वाचकांकडून येणाऱ्या प्रश्नांमधून काही जणांकडून क्रेडिट स्कोअर अर्थात पतगुणांक या संकल्पनेची विचारणा करण्यात आली. यासंबंधी माहिती बँकांना कशी मिळते याचे कोडे काही जणांना पडले आहे. आज आपण क्रेडिट स्कोअरविषयी सखोल माहिती अभ्यासू.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

थोडक्यात सांगायचे तर क्रेडिट स्कोअर तुमची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितो. आपण कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी जसे बँका आपल्या काही गोष्टींची तपासणी करतात. जसे की, मिळकत, गहाण ठेवण्यात येणारी मालमत्ता इत्यादी. त्याच प्रकारे आपण पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड योग्य वेळी केली आहे किंवा नाही, तसेच सगळे हप्ते वेळेवर भरले अथवा नाही, याची सविस्तर माहिती बँकांजवळ उपलब्ध असते. या माहितीनुसार तुमची कर्ज घेण्याची पात्रता ठरविली जाते.

ही माहिती काही ठरावीक संस्थांमार्फत बँकांना देण्यात येते. त्यांना क्रेडिट रेटिंग एजन्सी असे म्हणतात. त्यापैकी सर्वात जुनी व नावाजलेली संस्था म्हणजे ‘सिबील’ ही आहे.

क्रेडिट स्कोअर कोणत्या बाबींवर ठरविला जातो:

क्रेडिट स्कोअर देताना क्रेडिट रेटिंग एजन्सी बऱ्याच बाबी लक्षात घेतात. त्यापैकी मुख्यत्वाने येणाऱ्या काही बाबी खालीलप्रमाणे:

१. पूर्वी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तुम्ही वेळेवर भरले होते का?

२. पूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यास तुम्ही असमर्थ ठरला होतात का?

३. पूर्वीच्या कर्ज परतफेडीला उशीर झाल्यामुळे त्या कर्ज देणाऱ्या संस्थेने किंवा बँकेने तुम्हाला कोणताही दंड आकारला होता का?

४. आपण क्रेडिट कार्डधारक असल्यास आपल्या क्रेडिट कार्डची देयके आपण वेळेवर भरता किंवा नाही?

५. क्रेडिट कार्डची देयके वेळेवर भरत नसल्यास किती विलंब होतो? म्हणजेच मुदत उलटून गेल्यानंतर आपण देयक भरता का?

६. इतर कुणा थकबाकीदाराच्या कर्जासाठी आपण जामीन राहिला आहात का?

या व यांसारख्या इतर बाबी आपला क्रेडिट स्कोअर ठरवितात. पूर्वीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यास दिरंगाई किंवा असमर्थता यामुळे आपला क्रेडिट स्कोअर घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर बाबींवरून कर्ज घेण्याची अर्हता असूनसुद्धा क्रेडिट स्कोअर कमी असल्यामुळे कर्जमंजुरी मिळताना अडचणी येऊ  शकतात किंवा अर्ज केलेल्या रकमेपेक्षा कमी रकमेची मंजुरी मिळू शकते.

क्रेडिट स्कोअर चांगला असण्याचे फायदे:

१. चांगल्या नावाजलेल्या संस्थांकडून कर्जमंजुरी मिळण्यास मदत होते.

२. कर्ज लवकर/मुदतपूर्व फेडल्यास शुल्क कमी आकारले जाऊ शकते.

३. व्याजदर कमी करून घेण्यासाठी वाटाघाटी करता येतात.

४. कर्ज लवकर मंजूर केले जाऊ शकते.

५. जरूर असलेल्या कर्जाची रक्कम मंजूर करून घेण्यासाठी मिळकत कमी पडत असेल तर इतर बाबींचा विचार करण्यात येतो. जसे की, मुदत ठेवी किंवा एखादी विमा पॉलिसी गहाण ठेवता येऊ  शकते अथवा जामीनदार देण्याची मुभा मिळते.

जे पहिल्यांदाच कर्ज घेऊ इच्छितात किंवा ज्यांचा क्रेडिट स्कोअर नाही अशांनी काय करावे?

तुम्ही यापूर्वी कर्ज घेतले नाही व त्यामुळे तुमचा कोणताही पतविषयक इतिहास (क्रेडिट रेटिंग) नाही याचा अर्थ तुम्हाला कर्ज मिळणार नाही असे नाही.

अशा वेळी फार तर कर्जमंजुरी करण्यापूर्वी कर्ज देणाऱ्या संस्थांकडून तुमच्या अर्हतेची कसून तपासणी करण्यात येते.

१. तुमच्याकडून जामीनदाराची मागणी करण्यात येऊ शकते; परंतु तुमचा जामीनदार म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव देणार आहात त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्याची खात्री करून घ्यावी.

२. जी मालमत्ता तुम्ही विकत घेणार आहात त्यात तुमचा वाटा अधिक असल्यास त्या मालमत्तेवरील कर्ज त्या प्रमाणात देण्यात येते.

३. तुम्ही पहिल्यांदाच कर्ज घेत असल्यामुळे व तुमचा क्रेडिट स्कोअर नसल्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त व्याजदर आकारण्यात येऊ शकतो.

एक गोष्ट येथे लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे मोठय़ा रकमेच्या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी एखादे छोटय़ा रकमेचे कर्ज घेतले की, ज्याची परतफेड करणे सहज शक्य आहे. अशा वेळी त्या कर्जामुळे जो चांगला क्रेडिट स्कोअर मिळेल ज्यामुळे पुढचे मोठे कर्जमंजुरी मिळण्यास अडचणी येणार नाहीत.

वेळेवर कर्जाचे हप्ते भरा. तुमच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करीत राहा. कर्जाच्या हप्त्यावर लक्ष असू द्या. वेळेवर कर्जाची परतफेड करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर योग्य राहण्यास मदत होईल.

* लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांचा संपर्क ई-मेल

किरण हाके – kiran@fingenie.in