वर्ष १९३९ मध्ये न्यू स्टँडर्ड इंजिनीयरिंग कंपनी लिमिटेड या नावाने सुरू झालेली ही कंपनी इंजिनीयरिंग क्षेत्रातील आद्य प्रवर्तक कंपनी मानली जाते. औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेली अनेक उत्पादने कंपनी पुरविते. यात प्रामुख्याने वस्त्रोद्योग, रेल्वे, फोर्जिग. ऑर्डनन्स फॅक्टरीज, ऑफशोअर आणि इतर उद्योगांचा समावेश होतो. कंपनीची उत्पादने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही निर्यात होतात. कंपनी इंजिनीयरिंग क्षेत्राखेरीज इतरही क्षेत्रांत कार्यरत असल्याने कंपनीचे नाव बदलून ते नेस्को लिमिटेड करण्यात आले.

वर्ष १९८६ मध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कंपनीने १९९२ पासून आपल्या मुंबईतील गोरेगावमधील मोठय़ा मोकळ्या जागेचा औद्योगिक क्षेत्रातील प्रदर्शने भरवण्यासाठी उपयोग करायचे ठरविले. आज भारतातील सर्वात मोठय़ा औद्योगिक प्रदर्शनासाठी नेस्कोचे नाव प्रकर्षांने घेतले जाते. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगावमध्ये ७० एकर जमिनीवर आज पाच लाख चौरस फुटांची वातानुकूलित दालनक्षमता असलेली ही एकमेव औद्योगिक प्रदर्शनाची जागा आहे. कंपनीने आतापर्यंत ५०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरवली असून त्यासाठी कायमस्वरूपी २,००० चौरस मीटर ते २०,००० चौरस मीटरची अनेक सुविधांसाह संपूर्ण वातानुकूलित सभागृहे बांधली आहेत. कुठलेही कर्ज नसलेली नेस्को गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे.

नेस्कोचे जून २०१७ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आहेत. या कालावधीत कंपनीने ६४.९३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४१.६९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १६ टक्क्य़ांनी अधिक आहे. निश्चलनीकरणाच्या आघातानंतरच्या तिमाहीतील तसेच औद्योगिक क्षेत्रातील मरगळ पाहता हे निकाल चांगलेच आहेत.

सध्या नेस्कोचा शेअरचा बाजारभाव २,४०० रुपयांच्या आसपास आहे. मात्र लवकरच कंपनी भागधारकांच्या संमतीने आपल्या शेअर्सचे विभाजन करणार आहे.

कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता येत्या दोन वर्षांत मोठा लाभांश अथवा बोनस शेअर्सचीही अपेक्षा आहे. काही कंपन्यांचे शेअर्स फक्त ठेवून देण्याकरिता असतात, त्यात नेस्कोची गणना करता येईल.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.