एप्रिल २०१५ मधील एक घटना आहे. आमच्या कार्यालयात एक फोन आला. रायगड जिल्ह्य़ातून मला डॉ. पराग वैशंपायन यांना, सीडीएसएलमधून त्यांच्या आईच्या नावाने एक पत्र आले होते. पत्रामध्ये आईच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीची माहिती होती, परंतु अशी काही गुंतवणूक केल्याचे त्यांना आठवत नव्हते. मात्र पुढे जेव्हा त्यांना समजले की, अशी काही गुंतवणूक म्युच्युअल फेडाद्वारे केली गेली होती आणि त्यांची किंमत आता चांगली वाढली आहे तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. डॉ. पराग वैशंपायन यांच्या या सुखद अनुभवानंतर अशा प्रकारचे प्रश्न करणाऱ्या फोन-पत्रांचा क्रमच सुरूच झाला. ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी मंजुबा ठाकूर देसाई यांनाही अशाच एका पत्राद्वारे त्यांच्या सासरेबुवांनी, त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तरतूद म्हणून केलेल्या गुंतवणुकीचा शोध लागला. या सर्वानी सीडीएसएलचे मनोभावे आभार मानले आहेत. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची माहिती जेव्हा नव्याने गुंतवणूकदारांना होते तेव्हा त्यांना खूपच आनंद होतो, हा आमच्या कार्यालयातील अशा प्रकारचे फोन घेणाऱ्या मनाली भोसले यांचा नित्याचा अनुभव आहे. या सर्व प्रकारचे मूळ ‘सेबी’ने सुरू केलेल्या ‘कास’ म्हणजे Consolidated Account Statement पाठविण्याच्या पद्धतीमध्ये लपलेले आहे.

सेबीने काढलेल्या एका परिपत्रकानुसार मार्च २०१५ पासून जर एखाद्या गुंतवणूकदाराने डिमॅट खात्यात शेअर्स अथवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचे नियतकालात विवरण देणे डिपॉझिटरीने (डीपी) देणे बंधनकारक आहे.

सेबीच्या अखत्यारीत येत असणाऱ्या दोन्ही डिपॉझिटरी तसेच म्युच्युअल फंड चालविणाऱ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (एएमसी) किंवा त्यांनी नियुक्त केलेले रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए) यांनी हे विवरण पत्र पाठविणे आवश्यक आहे.

आणखी काही उदाहरणांतून हे समजावून घेऊ.

१) जर एखाद्या गुंतवणूकदाराने सीडीएसएल डीपीकडे खाते उघडले असेल व त्यानंतर काही म्युच्युअल फंडाची युनिट्स खरेदी केली असतील, तर सीडीएसएलकडून हे विवरणपत्र गुंतवणूकदाराला जाईल.

२) जर गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते सीडीएसएल आणि एनएसडीएल अशा दोन्ही डिपॉझिटरींमध्ये असेल, तर ज्या डिपॉझिटरीमध्ये प्रथम खाते उघडले आहे ती डिपॉझिटरी असे पत्र गुंतवणूकदारांना पाठवेल.

३) जर गुंतवणूकदाराचे डिमॅट खातेच नसेल, परंतु त्यांची म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक असेल, तर एएमसी किंवा तिने नियुक्त केलेला आरटीए यांच्यातर्फे  टपाल/कुरिअरने किंवा ई-मेलद्वारा हे विवरणपत्र गुंतवणूकदारास पाठविले जाईल.

ज्या गुंतवणूकदारांनी एखाद्या महिन्यात शेअर्स अथवा म्युच्युअल फंडात खरेदी/विक्री केली असेल तर त्यांना पुढील महिन्यात या महिन्याचे विवरणपत्र पाठविणे आवश्यक आहे; परंतु जर या खात्यात जर काहीच व्यवहार होत नसतील, तर मात्र दर सहा महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर/मार्चअखेरीस असे पत्र पाठविणे सेबीने बंधनकारक केले आहे.

जरी एखाद्या गुंतवणूकदाराची दरमहा ५०० रुपयांचीही एसआयपी चालू असेल तरी त्याला साहजिकच असे विवरणपत्र दरमहा मिळत राहील व यातून त्याला आपण केलेल्या गुंतवणुकीमध्ये झालेला नफा/तोटा समजू शकेल.

अशा प्रकारे विवरण पाठविण्यासाठीसंबंधी डिपॉझिटरी कायम खाते क्रमांक- पॅन डेटाबेसचा आधार घेत असून गुंतवणूकदाराच्या पॅन क्रमांकाप्रमाणे त्याने केलेल्या सर्व गुंतवणुकीचा आढावा एकत्र करून हे बनविण्यात येते, तसेच प्रत्येक गुंतवणूकदाराला जर त्याचे खाते दोन्ही डिपॉझिटरीमध्ये असेल तर विवरणपत्र कुठून मिळावे याचा विकल्प देण्याची सुविधा आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदारास ‘कास’ विवरण मिळत नसेल तर ‘सीडीएसएल’च्या संकेतस्थळावर जाऊन असे खाते विवरण मागणे शक्य आहे. त्यासाठी खाते क्रमांक, पॅन क्रमांक, जन्मतारीख अशा प्रकारची माहिती भरून दिल्यास हे मिळणे सहज शक्य आहे.

या सर्व व्यवहारात अधिक पारदर्शकता यावी यासाठी एप्रिल २०१६ मध्ये सेबीने अजून एक परिपत्रक जारी केले ज्यानुसार गुंतवणूकदारांनी जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना केलेली रक्कम आणि तिचे आताचे मूल्य (नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू – एनएव्ही) अशा दोन्ही रकमा नमूद केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक गुंतवणुकीतील किती हिस्सा वितरकाला दिला जातो याची टक्केवारीसुद्धा नमूद करणे आवश्यक आहे. (नमुनादाखल सोबत दिलेले कोष्टक पाहावे.)

सध्या भारतीय शेअर बाजारात तेजी सुरूअसून डिमॅट खात्यांची संख्या २ कोटी ८० लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर म्युच्युअल फंडधारकांची संख्या ५ कोटी ६१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मे महिन्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक गंगाजळी २० लाख कोटींपल्याड पोहोचेल, असे कयास आहेत. म्युच्युअल फंडातील ही गुंतवणूक डिमॅट स्वरूपात घेण्याचीही सोय आता सेबीने केली असून जसे आपण एखाद्या ब्रोकरकडे शेअर्स घेतो तसेच म्युच्युअल फंड युनिटसुद्धा घेण्या-विकण्याची सुविधा आता मिळू शकते.

सध्या भारतीय शेअरबाजारात सेन्सेक्स/निफ्टीने नवनवीन उच्चांक करत असताना गुंतवणूकदारांनीसुद्धा या तेजीचा फायदा आपली वित्तीय ध्येये गाठण्यासाठी करून घ्यावा.

अजित प्रभाकर मंजुरे AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.