मुंबई शेअर बाजारात १९९५ मध्ये नोंदणी झालेली शिल्पा मेडिकेअरची स्थापना खरे तर आठ वर्षे आधी म्हणजे १९८७ साली शिल्पा अॅण्टिबायोटिक्स या नावाने झाली होती. त्यानंतर शिल्पा मेडिकेअरने आपला विस्तार वाढवताना एपीआय, फॉम्र्युलेशन्स आणि आरोग्य निगा क्षेत्रात प्रवेश केला. अर्थात आज शिल्पा मेडिकेअरचे जे स्थान आहे त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला श्रेय द्यायलाच हवे. गेल्या दशकभरात कंपनीने आपली गुणवत्ता राखत उत्पादन क्षमता वाढवलीच, पण त्याखेरीज आवश्यक तेथे गुंतवणूक करून विस्तारीकरणदेखील केले. यामध्ये २००७ सालात ‘लोबा फिनकेम’ ही ऑस्ट्रियातील कंपनी ताब्यात घेणे आणि २००९ मध्ये ओंकोलॉजीमधील अॅनस्त्राझोलच्या उत्पादनासाठी ५०:५० भागीदारीत इटालियन कंपनीशी करार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मुख्य म्हणजे अशा गुंतवणूक आणि विस्तारीकरणासाठी कंपनीने कर्ज घेतलेले नाही आणि म्हणूनच केवळ ०.१३ असे डेट/ इक्विटी गुणोत्तर असलेल्या शिल्पा मेडिकेअर किंवा विनाती ऑरगॅनिक्ससारख्या कंपन्या एक आकर्षक पर्याय वाटू लागतात. गेल्या काही वर्षांत आपल्या संशोधनाने शिल्पा मेडिकेअरने एचआयव्ही तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. कॅन्सरसाठी कंपनीकडे २५ हून अधिक औषधे असून एचआयव्हीसाठीदेखील ७ औषधांची निर्मिती तिने केली आहे. आज केवळ भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिका, जपान तसेच इतर अनेक देशांत शिल्पा मेडिकेअरने आपली उत्पादने उपलब्ध केली आहेत. आपल्या एपीआय उत्पादनासाठी कंपनीची कर्नाटकात रायचूर येथे तीन उत्पादन सुविधा असून त्यातील एक १०० टक्के निर्यातप्रधान आहे. तसेच ऑस्ट्रिया येथेदेखील कंपनीचे उत्पादन केंद्र आहे, तर फॉम्र्युलेशन्ससाठी कंपनीची हैदराबाद, जडचेरला आणि शादनगर येथे उत्पादन केंद्रे आहेत. ३० जून २०१७ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने १५८.०८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २७.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो २१ टक्क्य़ांनी अधिक आहे. आज शेअर बाजारात दोलायमान स्थिती असताना उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधणे आवश्यक आहे. शिल्पा मेडिकेअरसारख्या कंपन्यांतील गुंतवणूक दीर्घकाळात फायद्याची ठरेल यात शंका नाही. शिल्पा मेडिकेअर लिमिटेड (बीएसई कोड - ५३०५४९) मिड कॅप समभाग शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ५४.७४ परदेशी गुंतवणूकदार १८.७१ बँक/ म्यु. फंड / सरकार ०.१४ इतर २६.४१ बाजारभाव (रु.) ५६०.०० उत्पादन/ व्यवसाय औषधनिर्माण भरणा झालेले भागभांडवल (रु.) ८.०१ कोटी पुस्तकी मूल्य (रु.) १२०.६ दर्शनी मूल्य (रु.) १/- लाभांश (%) ६० % प्रति समभाग उत्पन्न (रु.) १६.८४ पी/ई गुणोत्तर ३३.६ समग्र पी/ई गुणोत्तर -- डेट/इक्विटी गुणोत्तर ०.१३ इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर ६६ रिटर्न ऑन नेटवर्थ (%) १७.८७ बीटा ०.९ बाजार भांडवल (कोटी रु.) ४५४० ५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.) ७८७/ ५१७ सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.