जाऊ  लागल्या. बेघर लोकांसाठी रात्री झोपण्यासाठी बांधली गेलेली विश्रामगृहे उन्हाळ्यात दिवसाही खुली ठेवली गेली. मजुरांसाठी दुपारच्या वेळेत विश्रांती घेणे प्रोत्साहित केले जाऊ  लागले. गरिबांच्या घरांच्या छताला पांढरा रंग देण्यासाठी रंग तयार करणाऱ्या कंपन्यांना महानगरपालिकेने पांढरा रंग देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. पांढऱ्या रंगामुळे सूर्यकिरणे परावर्तित होऊन घरातील तापमान कमी राहण्यास मदत होते. याबरोबरच आरोग्य यंत्रणांना उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची त्वरित काळजी घेण्यासाठी सक्षम केले गेले. या सगळ्याची परिणती अशी की, अवघ्या सहा वर्षांत, २०१६ मध्ये उष्माघाताच्या बळींचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले. हीच योजना आता महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्य़ात राबवली जाणार आहे.

इबोलासारख्या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाने भारतात शिरकाव करू नये यासाठी भारतीय शासनाने उचललेली पावले अशीच कौतुकास्पद आहेत. महत्त्वाच्या १८ विमानतळांवर आणि ९ बंदरांवर आफ्रिकेतील ठरावीक देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी केली जाऊ लागली. या सर्व विमानतळांवरील कर्मचाऱ्यांना प्रवाशांची कसून आरोग्य तपासणी करण्याचे नियम प्रशिक्षण देऊन शिकवले गेले. या रोगाची काही संशयास्पद चिन्हे आढळल्यास त्या व्यक्तीची योग्य ती तपासणी, जलद निदान आणि उपचार केले जाऊ  लागले. जे अमेरिकेसारख्या सक्षम देशाला साध्य झाले नाही, ते भारतीय यंत्रणेने साध्य केले आणि भारतासारख्या महाकाय देशात इबोला येऊ  शकला नाही.

एका बाजूला इबोलाशी दोन हात करण्याची यशस्वी योजना दिसते, तर दुसऱ्या बाजूला गोरखपूरमधील जपानी मेंदुज्वराचे उदाहरण दिसते. आपण नेमके कोणत्या दिशेने प्रवास करीत आहोत? ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील प्रताप भानू मेहता या विचारवंतांच्या लेखातील एक वाक्य बोलके आहे. ते लिहितात- ‘आपण भव्य योजना आखण्यात आणि अचानक आलेल्या प्रचंड मोठय़ा आपत्तीला तोंड देण्यात अनेक वेळा यशस्वीही ठरतो, पण आपण आपल्या दैनंदिन कामात अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचेही योग्य नियोजन करून ते कसोशीने पाळण्यात मात्र कमी पडतो.’ मोठय़ा संकटाने खडबडून जागे होऊन सर्व ताकदीनिशी लढणे सोपे, की संकट येऊच नये याकरिता दूरदृष्टीने छोटीछोटी पावले उचलत यंत्रणा मजबूत ठेवणे सोपे? आपल्या आरोग्य यंत्रणेत वेळ पाळणे, नियम आखणे, नियम पाळणे, याद्यांनुसार शिस्तीने कार्य करणे, मनुष्यबळाचा वापर आणि सक्षमीकरण करणे अशा मूलभूत गोष्टी बाजूलाच पडतात.

ही मूलभूत शिस्त यंत्रणेत मुरली तर भारतात कुठेही  ‘गोरखपूर’ची पुनरावृत्ती होणार नाही.

सागर अत्रे  gundiatre@gmail.com

मुक्ता गुंडी