बिर्ला सनलाइफ बॅलंस्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड

महेंद्र कोठारी हे ‘लोकसत्ता’चे शिवम नगर, पंचवटी, नाशिक येथील वाचक आहेत. मारवाडी समाजात मुलींची लग्ने लहान वयात होत असल्याने कोठारी यांनी त्यांची मुलगी लहान असताना, मुलीच्या लग्नाच्या खर्चाची तजवीज म्हणून काही गुंतवणूक केली होती. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर या गुंतवणुकीची मुदतपूर्ती होईल असे त्यामागे नियोजन होते. सरलेल्या जून महिन्यात ही रक्कम मुदतपूर्तीनंतर हातात आली. दरम्यान कोठारी यांच्या मुलीने मास्टर्ससाठी प्रवेश घेतल्याने पुढील किमान ३-४ वर्षे त्यांना या पैशाची आवश्यकता नाही. हे पैसे कुठे गुंतवावे, असा प्रश्न महेंद्र कोठारी यांना पडला. सांप्रतच्या परिस्थितीत बिर्ला सनलाइफ बॅलंस्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड योग्य ठरेल, असे त्यांना सांगितले. गुंतवणुकीचा मुख्य उद्देश हा गुंतवणुकीवर होणाऱ्या नफ्याचा दर महागाईच्या दराहून अधिक असावा व मुदलाची सुरक्षितता असावी हे होते. हे दोन्ही उद्देश या गुंतवणुकीत सफल होत आहेत. गुंतवणूकविषयक निर्णय घेताना भावनेला स्थान नसावे, असे सांगितले जाते; परंतु नेहमीच अधिक नफ्याचा मोह आणि भांडवल गमावण्याची भीती या दोन भावना प्रबळ असतात. आकडेवारीऐवजी या भावना निर्णयाच्या केंद्रस्थानी येतात.

बिर्ला सनलाइफ बॅलंस्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड हा अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड आहे. अधिक नफ्याचा मोह आणि भांडवल गमावण्याची भीती या दोन भावनांना गुंतवणुकीत वगळून निव्वळ समभागाच्या मूल्यांकनाच्या गुणोत्तरानुसार समभाग, रोखे व आर्ब्रिटाज यांचे प्रमाण ठरते. तत्कालीन मूल्यांकनानुसार समभाग गुंतवणुकीचे एकत्रित गुंतवणुकीशी प्रमाण २० ते ९० टक्क्य़ांदरम्यान असते. सध्या या फंडात समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ४२ टक्के आहे. या फंडाचा पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. जुलै महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीतून ११ समभाग वगळण्यात आले, तर स्टेट बँक, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोलगेट, तामिळनाडू न्यूज प्रिंट व कोल इंडिया हे समभाग नव्याने समाविष्ट झाले. पहिले पाच समभाग एकूण गुंतवणुकीच्या २६.५१ टक्के, १० समभाग एकूण गुंतवणुकीच्या ३६.५७ टक्के आहेत. फंडाच्या एनएव्हीतील अवास्तव चढ-उतार टाळण्याच्या दृष्टीने फंडाच्या गुंतवणुकीत लार्ज कॅप समभागांचा समावेश असून, मिड कॅप समभागांचा समावेश टाळण्याकडे फंड व्यवस्थापनाचा कल असतो. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक या प्रमुख समभाग गुंतवणुका आहेत. रोखे गुंतवणुकांत भारत सरकारचे कर्जरोखे नसणे हे या फंडाचे वैशिष्टय़ आहे. जून २०१७ अखेरीस फंडाचा पी/ई २५.६ होता. क्रिसिल बॅलंस्ड फंड इंडेक्स (अ‍ॅग्रेसिव्ह) हा फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाचा परतावा हा संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा सरसरी २.३६ टक्के अधिक आहे.

हा फंड ‘एसआयपी’साठी नसून वर उल्लेख केलेल्या परिस्थितीसारखी परिस्थिती उद्भवल्यास २ ते ५ वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी हा आदर्श फंड आहे. मागील पाच वर्षांत वेगवेगळ्या दिवशी केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक परतावा सोबतच्या कोष्टकात दिला आहे. पुढील तीन वर्षांत महेंद्र कोठारी यांना त्यांना केलेल्या गुंतवणुकीवर नेमका किती परतावा मिळेल हे खात्रीपूर्वक सांगता येत नसले तरी वार्षिक परतावा ११.५० ते १३.५० टक्क्यांदरम्यान मिळेल असा अंदाज वर्तविता येईल.

फंडाची गुंतवणूक धोरणे लिखित स्वरूपात जी उपलब्ध आहेत, त्यावरून सध्या बाजार निर्देशांक घसरले असताना, निधी व्यवस्थापकाकडून फंडातील समभाग गुंतवणुकीत वाढ होईल. भविष्यात उत्सर्जन वाढल्यामुळे बीएसई १०० या निर्देशांकाचा पी/ई वाढल्यास गुंतवणुकीतील समभाग विकून रोखे गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल. या दोन धोरणांमुळे अधिक नफ्याचा मोह आणि भांडवल गमावण्याची भीती या दोन भावनांवर काबू मिळविणे शक्य होणार आहे. केवळ स्टार रेटिंगवर गुंतवणुकीची शिफारस करणाऱ्या पोथीनिष्ठ सल्लागारांना हा फंड कदाचित पसंत पडणार नाही, कारण फंडाची शिफारस करण्याची त्यांचे निकष वेगळे असतात. गुंतवणूकदाराची गरज असलेला फंड त्यांच्या निकषांत बसत नाही. साहजिकच गुंतवणूकदारांकडे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड फारसे दिसत नाही त. महेंद्र कोठारी यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले. पहिला रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करून वार्षिक ७ ते ८ टक्क्यांदरम्यान परतावा मिळविणे. गुंतवणूक तीन वर्षांहून अधिक काळ राहिली तर इंडेक्सेशनचा लाभ मिळवून कर कार्यक्षमता वाढविणे. दुसरा पर्याय इक्विटी सेव्हिंग्ज फंडात एका वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक करून ७ टक्क्य़ांदरम्यान करमुक्त उत्पन्न मिळविणे. तिसरा या फंडाचा पर्याय. ज्यातून १२ ते १३ टक्के या दरम्यान एका वर्षांनंतर करमुक्त उत्पन्न मिळविणे. महेंद्र कोठारी यांनी तिसरा पर्याय निवडला.

अर्थशास्त्रीय वर्तन (बिहेव्हेरियल इकॉनॉमिक्स) ही विद्याशाखा नव्याने उदयास येत आहे. वेगवेगळ्या आर्थिक आवर्तनांत गुंतवणूकदाराचे वर्तन कसे असेल याचा अभ्यास या विद्याशाखेत केला जातो. मानवी स्वभावाची अर्थसंवेदनशीलता या विद्याशाखेत मोजली जाते. या शाखेच्या अभ्यासकांनी काही निष्कर्षांची नोंद केली आहे. भावना आणि निर्णयक्षमता यांचा अभ्यास करून सध्याच्या परिस्थितीत दोन प्रकारची आर्थिक वर्तने अपेक्षित आहेत. पहिले मागील परतावा बघून नफ्याच्या लोभापायी मिड कॅप फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार किंवा सांप्रत बाजाराची परिस्थिती पाहता धोका टाळून बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करणारे शेकडा ९० टक्के गुंतवणूकदार या दोन गटांत विभागले आहेत. केवळ १० टक्के गुंतवणूकदार विवेकी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. भीती आणि मोह या दोन टोकांच्या मानवी भावनांमध्ये विवेक जागृत असणारे गुंतवणूकदार हे अल्पसंख्याक असतात. दोन वर्षांपूर्वी ५० कोटींची मालमत्ता असलेला हा फंड आज १,७०० कोटींवर पोहोचला आहे. या फंडात नवीन गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक करीत असून महिन्यागणिक फंडाच्या मालमत्तेत सातत्याने वाढ होत आहे. अनेक गुंतवणूकदार इक्विटी फंडातून नफा कमावून अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडात गुंतवणूक करताना दिसत आहेत. महेंद्र कोठारी यांची कन्या मेघा हिचे कार्य सिद्धीस नेण्यास श्रीसमर्थ आहेच. संकल्पाला सिद्धीकडे नेण्यासाठी योग्य साधनांची आवश्यकता असते. हे साधन सुचविण्याचे काम गुंतवणूक मार्गदर्शकाचे असते. तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सुचविलेल्या फंडाची ही साठा उत्तरांची कहाणी. पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com