वय वर्षे १६ ते ६० या कमावत्या वयातील असलेल्या मोजक्या देशांपैकी आपला भारत देश आहे. साहजिकच कमावत्या वयातील मंडळी खर्चदेखील हात सैल सोडून करत असतात. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते. तरुण लोकसंख्येची लाभार्थी ठरणारी उद्योग क्षेत्रे मात्र ओळखता यायला हवीत..

वाहनांच्या बाजारपेठेचा कल मागील चार वर्षांत पूर्णपणे बदलला आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत २५ टक्के वाटा हा ‘एसयूव्ही’ प्रकारच्या वाहनांचा असून प्रत्येक चार एसयूव्हीपैकी एक वाहन हे ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’चे असल्याने या कंपनीचासुद्धा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल.

‘भारत हा तरुणांचा देश आहे’ हे वाक्य ऐकल्याशिवाय कोणत्याही गुंतवणूकविषयक कार्यक्रमाची पूर्तता होत नाही. या तरुण लोकसंख्येची लाभार्थी ठरणारी कोणती उद्योग क्षेत्रे आहेत? या उद्योग क्षेत्रातील नेमक्या कोणत्या कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निवडाव्यात?

– प्रिया सामंत, कुडाळ, सिंधुदुर्ग

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे उपलब्ध शब्दमर्यादेत देणे अतिशय कठीण काम आहे. तरीसुद्धा नेमके उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. देशातील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण वय वर्षे १६ ते ६० या कमावत्या वयातील असलेल्या मोजक्या देशांपैकी आपला भारत देश आहे. साहजिकच कमावत्या वयातील मंडळी खर्चदेखील हात सैल सोडून करत असतात. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते.

कमावत्या वयात सर्वाची प्राथमिकता ही घर घेण्याची असते. हे घर कर्ज काढूनच घेतले जाते. त्यामुळे गृहवित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना उज्ज्वल भवितव्य राहणार आहे. या दृष्टीने तुम्हाला एचडीएफसी, एलआयसी हौसिंग फायनान्स, इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स यांचा विचार करता येईल. एखाद्या व्यक्तीने घर खरेदी केल्यानंतर या घरात अनेक वस्तू कर्ज काढून घेतल्या जातात. त्यामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे भवितव्यसुद्धा उज्ज्वल आहे. बजाज फायनान्स, सुंदरम फायनान्स, महिंद्रा फायनान्शियल हे समभागसुद्धा सध्याच्या भावात खरेदीसाठी योग्य आहेत.

तरुणांच्या प्राथमिकता बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार बदलत असतात. काल चैन वाटणारी खरेदी आजची प्राथमिकता असते. म्हणूनच सिनेमागृहाच्या व्यवसायात असणारी पीव्हीआर, उपाहारगृह व फास्टफूडच्या व्यवसायात असणाऱ्या स्पेशालिटी रेस्टॉरन्ट, ज्युबिलन्ट फूड वर्क्‍स, वेस्टलाइफ डेव्हलपमेंट्स (मॅक्डोनाल्डस) यांसारख्या आज चैन वाटणाऱ्या वस्तू किंवा सेवा उद्या एक गरज होणार आहेत. मूल्यांकनानुसार यांचादेखील गुंतवणुकीसाठी विचार करता येईल.

घरखरेदीनंतर दुसरी मोठी खरेदी म्हणजे वाहनखरेदी असून दुचाकी वाहन हे गरज झाल्यामुळे अजून काही वर्षे तरी दुचाकी वाहननिर्मिती व्यवसायात असलेल्या हिरो होंडा, टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो यांसारख्या कंपन्या नक्कीच नफ्यातील सातत्य राखतील. भारतात अजूनही चारचाकी वाहन खरेदी हे एक स्वप्न असल्याने मारुती व महिंद्रा या वाहननिर्मिती व्यवसायात असणाऱ्या कंपन्या नक्कीच मोठय़ा भांडवली वृद्धीचा विचार करून खरेदी करता येतील.

सुझुकी मोटर्सकडून गुजरातस्थित नव्या कारखान्यातून वाहननिर्मितीला प्रारंभ झाला आहे. हा कारखाना भारतातील उपकंपनीच्या मातृकंपनी असलेल्या सुझुकीच्या मालकीचा असून या कारखान्यात तयार केलेली १०० टक्के वाहने मारुती सुझुकी इंडियाला पुरविली जातील. हा कारखाना गुरगाव व मानेसरनंतर भारतातील तिसरे निर्मिती केंद्र आहे. सध्या मारुतीच्या एकूण विक्रीपैकी १३ टक्के वाहने या कारखान्यातून पुरविली जातील. हा कारखाना पूर्ण क्षमतेने आर्थिक वर्ष २०१९ अखेर उत्पादनास सुरुवात करेल. या कारखान्यांना गुजरात सरकारने दिलेल्या सवलतींचा विचार करता व एकूण विक्रीत या कारखान्यात तयार केलेल्या वाहनांचे प्रमाण जसे वाढत जाईल तसे मारुतीचा नफासुद्धा वाढणार आहे. निदान पुढील सहा तिमाहीत मारुतीच्या परिचालन नफ्यात किमान सहा टक्के वृद्धी झालेली दिसेल. अन्य चलनांच्या तुलनेत मजबूत होणारा रुपया मारुतीसाठी सकारात्मक ठरणारा आहे. प्रति दहा हजार लोकसंख्येच्या मागे असणारे वाहनांचे अल्प प्रमाण पाहता तरुणांच्या देशातील प्रवासी वाहननिर्मिती व्यवसाय पुढील अनेक दशके नफ्यात राहील.

वाहनांच्या बाजारपेठेचा कल मागील चार वर्षांत पूर्णपणे बदलला आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत २५ टक्के वाटा हा ‘एसयूव्ही’ प्रकारच्या वाहनांचा असून प्रत्येक चार एसयूव्हीपैकी एक वाहन हे ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’चे असल्याने या कंपनीचासुद्धा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल.

मारुती व महिंद्र या दोन कंपन्यांच्या विक्रीत मोठा हिस्सा ग्रामीण बाजारपेठांचा आहे. भारत सरकारचे धोरण ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करण्यावर असल्याने, याचा फायदा या दोन वाहननिर्मात्यांना नक्कीच होईल. ‘महिंद्र’च्या एकूण विक्रीपैकी ५७ टक्के विक्री व ७३ टक्के करपूर्व नफा ग्रामीण भारताच्या विक्रीतून येतो. मागील १८ महिन्यांत कंपनीचे सहा नवीन वाहने ग्राहकांना उपलब्ध करून दिली असून हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. तेव्हा तरुण लोकसंख्येची गुंतवणूक प्रतीके म्हणून या दोन कंपन्यांचा नक्कीच विचार करता येईल.