आरोग्य विमा ही एक व्यापक संकल्पना असून त्याद्वारे वैद्यकीय अकल्पित घटना आणि त्यामुळे होणाऱ्या खर्चापासून संरक्षण पुरविले जाते. बाजारपेठेत अनेक कंपन्या आरोग्य विमा पुरवतात. दर विम्यागणिक विमा संरक्षण आणि फायदे बदलतात.

’अभिनेत्री आणि मोनॅकोची राजकुमारी ग्रेस केली हिने म्हटल्याप्रमाणे, ‘‘स्त्रीची नैसर्गिक भूमिका आहे कुटुंबाला आधार देणारा खांब बनणं.’’ खरोखरच कुटुंबाच्या सुखामध्ये स्त्री बजावत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्त्रीच संपूर्ण कुटुंबाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सवय लावते आणि कुटुंबातल्या प्रत्येकाची ती काळजी घेते. घरी तसंच कामाच्या ठिकाणीही त्या नेहमीच व्यस्त असल्यामुळे या सगळ्यात त्यांचं स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. बऱ्याच स्त्रियांना त्या निरोगी आणि आनंदी असतील तरच त्या कुटुंबाची उत्तमरीत्या काळजी घेऊ  शकतील, हे कळतच नाही.

आरोग्य विम्याची गरज समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे जो स्त्रीला भविष्यात वैद्यकीय आणीबाणीमुळे उद्भवणाऱ्या मोठय़ा खर्चापासून वाचवू शकतो. एखाद्या गंभीर आजाराचं निदान झालं तर तो केवळ आरोग्याला पोहोचलेला धोकाच नसतो, तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी तो त्रासदायक ठरू शकतो. आजघडीला वैद्यकीय उपचारांचा खर्च इतका वाढला आहे की, विम्याच्या मदतीशिवाय हा खर्च पेलला जाणं जवळपास अशक्यच आहे.

आरोग्य विमा सर्वच वयोगटांतल्या लोकांना फायद्याचा आहे. तरुण मुली आपले आई-वडील आणि स्वत:साठी आरोग्य विमा काढू शकतात त्याचप्रमाणे विवाहित स्त्री स्वत:सह आई-वडील आणि तिच्या नव्या विस्तारलेल्या कुटुंबासाठी हा विमा घेऊ  शकते.

आरोग्य विमा म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते?

आरोग्य विमा ही एक व्यापक संकल्पना असून त्याद्वारे वैद्यकीय अकल्पित घटना आणि त्यामुळे होणाऱ्या खर्चापासून संरक्षण पुरविले जाते. बाजारपेठेत अनेक कंपन्या आरोग्य विमा पुरवतात. दर विम्यागणिक विमा संरक्षण आणि फायदे बदलतात.

स्त्रियांसाठी आरोग्य विमा:

बाजारात अशी काही विशिष्ट विमा उत्पादने उपलब्ध आहेत जी केवळ महिलांच्या विशेष गरजा आणि गंभीर आजारांमध्ये संरक्षण पुरवतात. आजघडीला या उत्पादनांसाठी कोणतीही विशेष व वेगळी किंमत मोजावी लागत नाही. सर्वच विमा कंपन्या खास महिलांसाठी म्हणून विमा योजना पुरवत नसल्या तरी कंपन्यांकडे अशा काही योजना आहेत ज्यात मॅटर्नल, बाळाची काळजी/निगा असे जास्तीचे फायदे असतात. त्याचबरोबर विशिष्ट वयोगटांसाठी आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठीही विमा योजना उपलब्ध आहेत.

अविवाहित आणि विवाहित स्त्रियांसाठी आरोग्य विमा आणि फायदे

वैद्यकीय खर्च उचलणे अविवाहित आणि विवाहित स्त्रीसाठी कठीणच. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला गंभीर आजार झाल्यास, ज्याच्या उपचार आणि काळजीसाठी भरपूर पैसा लागतो, र्सवकष आरोग्य निगा पुरवणारे उत्पादन तसेच क्रिटिकल इलनेस उत्पादन आवश्यक ती आर्थिक मदत करतात.

तुम्ही एकटे पालक असाल तर आरोग्य विमा उत्पादनाकडून पुढील फायदा मिळतो:

*  तुमच्यासोबत तुमच्या मुलालाही र्सवकष आरोग्य विमा संरक्षण मिळतं.

*  त्याच संरक्षणाअंतर्गत चाइल्ड केअर बेनिफिट्सही मिळू शकतात.

*  १२ वर्षांच्या खालच्या मुलांच्या लसीकरणाचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे.

*  मुलांबरोबरच तुम्हाला पालकांनाही एकाच योजनेंतर्गत विमा संरक्षण पुरवता येईल.

*  गंभीर आजार असल्यास हॉस्पिटलचा सगळा खर्च योजनेतच अंतर्भूत असतो.

नवपरिणीत जोडप्यांसाठी आरोग्य विमा

नव्याने लग्न झालेल्या स्त्रिया या उत्पादनांची निवड करू शकतात आणि कुटुंब विस्तारण्याचे ठरवल्यानंतर मॅटर्निटी फायदे घेऊ  शकतात. नवरा आणि बायको दोघांनीही एकत्रितपणे एखाद्या योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतले असेल तर केवळ दोन वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीसह ते मॅटर्निटी फायदे घेऊ  शकतात.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्य विमा

बाजारात अशा विमा योजनाही उपलब्ध आहेत ज्यात एका योजनेतच स्वत: विमाधारक, जोडीदार, अवलंबून असलेली (अविवाहित आणि २५ वर्षे वय असलेली) अथवा अवलंबून नसलेली मुलं. अवलंबून असणारे किंवा नसणारे पालक, अवलंबून असणारी भावंडं, सुना, जावई, आजी-आजोबा, नातवंडं (कमाल १५ सदस्य) अशा जवळपास १५ व्यक्तींना संरक्षण पुरवता येतं. एकत्रित कुटुंबात राहत असलेल्या स्त्रीसाठी या योजना फायद्याच्या ठरतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा –

महिला ज्येष्ठ नागरिकांना एखादा आजार होऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास आरोग्य विम्याचा फायदा घेता येतो. हॉस्पिटलमधून परतल्यानंतरच्या नर्सिगसारख्या सेवाही त्यांना पुरवल्या जातात. घरी कोणी काळजी घेणारे नसल्यास याचा फायदा होतो. काही योजनांमध्ये नवी योजना घेताना वयाचे बंधन नसते. विम्याचे फायदे योजनेगणिक बदलतात.

विमा कवच आणि हप्ते 

उत्पादनाचा प्रकार, योजना, संरक्षणाची व्याप्ती त्याचबरोबर विमा कवचाची हमी रक्कम (सम अशुअर्ड) आणि योजनेअंतर्गत येणाऱ्या व्यक्तींची वयं यानुसार आरोग्य विम्याच्या हप्त्याची (प्रीमिअम) रक्कम आणि विमा कवच दिले जाणाऱ्या व्यक्तीचं वय बदलतं. हप्ते हे ईसीएस, रोख/धनादेश आणि थेट ऑनलाइन पेमेण्ट या तीन मार्गानी भरता येते.

दाव्यांची पूर्तता

विमाधारकाला दावा दाखल करायचा झाल्यास त्याने करायच्या गोष्टींची विस्तृत मार्गदर्शक तत्त्वं विमा कंपनी पुरवते. हॉस्पिटलायझेशन दाव्यांबाबत, विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असते. या हॉस्पिटल्सची यादी विमाधारकाला सुरुवातीलाच दिली जाते. नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास विमाधारकाला क्लेम ऑन रिइम्बर्समेण्ट तत्त्वावर भरपाई दिली जाते.

विमा कंपनी कशी निवडावी?

सेवा आणि दावा पूर्ततेचा चांगला पूर्वलौकिक असणाऱ्या नामांकित विमा कंपनीकडूनच विमा योजना खरेदी करावी. प्रसंग उद्भवल्यानंतर याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एखादी स्वस्त विमा योजना प्रत्येक वेळी तुमच्यासाठी फायद्याचीच असेल असे नाही. अशी विमा योजना घ्यावी जी विमा संरक्षणाबाबतीत तुमच्या गरजांची पूर्तता करेल. प्रतीक्षा कालावधी, वगळण्यात आलेल्या गोष्टी आणि सबलिमिट हे समजून घेण्यासाठी माहितीपत्रक आणि योजनेची भाषा नीटपणे समजून घ्यावी. विमा योजनेवर सही करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. विमा योजना ऑनलाइन खरेदी करता येतात किंवा कंपनीच्या नजीकच्या शाखेशीही तुम्ही संपर्क साधू शकता किंवा विमा कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करू शकता. त्यानंतर तुम्हाला उत्पादनाची माहिती देण्यासाठी सुयोग्य अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल.

बाजारात उपलब्ध आरोग्य विमा योजनांचे सामायिक फायदे

*      विमा कंपनीच्या हॉस्पिटल नेटवर्कमध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन

*      हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी आणि नंतरचे खर्च

*      अधिकृत केंद्रामधून आरोग्य चाचणीचा खर्च

*      हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर होणारा प्रसूतीसाठीचा खर्च समाविष्ट असलेले मॅटर्निटी फायदे

*      प्री-नॅटल आणि पोस्ट-नॅटल खर्च

*      नवजात बालकासाठी विमा संरक्षण आणि लसीकरणाचा खर्च आदी

*      विमाधारकाच्या विस्तारित कुटुंबाचं संरक्षण समाविष्ट असणाऱ्या विमा योजना

*      विमाधारकाला कॅन्सर, हृदयरोग, पक्षाघात आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर आजारांचे निदान झाल्यास संपूर्ण रक्कम अदा केली जाणे

*      कलम ८० डीअंतर्गत करबचत

*      स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, स्पाँडिलायटिससारख्या स्त्रियांच्या गंभीर आजारांचा योजनेमध्ये अंतर्भाव

(लेखक फ्यूचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये आरोग्य विमा व्यवसायाचे प्रमुख आहेत.)

श्रीराज देशपांडे