वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या मनुष्यबळ विभागात  मी नव्यानेच नोकरीला सुरुवात केली आहे. तुलनेने चांगले वेतनमान आहे. फारशा जबाबदाऱ्या नसल्याने दरमहा हाती राहणाऱ्या शिलकीतून मी विमा पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे. दरमहा तब्बल १२ हजार ५०० रुपये होईल इतकी गुंतवणूक वेगवेगळ्या तीन पॉलिसींमध्ये करण्याचा सल्ला माझ्या वडिलांनीच दिला. तथापि हा निर्णय योग्य की अयोग्य याचा पडताळा कसा करावा?

गणेश रामपुरे, वसंत विहार, ठाणे 

कमाईला सुरुवात केल्यापासून नियमित शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयीची आपल्याकडे वानवा आहे. ‘स्टार्ट अर्ली’ हा मंत्र गुंतवणूकदार सल्लागार नेहमीच देत असतात. गणेश, तुमचे वय तुम्ही स्पष्ट केले नसले तरी नव्याने नोकरीला सुरुवात केली आहे पाहता २६-२७ वर्षे वयाचे असाल, असे गृहित धरतो. हे गुंतवणुकीच्या दृष्टीने अगदी सुयोग्य वय आहे. मात्र लक्षात घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट हीच की, गुंतवणूक आणि विम्याची सांगड घालण्याची गल्लत तुमच्याकडून झाली आहे. अशी गल्लत करणारे तुम्ही एकमेव नाही तर तुमच्यासारखे अनेक आहेत ही वेदनादायी बाब आहे. पारंपरिकरित्या केवळ कर वजावटीसाठी पगारदार मंडळी काही विचार न करता आयुर्विम्याच्या पॉलिसी घेत आली आहेत. दीघरेद्देशी बचत आणि बरोबरीने विमा संरक्षण आणि कर वजावटही अशा विमा पॉलिसीच्या माथी मारल्या जाणाऱ्या प्रचारी बाजूला लोक भूलतात. प्रत्यक्षात ‘ट्रिपल बेनिफिट’ वगैरे शब्दप्रयोग वापरणाऱ्या पॉलिसीतून मिळणारा परतावा हा पाच-सहा टक्क्य़ांच्याही घरात जात नाही. शिवाय, विमा हा दीर्घ मुदतीचा करार असल्याने आपला पैसा अनेक वर्षे अशा परतावादृष्टय़ा कमअस्सल योजनांत अडकला जातो. तर आता चुकीच्या दुरूस्तीचा काही मार्ग आहे काय? तर तुम्हाला या पॉलिसी सरेंडर करता येतील आणि जर आवश्यक किमान कालावधीही पूर्ण होणार नाही इतकेच हप्ते भरले असतील, तर गुंतलेले पैसे अक्कलखाती गेले समजून तुम्हाला नुकसान सोसणे भाग ठरेल. तेही नको असेल तर तीन वर्षांपर्यंत हप्ते भरून थांबता येईल. अशा पेड-अप पॉलिसीत मुदतपूर्तीअंती भरलेल्या हप्त्यांचे त्यावेळी असलेले मूल्य तुम्हाला परत केले जाईल. पॉलिसीच्या पूर्णावधीसाठी हप्ते भरत राहून भिकार परतावा मिळविण्यापेक्षा हा पर्याय केव्हाही चांगला ठरेल.

विमा पॉलिसीची सर्वोत्तम ८.५० टक्के दराने परतावा कामगिरी जरी गृहित धरली तरी त्यातून दरमहा २,००० रुपयांप्रमाणे २० वर्षे गुंतवणुकीतून ९.८ लाख रुपये गणेश तुम्ही उभे करू शकाल, त्या उलट म्युच्युअल फंडाच्या समभाग संलग्न योजनेत तितकीच गुंतवणूक सलग २० वर्षे राहिल्यास तुम्ही १९.२ लाख रुपयांचा कोष उभा राहिल. तर मग तुम्ही कोणता पर्याय निवडणार?

फंड गुरू

आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा : arthmanas@expressindia.com