पहिल्या तिमाहीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे आणि जागरूक गुंतवणूकदार या कालावधीत नेहमीच आर्थिक निष्कर्ष तपासून पाहात असतो. येस बँकेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. भारतीय बँकांची सध्याची परिस्थिती पाहता या क्षेत्रात गुंतवणूक जास्त जोखमीची आहे असे वाटणे साहजिक आहे. मात्र खासगी बँकांकडे बारकाईने लक्ष दिल्यास ती फायद्याची गुंतवणूक ठरू शकते.

येस बँकेने पहिल्या सहामाहीत उत्तम निकाल जाहीर करून सर्वानाच सुखद धक्का दिला आहे. जून २०१७ साठी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीसाठी बँकेच्या नक्त नफ्यात ३१.९ टक्के वाढ होऊन तो ९६५.५ कोटीवर गेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नक्त व्याज उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४४ टक्क्य़ांनी झालेली वाढ. यंदा १८०८.९ कोटी रुपयांचे व्याज उत्पन मिळवणाऱ्या येस बँकेने आपल्या अनुत्पादित कर्जावर देखील चांगलाच अंकुश ठेवला आहे. बँकेचे नक्त अनुत्पादित कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण स्पर्धक बँकांच्या तुलनेत अत्यल्प केवळ ०.३९ टक्के आहे.  बँकेची इतर गुणोत्तरेही उत्तम आहेत. २२.६ टक्के ठेवीत झालेली वाढ तसेच कर्ज वाटपातील ३२.१ टक्क्य़ांची दमदार वाढ आणि १७.६ टक्के कॅपिटल अ‍ॅडिक्वेसी गुणोत्तर तसेच व्याजेतर उत्पन्नातील वाढ हे पाहता या शेअरचे मूल्यांकन आकर्षक वाटू लागले आहे. गेल्या तिमाहीत बँकेने २० शाखा उघडल्या असून ११ एटीएम केंद्रे सुरूकेली आहेत. आज येस बँकेच्या एकंदर १०२० शाखा असून १७९६ एटीएम आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने शेअर विभाजनाचा निर्णय घेतला आहे. रिझव्‍‌र्ह बँक तसेच भागधारकांच्या परवानगीनंतर १० रुपयांच्या एका शेअरचे पाच शेअर्समध्ये विभाजन होईल.

सध्या १८०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.