तणावाखाली काम करणाऱ्या पेशांमधे असलेल्यांचे रागाचे, नैराश्याचे अत्यंत हिंस्र असे प्रदर्शन काही घटनांमधून दिसले आहे. स्वत:च्या वरिष्ठांवर आणि कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करणे अशा अनेक हिंसक घटना वारंवार पोलीस, सैन्य आणि काही इतर सुरक्षा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून घडल्या आहेत. आपल्या समाजाचे रक्षण करणाऱ्यांमध्येच हा मानसिक त्रास आढळणे हे आपल्या सुरक्षा यंत्रणेसाठी आणि परिणामत: समाजासाठी एक काळजीची बाब आहे. कोणती आहे ही मूक वेदना आणि काय आहे डॉग थेरपी.

‘‘तसा मी ठीक आहे, काम करू शकतो. पण महिन्यातले अनेक दिवस माझ्या पत्नीला आणि माझ्या बाळाला माझ्यापासून लांब राहणे अनिवार्य असते. माझ्या भावनांचा उद्रेक होतो.. कशामुळे ते नीट सांगता येणार नाही.. माझ्या बाळाच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून मग मी एकटा राहतो..’’ इराकच्या सीमेवर कित्येक वर्षे राहून परत आपल्या मायदेशी आलेला अमेरिकी सैनिक एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगतो. बिघडलेले राजकीय संबंध, तेलाच्या साठय़ाकरिता खेळले जाणारे आंतरराष्ट्रीय राजकारण, सत्तापिपासू मानसिकतेतून केले जाणारे बॉम्बहल्ले किंवा धार्मिक द्वेषातून केल्या जाणाऱ्या हिंसक कारवाया.. या सगळ्याचा सामान्य नागरिकाशी येणारा संबंध केवळ बातम्या, चर्चा आणि त्यानंतर क्वचित व्यक्त केलेली हळहळ इथपर्यंत मर्यादित राहतो.

जगभरात लढली गेलेली युद्धे ही एका प्रचंड मोठय़ा सामाजिक आरोग्याच्या प्रश्नाला निमंत्रण देत असतात हे आपल्या लक्षातही येत नाही. युद्धात गमावले जाणारे जीव, भळभळणाऱ्या जखमा आणि युद्धग्रस्त परिसरात पसरणारे रोगांचे साम्राज्य यापलीकडे युद्धातून एक मूक वेदना जन्म घेत असते, जी दिवसेंदिवस हिंसक होत जाणाऱ्या समाजाचे प्रतीक आहे. या वेदनेचे नाव आहे-

पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पी.टी.एस.डी) अर्थात वेदनेपश्चात अनुभवाला येणारा ताण. युद्धभूमीवर वर्षांनुवर्षे पहारा देणाऱ्या, हल्लय़ांना तोंड देणाऱ्या सैनिकांमध्ये दिसून येणारा हा

मानसिक आजार समाजाचे आणि बिघडलेल्या समाजाच्या मानसिकतेचे एक भयाण वास्तव

सांगत आहे.

अमेरिकेतील ‘रँड’ या संशोधन संस्थेने इराक आणि अफगाणिस्तान येथील युद्धभूमीवर अनेक वर्षे राहिलेल्या सैनिकांमध्ये दिसणाऱ्या पी.टी.एस.डी.चा अभ्यास केला तेव्हा समाजातील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले. हा अभ्यास दर्शवतो की २००१पासून सुमारे १.६४ दशलक्ष (१६ कोटी ४० लाख) अमेरिकी सैनिक इराक व अफगाणिस्तान येथे पाठवले गेले होते. तिथून परतून आलेल्या प्रत्येक पाच सैनिकांमागे एका सैनिकाला या मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. वर्षांनुवर्षे कुटुंबापासून लांब राहावे लागणे, मिलिटरी सेक्शुअल ट्रॉमा अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक शोषण, घडय़ाळाच्या प्रत्येक ठोक्याला ठेवावी लागणारी सजगता, धमक्या, जखमा आणि रोज नव्याने अनुभवाला येणारा तणाव अशा कित्येक कारणांमध्ये या मानसिक त्रासाची मुळे लपलेली असतात.

युद्धभूमीवरून परतल्यावर या त्रासाचे निदान झाले तरी अनेक सैनिक त्याकरिता उपचार घेण्यास टाळतात. आपल्यावरचा इतरांचा विश्वास कमी होईल, आपण दुबळे सैनिक आहोत असे सिद्ध होईल, अशी भीती वाटल्याने कित्येक सैनिक (पुरुष व स्त्रिया) आपला त्रास लपवून जगात राहतात तर काही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मानसिक आजाराचे निदान झाले तर निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाच्या संधी गमावून बसावे लागेल या भीतीपोटी प्रचंड मोठय़ा संख्येने हा त्रास समाजात लपलेला राहतो. या त्रासाने ग्रस्त असणारे अनेक सैनिक दारू, नशा यांच्या आहारी जातात ज्यामुळे त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. अमेरिकेत दर दोन वर्षांकाठी पी.टी.एस.डी.शी संबंधित प्रत्येक रुग्णामागील खर्च हा सुमारे पाच हजार डॉलर्स इतका प्रचंड आहे.

अमेरिकेतील पी.टी.एस.डी.बाधित सैनिकांकरिता शासनातर्फे मानसोपचार पुरवले जातात तसेच आर्थिक साहाय्य केले जाते. रुग्णांना दवाखान्यात उपचार देणे, औषधोपचार करणे, क्रिटिकल केअर पुरवणे व रुग्णांचे योग्य पुनर्वसन करणे असे या उपचारांचे स्वरूप असते. याबरोबरच काही वर्षांपासून अमेरिकेतील स्वयंसेवी संस्था या रुग्णांकरिता एक अनोखी थेरपी वापरत आहेत, जिचे नाव आहे – डॉग थेरपी.

पी.टी.एस.डी.बाधित सैनिकांनी लॅब्रेडॉर किंवा गोल्डन रिट्रिवर्स जातीच्या प्रशिक्षित कुत्र्यांसोबत सुमारे सहा आठवडे राहण्याच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. या प्राणिमित्रासोबत गप्पा मारायच्या, त्याला कुरवाळायचं, खेळायचं आणि न्याहाळायचं! काही अभ्यासातून असे दिसून आले की डॉग थेरपीमुळे पी.टी.एस.डी.ग्रस्त रुग्णांमधील एकटेपणाची भावना कमी होऊ  लागली, त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावासा वाटू लागला, आत्मविश्वास वाढू लागला आणि मनाला शांत वाटू लागलं. पी.टी.एस.डी.ग्रस्त सैनिकांना ‘आपल्याला कुणी भोसकते आहे’ असा भास होऊन भीती वाटत असते, ज्यामुळे त्यांना कुणाला साधी मिठी मारतानाही असुरक्षितता वाटते. डॉग थेरपीमुळे त्यांना स्पर्शातला आपलेपणा पुन्हा हवासा वाटू लागतो. ‘वॉरियर कॅनाईन कनेक्शन’ या प्रकल्पाद्वारे कुत्र्यांच्या सोबतीमुळे ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक वाढून त्याचा शरीरावर नेमका कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतो, याविषयीचे संशोधन चालू आहे.

या सगळ्या माहितीचा सामाजिक आरोग्याशी संबंध काय, असा प्रश्न मनात येऊ  शकतो. गेल्या काही वर्षांकडे वळून पाहिल्यावर लक्षात येईल की येमेन, सीरिया, जॉर्डन, सुदान, अफगाणिस्तान, इराक, सोमालिया, तुर्कस्तान अशा असंख्य देशांमध्ये अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धे झाली आहेत, आजही सुरू आहेत. जगातील कोटय़वधी माणसे आज सैनिक म्हणून कोणत्या ना कोणत्या युद्धभूमीवर पहारा देत आहेत. हे सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि युद्धग्रस्त जनता पी.टी.एस.डी.सारख्या वेदनेच्या वर्षांनुवर्षे जणू काही दाराशी उभे असतात. सामाजिक आरोग्य क्षेत्रात आजवर असे एकही संशोधन झालेले नाही, जे जगभरातील पी.टी.एस.डी.ग्रस्त सैनिकांची नेमकी आकडेवारी सांगू शकेल. आकडेवारी माहीत नसल्याने उपचार करण्याची क्षमताही अत्यंत तोकडी राहते. एखाद्या युद्धात किती सैनिकांनी प्राण गमावले हे मोजले जाते. परंतु पी.टी.एस.डी.सारख्या आजाराची मूक वेदना सहन करणारे आणि आपले आरोग्य पणाला लावत जगणारे असंख्य सैनिक जगातील प्रत्येक युद्धभूमीवर असतात. समाजाचा महत्त्वाचा भाग असणारा हा समुदाय मानसोपचाराच्या अपुऱ्या सुविधा आणि तोकडे संशोधन असा दुहेरी प्रश्न उभा ठाकलेला असताना नेमका कशाच्या बळावर या आजाराशी मुकाबला करणार आहे?

खरं तर, केवळ सैनिकच नव्हे तर अत्यंत ताणाखाली काम करणाऱ्या पोलिसांमध्येही पी.टी.एस.डी.चे प्रमाण किती याविषयी निदान भारतात तरी सखोल अभ्यास झालेला दिसून येत नाही. शरीराला जखम झाल्यास आपण तात्काळ प्रथमोपचार करतो, परंतु सतत तणावाखाली जगणाऱ्या जवानांकरिता आणि पोलिसांकरिता मानसिक प्रथमोपचार करणे किती आवश्यक आहे, याची जाणीव सामाजिक आरोग्य क्षेत्रातील संशोधकांना व कार्यकर्त्यांना होऊ  लागली आहे. युद्धग्रस्त देशांमध्ये आरोग्य, पुनर्वसन आदी बाबतीतील मदत पुरवण्याचे कार्य ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ ही सेवाभावी संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. या संस्थेद्वारे जॉर्डन येथे कार्य करताना मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कामिनी देशमुख यांनी पी.टी.एस.डी.शी सामना करणाऱ्या रुग्णांकरिता मानसिक प्रथमोपचारांची मार्गदर्शक प्रणाली लिहिण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करणे ही सामाजाची जबाबदारी म्हणून बघता येईल का? सामाजिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांची फळी तयार करणे, मानसोपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक तयार करणे, मानसिक प्रथमोपचारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सतत तणाव आणि हिंसेला सामोरे जाव्या लागणाऱ्या सैनिक, पोलिसांसारख्या व्यक्तींच्या मानसोपचारासाठी काही ठोस संशोधन व सोयी करणे आवश्यक आहे.

तणावाखाली काम करणाऱ्या पेशांमध्ये काम करणाऱ्यांच्या रागाचे, नैराश्याचे अत्यंत हिंस्र असे प्रदर्शन काही घटनांमधून दिसले आहे. स्वत:च्या वरिष्ठांवर आणि कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करणे अशा अनेक हिंसक घटना वारंवार पोलीस, सैन्य आणि काही इतर सुरक्षा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून घडल्या आहेत. आपल्या समाजाचे रक्षण करणाऱ्यांमध्येच हा मानसिक त्रास आढळणे हे आपल्या सुरक्षा यंत्रणेसाठी आणि परिणामत: समाजासाठी एक काळजीची बाब आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना, जगभरात अनेक देशांमध्ये उफाळून आलेली हुकूमशाही, केवळ सीमेवर केले जाणारे युद्धच नव्हे तर आण्विक, जैविक तसेच रासायनिक युद्धाची वाढती शक्यता.. अशा पराकोटीच्या हिंसेच्या शक्यतांना प्रत्यक्ष तोंड देत जगत राहणारा मोठा समाज आपल्या आजूबाजूला आहे. या समाजाच्या मूक वेदनांकडे दुर्लक्ष करणे केवळ अन्याय्यच नाही तर आपल्या निर्ढावलेपणाचेही लक्षण आहे. सामाजिक आरोग्याच्या कक्षा रुंदावत आपण हिंसा आणि सामाजिक आरोग्य यांच्यातील घट्ट नाते डोळसपणे बघायला हवे.

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com