पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनांतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांकडे वळलेच पाहिजे, हे कळणे म्हणजे आर्थिक साक्षरतेची सुरुवात म्हणता येईल. परंतु हे इतके कळणे पुरेसे नव्हे तर अधिक परतावा देऊ शकणाऱ्या गुंतवणुकीच्या वैध पर्यायांची माहितीही असायला हवी.

साधारण १५ वर्षांपूर्वी जेव्हा बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर १२ टक्क्याच्या पुढे होते, तसेच सरकारी/निमसरकारी खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्याची सुविधा होती, तेव्हा नोकरदार मंडळी आर्थिक साक्षरता या विषयाबद्दल विशेष अशी आस्था दाखवत नसत. जेव्हापासून आपल्या देशात खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले, विविध उद्योगांमध्ये खासगीकरणाची सुरुवात झाली, निवृत्तिवेतन इ. देण्याची पद्धत बंद होऊ  लागली. बँकांमधून मिळणारे व्याजदरही प्रति वर्षी कमी होऊ लागले. १३-१४ टक्कय़ांवरून व्याजाचे दर ७-८ टक्कय़ांवर आले तेव्हापासून अर्थसाक्षरतेची गरज लोकांना जास्त वाटू लागली आहे.

गेल्या ५० वर्षांचा इतिहास बघता दक्षिण कोरियाच्या माणसाचे दरडोई उत्पन्न ५५,००० अमेरिकी डॉलर आहे, तर भारतीय व्यक्तीचे सरासरी दरडोई वार्षिक उत्पन्न १५६० डॉलर राहिले आहे. भारतात जवळपास ६६ कोटी जनतेचे वय सरासरी ३० वर्षे वा त्या खालील आहे आणि हीच लोकसंख्या जसजशी कमावती होत आहे तशी त्यांची आर्थिक साक्षरतेची गरज वाढत जाणार आहे. पारंपरिक गुंतवणुकीची साधने चोखाळून झाल्यावर या मंडळींना हे पटू लागले आहे की, आता त्यायोगे मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांकडे वळलेच पाहिजे. हे कळणे म्हणजेच आर्थिक साक्षरतेची सुरुवात आहे असे म्हणता येईल. परंतु एवढय़ा मोठय़ा लोकसमूहाला आर्थिक विषयात साक्षर करणारे शिक्षक आपल्याकडे नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा गुंतवणूकदाराला अवाजवी मोठय़ा परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या फसव्या योजनांना सामोरे जावे लागते आणि अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून स्वत:च्या पैशाचे मातेरे करून घेताना ते दिसून येतात. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अर्थशास्त्र हा विषय महाविद्यालयात शिकविला जातो. विद्यार्थी इतर अनेक विषयांत प्रावीण्य मिळवतात, परंतु त्यांना अर्थ नियोजनाची माहिती नसते, अशी स्थिती आहे.

मोकळा पैसा जिभेवर ठेवलेल्या साखरेसारखा असतो, इच्छा नसतानाही कधी विरघळेल याचा नेम नाही. तसेच आपली बचतही रोख रकमेत नोटांच्या रूपात ठेवून चालत नाही तर ती सांभाळण्यासाठी इतर अनेक घटकांची जोड लागते. जसे की, उत्पन्नाची विभागणी, खर्चाची आखणी, कुटुंबाची मानसिकता आणि सहभाग, बचतीचे सोपे उपाय, उद्दिष्टांची आखणी व प्राधान्यक्रम.

आपल्या जीवनात आपल्या गरजा बदलत जातात आणि या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जसे आर्थिक पाठबळ आवश्यक असते तसेच त्याचे नियोजनही महत्त्वाचे असते. आर्थिक नियोजन करताना आपल्या समोरील लघू, मध्यम तसेच दूरची उद्दिष्टे लक्षात घेऊन स्वत:चे आणि संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन त्यातून घर चालविण्यास लागणारा खर्च वगळता आपण किती बचत करू शकतो याचा विचार प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीला करणे आवश्यक आहे.

नियमित बचतीतून गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण त्यामुळे वाढत चाललेल्या महागाईवर मात करता येईल, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन व भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी, जीवनातील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी तरतूद करता येईल. त्याच सोबत जीवनातील विविध महत्त्वाच्या टप्प्यांना लागणाऱ्या खर्चाची सोय करणे शक्य होईल. अनेक खर्चाचा मोह आवरत, जमा पुंजी वाढण्याचा आनंद हवा असेल तर योग्य गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नाही. अनेक निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकाधिक वाढत जाणारा पैसा, धनसंचय आणि धनवृद्धी करून देतो म्हणून स्वत: जागरूकता आणि दूरदर्शीपणा ठेवत, आर्थिक विषयावरील वाचन करीत, तज्ज्ञांचे निकष लक्षात घेत, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेत, योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडणे शहाणपणाचे ठरते. आणि तीच तर असते आर्थिक साक्षरता!

मोकळा पैसा जिभेवर ठेवलेल्या साखरेसारखा असतो, इच्छा नसतानाही कधी विरघळेल याचा नेम नाही. तसेच आपली बचतही रोख रकमेत नोटांच्या रूपात ठेवून चालत नाही तर तिचा सांभाळ आणि वाढीसाठी इतर अनेक घटकांची जोड लागते.

वेळ प्रसंगी कर्ज घेणे हेसुद्धा आवश्यक असून यासाठी आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करणे गरजेचे आहे. ‘सिबिल’सारख्या संस्थेमध्ये आपण जर वेळेवर कर्जाची परतफेड करीत असलात तर नवीन कर्ज मिळण्यासाठी अर्ज केल्यास वित्तीय संस्थांकडून विचारणा केली जाते आणि आपल्या कर्जमंजुरीसाठी सिबिल गुणांक (स्कोअर) हा महत्त्वाचा घटक असतो. बहुतेक कमावणाऱ्या तरुण वर्गास आता म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची आवड निर्माण होत असून या वर्गाने वर्षांला फक्त २४,००० रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात केल्यास आपल्याला परकीय गुंतवणुकीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, तसेच भारतीय कंपन्यांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये स्वत:च्या गुंतवणुकीतील वाढ बघण्याची संधी या सर्व गुंतवणूकदारांना दिसून येईल.

आर्थिक नियोजनातील अनेक महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक म्हणजे विमा. विम्याचेही तीन प्रकार आहेत- जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा. आपल्याकडे आपण जीवन विमा म्हणजे एक गरज मानतो पण तसेच जीवन विम्याला गुंतवणूक अधिक करसवलतीच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्व आहे. जीवन विमा नक्कीच महत्त्वाचा, परंतु आपल्या उभ्या आयुष्याचे काय? या आयुष्यात जर काही आजारांची सोबत झाली तर काय करणार? आजारातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत कोण करणार? कर्ता व्यक्तीच जर गंभीर आजाराने ग्रासला तर त्याचे उपचार कसे करणार? आपले माणूस आजारी असले की कुटुंब मुळातच भावनिक वेदनेत असते. पण त्याबरोबर जर त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या रकमेची आर्थिक चणचण भासणार असेल तर सगळे खूपच अवघड होऊन बसते आणि यावर योग्य पर्याय म्हणजे आरोग्यविमा. भविष्यातील आव्हानात्मक शक्यतांवर आपण नक्कीच मात करू शकतो, पण फक्त गरज असते ती जागरूकतेची आणि दूरदृष्टी ठेवून केलेल्या अभ्यासपूर्ण आर्थिक नियोजनाची..

आपल्या जीवनातील आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता, आपली जीवनशैली, उत्पन्न आणि खर्च, बचत, नियमित गुंतवणूक, वेगवेगळ्या पर्यायांतून सुयोग्य गुंतवणुकीच्या पर्यायाची निवड आणि त्यातील सुरक्षितता, निवृत्तीसाठी नियोजन, गुंतवणुकीचा नियमित आढावा हे सर्व घटक अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. कारण यावरच आपले आर्थिक समाधान अवलंबून आहे.

तेव्हा जीवनात सुख-समाधानाच्या प्राप्तीसाठी आर्थिक साक्षरता आवश्यकच!

अजित प्रभाकर मंजुरे  AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.